प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषक स्पध्रेचा शेवटचा अंक बाकी राहिला असून, या अंकात माजी विजेता इंग्लंड व फ्रान्स तसेच प्रथमच उपांत्य फेरी गाठणारे क्रोएशिया व बेल्जियम महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत. विश्वचषकात नेहमीच अशिया व आफ्रिका हे खंड गौण असतात. खरी लढत युरोप व दक्षिण अमेरिकन संघातच होत असते. उरुग्वे व ब्राझीलच्या पराभवाने दक्षिण अमेरिका खंड स्पध्रेतून बाहेर पडला आणि युरोपचे वर्चस्व सिद्ध झाले. आत्तापर्यंत ११ वेळा दक्षिण अमेरिकन देशांनी तर नऊ वेळा युरोपियन देशांनी विजेतेपद मिळवले आहे. चालू असलेला विश्वचषक १६ वर्षांनंतरही युरोपातच जाणार हे निश्चित झाले.

मंगळवारी पहिला उपांत्य सामना फ्रान्स व बेल्जियम यांच्यामध्ये तर बुधवारी दुसरा उपांत्य सामना इंग्लंड व क्रोएशिया यांच्यात होत आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात या स्पध्रेत बऱ्याच नाटय़मय घडामोडी घडल्या. विश्वचषक स्पध्रेच्या इतिहासात प्रथमच जर्मनी, इटली, अर्जेटिना, स्पेन, ब्राझील, उरुग्वे या माजी विजेत्यांशिवाय विश्वचषकाचा उपांत्य व अंतिम सामना होत आहे. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत प्रवेश केलेला बेल्जियम विश्वक्रमवारीत तिसऱ्या, फ्रान्स सातव्या, इंग्लंड १२व्या तर क्रोएशिया २०व्या स्थानावर आहे. यापूर्वी इंग्लंडने १९६६ मध्ये, तर फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक जिंकलेला आहे. विश्वचषक कोण जिंकणार? ‘गोल्डन शूज’चा मानकरी कोण होणार? स्पध्रेतील तारांकित खेळाडू कोण? लिओनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो की नेयमार? याबाबत अनेकांनी केलेले तर्कवितर्क या स्पध्रेत उद्ध्वस्त झाले. स्पध्रेपूर्वी इंग्लंड, क्रोएशिया किंवा फ्रान्स या संघांना विजेतेपदाचे दावेदार म्हटले असते, तर नक्कीच त्या व्यक्तीला फुटबॉलमधील काहीच कळत नाही, अशी थट्टा केली गेली असती. पण वस्तुस्थिती आज वेगळीच आहे. इंग्लंडचा हॅरी केन, बेल्जियमचा थोर्गन हॅजार्ड, फ्रान्सचा कायलिन एम्बापे, क्रोएशियाचा लुका मॉड्रिच, गोलरक्षक डॅनियल सबासिक हे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. या सर्वात बेल्जियमच्या विजेतेपदाबाबत सर्वाना थोडी फार अपेक्षा होती. या अपेक्षेनुसार त्यांनी या स्पध्रेत खेळही केलेला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या चार संघांपैकी बेल्जियम हा एकमेव असा संघ आहे की, तो या स्पध्रेत अपराजित आहे. बाकी तीन संघांपैकी इंग्लंड एक वेळा पराभूत तर फ्रान्स व क्रोएशिया यांची एकेका सामन्यात बरोबरी झालेली आहे.

