प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com
भारतीय संघ १९५० च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरूनही सहभागी झाला नव्हता. तसा तो झाला असता तर आज भारतातल्या फुटबॉलचे चित्र वेगळे असले असते.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा किंवा परदेशातील चर्चेतल्या लीग सुरू असल्या की देशात फुटबॉलच्या प्रेमाचे वारे वाहू लागतात. पण देशातील फुटबॉलच्या नायकांविषयी तेवढी आपुलकी मात्र कधीच बाळगली जात नाही. देशातल्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा लीग फुटबॉल सामन्यांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही. ६८ वर्षांपूर्वी भारतीय संघ फिफाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळला असता, तर आजचे चित्र नक्कीच वेगळे पाहायला मिळाले असते. मात्र तरीही गेल्या काही वर्षांत भारतीय फुटबॉल आशादायी पद्धतीने वाटचाल करीत आहे. भारतीय फुटबॉलच्या भूतकाळाचा आणि वर्तमानाचा घेतलेला हा वेध-

तेव्हा असे घडले..

भारतीय संघाने विश्वचषकाचे स्वप्न साकारले असते, तर भारतीय फुटबॉलचे भवितव्य उज्ज्वल ठरले असते, अशी खंत सेलिन मन्ना यांनी बऱ्याचदा प्रकट केली. ते आज या जगात नाहीत. परंतु भारतीय संघ त्या वेळी विश्वचषकात खेळला असता, तर मन्ना संघाचे कर्णधार असले असते. भारतीय संघ १९५० च्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेस पात्र ठरूनही सहभागी का होऊ शकला नाही, याचे समाधानकारक उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही. भारत सरकारने अशा प्रकारच्या सहभागाला कधीच प्रोत्साहन नाकारले नव्हते. देशाच्या निर्मितीसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी खेळाचे किती महत्त्व आहे, हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ज्ञात होते. स्वप्नवत वाटणारी संधी भारताला मिळते काय आणि ती गमावली जाते काय.. फुटबॉलच्या भाषेत सांगायचे, तर भरपाई वेळेत सामना जिंकू शकणारी ‘पेनल्टी’ लाभते आणि ती गमावली जाते. त्या घटनेचे सोने झाले असते, तर भारतीय फुटबॉलचे आज ६८ वर्षांनंतरचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते.

भारतीय फुटबॉल संघाने त्या वेळी शूज न घालता अनवाणी पायांनी विश्वचषक स्पर्धामध्ये खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) नियमानुसार विश्वचषक स्पध्रेत शूजसह खेळणे अनिवार्य होते, अशी एक लोकप्रिय आख्यायिका आजही चर्चेत आहे. मात्र यात तथ्य नसल्याचा दावा अनेक जण करतात. विश्वचषकात मातब्बर व्यावसायिक संघ सहभागी होतात. त्यांच्याकडून भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागेल. त्यामुळे १९४८ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, याची भीती फुटबॉल संघटकांना वाटत होती. याशिवाय परदेशी चलनाची कमतरता आणि एक महिन्याचा ब्राझीलचा सागरी प्रवास अशा अनंत अडचणी समोर उभ्या ठाकल्याने भारताने विश्वचषकातून माघार घेतली.

भारतीय संघाच्या खेळाडूंकडे ९० मिनिटांचा सामना खेळण्याची क्षमता नव्हती, हे आणखी एक कारण दिले जाते. १९७० पर्यंत भारतामधील स्थानिक फुटबॉल सामने हे ७० मिनिटांचे खेळवले जायचे. त्यामुळे अखेरच्या काही मिनिटांत भारतीय खेळाडूंचा संघर्ष संपलेला असायचा. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ उत्तरार्धात अनेक गोल भारताविरुद्ध नोंदवायचे. वास्तववादी कारणे अनेक होती, शूज हे त्यापैकी एक असावे. इतक्या खर्चीक उपक्रमावर गुंतवणूक करणे योग्य ठरेल का, हा महत्त्वाचा प्रश्न होता.

आता फुटबॉलला सुगीचे दिवस आले आहेत, तसे त्या काळात मुळीच नव्हते. फुटबॉल हा ब्रॅण्ड आर्थिक बाजारपेठेत त्या वेळी इतका सक्षम नव्हता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ऑलिम्पिक आणि १९५१ मध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेकडे लक्ष केंद्रित केले होते. भारतीय संघ तेव्हा विश्वचषक फुटबॉल खेळला असता, तर देशातील फुटबॉल संस्कृतीमध्ये किती क्रांती घडली असती, याचा विचार त्या वेळी भारतीय संघटकांनी केला नव्हता. भारताने विश्वचषकात भाग घेतला असता, तर त्यांच्या खेळाडूंना व्यावसायिक खेळाडू म्हटले जाऊ लागले असते. त्यामुळे भारताला ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेत सहभागी होता आले नसते. त्या काळात फक्त हौशी फुटबॉल संघांनाच ही दारे खुली होती. भारताने ऑलिम्पिक हॉकीमध्ये सुवर्णपदके जिंकून आपला रुबाब दाखवला होता. त्यामुळे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाशिवाय अन्यसुद्धा क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असतात, हे भारतीय संघटकांच्या खिजगणतीतही नव्हते.

