FIFA World Cup 2018 SPA vs AUS : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज क गटात सामना झाला. ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये झालेला हा सामना बरोबरीत सुटला. आजच्या दिवसात हा पहिला सामना असून ऑस्ट्रेलियाने या सामन्यात बलाढ्य डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखले. सामन्याची सुरुवात झाल्यापासून डेन्मार्कने जोरदार आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याचे फळ डेन्मार्कला लगेचच मिळाले. डेन्मार्ककडून पूर्वार्धात ७व्या मिनिटाला एरिक्सनने गोल केला. जॉगरसनने पास केलेल्या फुटबॉलला त्याने सुन्दर पद्धतीने दिशा दिली आणि गोल केला.

या गोलमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ १-०ने पिछाडीवर पडला. त्याचे काही काळ ऑस्ट्रेलियावर दडपण असल्याचे दिसून आले. मात्र, या दरम्यान सामन्यात ३८व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी किकची संधी मिळाली. या संधीचे सोने करत जेडीनाकने संघाला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्याने डेन्मार्कच्या गोलकिपरला सफाईदारपणे चकवत गोल केला. संपूर्ण सामन्यात उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना १-१ अशा बरोबरीत सुटला. या सामन्यात डेन्मार्कच्या दोन खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले.

हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. क गटात डेन्मार्क १ विजय आणि १ बरोबरी यासह गटात ४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचले आहे. तर ऑस्ट्रेलिया १ गुणासह तिसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा साखळी गटातील शेवटचा सामना २६ जूनला पेरूशी होणार आहे. स्पर्धेत बाद फेरीत पात्र ठरण्यासाठी या उर्वरित सामन्यात ऑस्ट्रेलियाला पेरूला पराभूत करणे गरजेचे आहे.