बेल्जियम संघाचे प्रशिक्षक रॉबटरे मार्टिनेझ यांनी उपांत्य सामन्यापूर्वी आपल्या संघावर प्रचंड विश्वास व्यक्त केला. ‘‘माझा संघ फक्त हुशारच नसून तो शारीरिक तंदुरुस्त व मानसशास्त्रीयदृष्टय़ा युक्तिबाज आहे. त्यामुळे अंतिम सामना नक्कीच खेळेल,’’ असे त्यांनी मत व्यक्त  केले. एकंदर बेल्जियम संघाची स्पध्रेतील अपराजित घौडदौड पाहता हा संघ अंतिम सामन्याचा दावेदार नक्कीच होऊ शकतो. पण फ्रान्स संघाने अगदी महत्त्वाच्या क्षणी आपला खेळ उंचावल्यामुळे त्यांनाही कमी लेखून चालणार नाही. बेल्जियम संघ ४-३-२-१ या व्यूहरचनेनुसार खेळत असून त्यांचा बचाव अतिशय मजबूत आहे. मध्यफळीतील केव्हिन ब्रुयने, थॉमस मॅन्युअर, अ‍ॅक्सेल विटसेल व आक्रमक फळीतील इडन हॅजार्ड, डायर मर्टिन व जॉर्डन लुकाकू यांच्यात सुरेख समन्वय आहे. या संघाची खेळाची गती प्रचंड आहे. सातत्याने आक्रमणाची धार कायम ठेवण्यात बेल्जियम यशस्वी झालेला आहे. गोलरक्षक कोएन कॅस्टेल्सने तर ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात अनेक गोल वाचवले आहेत. फ्रान्स संघाची जमेची बाजू म्हणजे बचाव फळी व आक्रमक फळी होय. या संघाने उरुग्वेविरुद्ध केलेला बचाव खूपच कडवा होता. या संघातील ऑलिव्हर जेरॉड, अँटोइन ग्रीझमन, एम्बापे, कोरेंटिन टोलिसो यांचे आक्रमण बेल्जियमला थोपवावे लागेल. मध्यफळीतील कान्ते हा चेल्सीकडून खेळत असून पोग्बा हा मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू आहे. या दोघांचेही संघ सहकारी बेल्जियम संघात असून त्यांना परस्परांच्या खेळाचा अंदाज आहे. एकंदर दोन्ही संघ तुल्यबळ असून दोन्ही संघात युरोपातील चेल्सी, टोटहॅम, मँचेस्टर युनायटेड, रेयाल माद्रिद, स्टट्रगार्ड या नावाजलेल्या संघातील खेळाडू खेळत असल्याने युक्त्या-प्रयुक्त्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जाणार असल्यामुळे सामना अटीतटीचा होईल. मात्र तरीही या सामन्यात बेल्जियमचे पारडे थोडे जडच वाटते.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड व क्रोएशिया परस्परांशी भिडणार असून, इंग्लंडला विजयाची संधी अधिक आहे. इंग्लंडची स्पध्रेतील कामगिरीसुद्धा वाखाणण्यासारखी आहे. स्वीडनशी झालेला सामना एकतर्फी होईल असे वाटत नव्हते, पण इंग्लंडने हा सामना अगदी आरामात जिंकला. १९६६ नंतर प्रथमच इंग्लंडला विजेतेपदाची संधी मिळत असल्याने समर्थकांच्या संघाकडून खूपच अपेक्षा वाढलेल्या आहेत. फक्त  आधी म्हटल्याप्रमाणे इंग्लंडचा संघ ‘युद्धात जिंकतो व तहात हरतो’. परंतु तसे न खेळता उपांत्य सामना जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. क्रोएशियाच्या दृष्टीने इंग्लंड संघातील हॅरी केन, जेसी लिंगार्ड, रहिम स्टर्लिग, कायले वॉलकर हे धोकादायक खेळाडू आहेत. याउलट क्रोएशिया संघ प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला असल्याने अगोदरच या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे या संघाकडून फारशा कोणी अपेक्षा केलेल्या नाहीत. या संघावर कसलेही दडपण नसल्याने हा संघ खुलेपणाने खेळ करण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार लुका मॉड्रिच, अँटे रॅबिक, इव्हान रॅकाटिच व आक्रमक मारिओ मँडझुकिच व गोलरक्षक सबासिक यांच्यावर संघाची खऱ्या अर्थाने मदार आहे, तरीही अनुभवी खेळाडूंचा भरणा अधिक प्रमाणात असल्याने या सामन्यात इंग्लंड संघाला विजयाची जास्त संधी आहे असे वाटते.

abhijitvanire@yahoo.com