अखेरच्या क्षणी विश्वचषकातून माघार घेतल्यामुळे भारताने ‘फिफा’ची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे १९५४ मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघाची प्रवेशिका फेटाळण्यात आली. हे शीतयुद्ध पुढील ३० वष्रे चालू होते. १९८० मध्ये अशोक घोष भारतीय संघटनेचे सरचिटणीस झाल्यानंतर हा वाद शमला. त्यामुळे अखेरीस १९८६ च्या विश्वचषक पात्रता स्पध्रेत भारताला सहभागी होता आले.

स्वातंत्र्यानंतर आशियातील अव्वल तीन संघांमध्ये भारत गणला जायचा. १९५१ आणि १९६२ मध्ये आशियाई क्रीडा स्पध्रेचे सुवर्णपदक भारताने जिंकले होते. एस. ए. रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ त्या काळात प्रथमच ४-२-४ अशा व्यूहरचनेसह खेळणारा पहिला आशियाई संघ ठरला होता. त्यानंतर १९७० ते २००० या कालखंडात भारताचा फुटबॉलमधील आलेख कमालीचा उंचावला.

आजची परिस्थिती..

आमच्यावर रागवा, टीका करा, पण फुटबॉल सामने पाहायला मैदानावर या, असे भावनिक आवाहन भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने केले. भारतीय क्रीडाशौकिन ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी, नेयमार यांना डोक्यावर घेतात. लाखो रुपये खर्च करून परदेशात सामने पाहायला जातात. पण देशातील फुटबॉल सामन्यांना मात्र अल्प प्रतिसाद मिळतो, याकडे छेत्रीने लक्ष वेधले आहे.

छेत्रीच्या आवाहनात तथ्य आहे. देशातील आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अगदी इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या सामन्यांनाही मोजक्याच ठिकाणी प्रेक्षकसंख्या लाभते. खेळात नायक लाभतात, तेव्हा खेळ पुढे जातो. हे भारतीय क्रीडासृष्टीचे वैशिष्टय़ आहे. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारख्या अनेक महानायकांमुळे क्रिकेट रुजू शकले. त्यानंतर विश्वनाथन आनंद, लिएण्डर पेस, सानिया मिर्झा, सायना नेहवाल यांच्यासारख्या खेळाडूंमुळे ते खेळ भारतात नावारूपास आले. आता फुटबॉलमध्येही बायच्युंग भुतियानंतर सुनील छेत्रीचे नायकत्व अधोरेखित होऊ लागले आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. सध्या भारतीय संघाचे फुटबॉल क्रमवारीतील स्थान ९७वे आहे. जागतिक फुटबॉलच्या दृष्टीने हे फारसे समाधानकारक नसले, तरी भारताच्या गेल्या काही वर्षांतील कामगिरीकडे पाहता आशादायी नक्कीच आहे.

पश्चिम बंगाल, गोवा, केरळ, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या भागांत फुटबॉल लोकप्रिय खेळ आहे. डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा ही देशातील सर्वात जुनी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची जुनी स्पर्धा मानली जाते. इंग्लिश एफए चषक आणि स्कॉटिश एफए चषक स्पध्रेनंतर डय़ुरँडचा क्रमांक लागतो. याशिवाय संतोष करंडक, फेडरेशन चषक, आयएफए चषकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा इथे चालतात. देशातील फुटबॉलचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी २००७मध्ये आय-लीगला प्रारंभ झाला. मग २०१३मध्ये आयपीएलच्या धर्तीवर आयएसएल रुजवण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला अपेक्षित यश मिळत नसल्याचेच समोर येत आहे.

भारतीय फुटबॉलमध्ये ऑक्टोबर २०१७मध्ये एक ऐतिहासिक घटना घडली. आपण प्रथमच फिफाच्या एखाद्या स्पध्रेचे यजमानपद भूषवले. कुमारांच्या म्हणजेच १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या आयोजनाची संधी भारताला मिळाली. याच स्पध्रेत जॅक्सन सिंगने विश्वचषक फुटबॉलमधील भारताचा पहिलावहिला गोल नोंदवला. पण भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. आतापर्यंतची सर्वात यशस्वी कुमार विश्वचषक स्पर्धा अशी नोंद झाली. त्यामुळे फिफाच्या २० वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत इच्छुक आहे.

देशाच्याच नव्हे, तर जागतिक फुटबॉलच्या नकाशावरही महिलांचे स्थान अस्पष्ट आहे. १९७५मध्ये भारतीय महिला फुटबॉल महासंघाची निर्मिती झाली. त्यानंतर १९९०मध्ये ही संघटना अखिल भारतीय फुटबॉल महासंघामध्ये विलीन करण्यात आली. मात्र तरीही महिला फुटबॉलवाढीच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न झाले नाहीत.