इजिप्तचा आघाडीचा फुटबॉलपटू मोहम्मद सलाह आपल्या खांद्याच्या दुखापतीमधून सावरला असून उरुग्वेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात सलाह खेळणार आहे. इजिप्तचे प्रशिक्षक हेक्टर कुपर यांनी सलाहच्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. “सलाह सध्या सराव करतो आहे. दुखापतीमधून सलाह लवकर बरा होतो आहे. त्यामुळे त्याच्याकडे आम्ही विशेष लक्ष देऊन आहोत. उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात सलाह खेळेल याची मला खात्री आहे.” कूपर यांनी पत्रकारांना माहिती दिली.

इंग्लिश प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना मोहम्मद सलाहने लिव्हरपूलकडून ४४ गोल डागले आहेत. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील रिआल माद्रिदविरुद्धच्या सामन्यात सलाहच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे सर्व चाहते चिंतेत होते. मात्र प्रशिक्षकांनी दिलेल्या ग्वाहीमुळे आता चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यामुळे उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात सलाह कसा खेळ करतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.