प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स व ब्राझील वगळता सर्व प्रस्थापित संघांना या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. काहींना प्राथमिक फेरीत तर काहींना बाद फेरीत पराभव स्वीकारावा लागला. या संघांच्या जाण्याने अनेकांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या जगातील पाठीराख्यांनीच नव्हे, तर भारतातील पाठीराख्यांनीसुद्धा आपल्या आवडत्या संघांनी विजेतेपद मिळवावे, याकरिता प्रार्थना केली होती. भारतात प्रमुख शहरांतून या प्रस्थापित संघांचे व खेळाडूंचे फलक झळकत होते. या संघांच्या पराभवाने आता ते हळूहळू पडद्याआड चाललेले आहेत. पण विशिष्ट संघांवर प्रेम करण्याऐवजी फक्त फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या पाठीराख्यांनी आपला नवीन संघ पाठीराखा या नात्याने निवडलेला आहे. अशा पाठीराख्यांमुळेच हा खेळ जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय व सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला खेळ म्हणून प्रकाशझोतात आलेला आहे.

या विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने इंग्लंड, उरुग्वे, स्वीडन, बेल्जियम, रशिया व क्रोएशिया या संघांची नावे आता विश्वचषक विजेतेपदाचे दावेदार म्हणून पुढे येऊ लागलेली आहेत. फ्रान्स व ब्राझीलचे समर्थक वगळता जगातील सर्वच प्रेक्षकांची या संघांपैकी एखाद्या संघाने विजेतेपद मिळवावे अशी इच्छा आहे. यापैकी विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून क्रोएशियाने एक आव्हान निर्माण केलेले आहे. रविवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात याचा प्रत्यय सर्वानाच आला. डेन्मार्कविरुद्ध झालेल्या या सामन्यात क्रोएशियाने सर्वाची मने जिंकली. सर्व बाजूनी हा संघ सरस ठरला. या संघाची शारीरिक तंदुरुस्ती, खेळातील गती, पासिंग, शूटिंग, ड्रिब्लिंग, परस्पर समन्वय सर्वच बाजूने डेन्मार्कपेक्षा सरस होते. सरासरी उंची सहा फूट ९ इंच इतकी असणारा हा संघ अतिशय मजबूत वाटत होता. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला क्रोएशिया संघावर अनपेक्षितपणे गोल झाला, पण न डगमगता या संघाने तिसऱ्या मिनिटालाच गोलची परतफेड केली. यावरून या संघाची जिद्द दिसून येते. या संघाच्या कर्णधाराच्या धाडसी निर्णयाचा येथे उल्लेख करणे गरजेचे आहे. सामन्याच्या ११६व्या मिनिटाला क्रोएशियाला पेनल्टी किक मिळाली. या गोलच्या साहाय्याने संघ पुढच्या फेरीत जाणार होता. परंतु कर्णधार लुका मॉड्रिच पेनल्टी मारण्यास आला आणि त्याने गोल करण्याची संधी गमावली. पूर्ण वेळेत बरोबरी झाल्यानंतर तिसरी पेनल्टी मारण्याकरिता पुन्हा कर्णधार लुका मॉड्रिच आला. वास्तविक पाहता सामन्यात पेनल्टी मारण्यात अपयशी ठरल्यानंतर एखाद्या खेळाडूचे पुन्हा त्याच सामन्यात पेनल्टी मारण्याचे तेही विश्वचषकातील अतितणावाच्या सामन्यात धाडस होणे शक्य नाही, पण लुकाने ते करून दाखवले. सलाम त्याच्या आत्मविश्वासास! ‘‘क्रोएशियाच्या या विजयाने खरा कर्णधार कसा असावा, त्याचा सुंदर नमुना मॉड्रिचने दाखवला़,’’ असे उद्गार डेन्मार्कचे प्रशिक्षक एज हॅरिडे यांनी काढले. या सामन्यात क्रोएशियाचा गोलरक्षक सबासिक व डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर स्कॅमिचेल यांनी अप्रतिम गोलरक्षण केले. संपूर्ण सामन्यात एखादी पेनल्टी वाचवणे म्हणजे महाकठीण असते. पण या सामन्यात स्कॅमिचेलने तीन व सबासिकने तीन पेनल्टी अडवल्या.

यापूर्वीचा क्रोएशिया संघाचा फुटबॉलचा इतिहास पाहिला तर हा संघ निश्चितच कौतुकास पात्र आहे. पूर्वीचा युगोस्लाव्हिया देश १९९० सालापर्यंत अखंडित होता. पण त्यावेळी राजकीय उलथापालथीनंतर या देशाचे विभाजन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, मॅसेडोनिया, बोस्निया, हर्जेगोविना, सर्बिया, मॉन्टेग्रो, कोसोवो व वोजेवोडिना या नऊ नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली. युगोस्लाव्हिया संघ १९९० पर्यंत आठ वेळा विश्वचषक स्पर्धेस पात्र ठरला, तर १९९०सालानंतर क्रोएशिया संघ १९९४ आणि २०१०चा अपवाद वगळता सातपैकी पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेस पात्र ठरला आहे. यंदाच्या विश्वचषकात क्रोएशियाने अर्जेटिना, नायजेरिया, आइसलँड यांचा प्राथमिक फेरीत आणि उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कचा पाडाव केला. एखाद्या नवीन राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. त्या देशाचे क्रीडा धोरण निश्चित करताना बरेच कष्ट पडतात. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पण या सर्वावर मात करून क्रोएशियाने जागतिक स्तरावर एक चांगला फुटबॉल संघ म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. या देशाच्या विविध गटांतील मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या अकादमी आदर्शवत पद्धतीने कार्यरत आहेत. भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असणाऱ्या देशाला विश्वचषक स्पर्धेत पात्र होणे अद्याप जमलेले नाही. नवनिर्मितीनंतरही क्रोएशियासारखा ४१ लाख ७० हजार लोकसंख्या असणारा देश १९९०नंतरच्या सातपैकी पाच विश्वचषक स्पर्धा खेळतो व आपला दबदबा निर्माण करतो. म्हणूनच हा देश कौतुकास पात्र आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.