क्रोएशिया-डेन्मार्क यांच्यात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी चुरस

जवळपास १० दिवसांपूर्वी निझ्नी नोव्हगोरोड स्टेडियमवरच अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला ३-० अशी धूळ चारणारा कर्णधार लुका मॉड्रिचचा क्रोएशिया संघ आता पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सरसावला आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी विजेतेपदाचे दावेदार म्हणून कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या क्रोएशियाने साखळीतील तीनही सामने जिंकून ‘ड’ गटात अव्वल स्थान मिळवले. त्यामुळेच रविवारी होणारी डेन्मार्कविरुद्धची लढत जिंकून विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी क्रोएशियाचा संघ सज्ज झालेला आहे.

क्रोएशियाकडे मॉड्रिचव्यतिरिक्त इव्हान रॅकिटिक, इव्हान पेरिसिक असे गुणवान खेळाडू उपलब्ध आहेत. तसेच प्रशिक्षक झल्टको डॅलिक यांचे मार्गदर्शन लाभल्याने संघाचा आत्मविश्वास बळावलेला आहे. डेन्मार्कची मदार साहजिकच त्यांचा कर्णधार व प्रमुख आक्रमणपटू ख्रिस्तियान एरिक्सनवर आहे. तसेच युसूफ पॉलसेन आणि थॉमस डेलानी यांच्यावरही डेन्मार्कचा संघ अवलंबून आहे. त्यामुळे १९९८ नंतर पुन्हा एकदा बाद फेरीचा अडथळा ओलांडण्यास ते उत्सुक आहेत.

सांख्यिकी

  • क्रोएशियाने विश्वचषकातील मागील सात लढतींमध्ये गोल केले असून २००६च्या विश्वचषकात जपानविरुद्ध त्यांना गोल करण्यात अपयश आले होते.
  • लुका माड्रिचने आतापर्यंत विश्वचषकातील व युरो स्पर्धा मिळून १७ सामन्यांत क्रोएशियाचे प्रतिनिधित्व केले आहे. डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यात डॅरिडो सरनाच्या (१८) विक्रमाशी बरोबरी करण्याची त्याला संधी आहे.
  • मागील १८ लढतींपैकी एकही लढत (९ विजय, ९ बरोबरी) डेन्मार्कने गमावलेली नाही. २०१६ मध्ये विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात मोंटेनीग्रो संघाने त्यांना १-० असे पराभूत केले होते. हा त्यांचा शेवटचा पराभव ठरला.
  • विश्वचषकातील आतापर्यंतच्या चार बाद फेरींच्या सामन्यांत डेन्मार्कचा बचाव कमकुवत वाटला आहे. त्यांच्याविरुद्ध प्रत्येक सामन्यात तीनच्या गोल सरासरीने तब्बल १२ गोल झळकावले गेले आहेत.
  • डेन्मार्कचा संघ ख्रिस्तियन एरिक्सनवर फार अवलंबून आहे. कारण डेन्मार्कसाठी मागील १६ लढतींमध्ये १३ गोल त्याने एकटय़ानेच केले आहेत. तसेच पाच गोलसाठी साहाय्यसुद्धा केले आहे.