FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात काल फ्रान्सने बेल्जीयमला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. आता आज इंग्लंड आणि क्रोएशिया या दोन संघांमध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असले, तरीही सर्वाधिक पसंती ही इंग्लंडच्या संघाला मिळत आहे. आजच्या सामन्यात जर इंग्लंडचा संघ विजयी झाला, तर एका आकडेवारीनुसार इंग्लंड फ्रान्सला पराभूत करून जगज्जेतेपद जिंकू शकण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

इंग्लंडचा आणि क्रोएशिया यांच्यात रंगणाऱ्या सामन्यात तगडी झुंज पाहायला मिळणार आहे. मात्र, सामन्यात इंग्लंड हे फेव्हरिट असल्याचे दिसत आहेत. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू हा इंग्लंडचा आहे. हॅरी केन याच्या नावावर या स्पर्धेत ६ गोल आहेत. तसेच, इंग्लंड हे स्पर्धेच्या सुरुवातीला ‘अंडरडॉग्स’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडून या पराक्रमाची अपेक्षा कोणीही केलेली नव्हती. मात्र आता इंग्लडचा संघ ज्या लयीत आहे, त्यानुसार इंग्लंड हा सामना जिंकण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड फ्रान्सवर भारी

क्रोएशियाविरुद्ध आजच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला, तर फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात जगज्जेतेपदासाठी इंग्लंडला अधिक पसंती असेल. आजपर्यंत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेत २ सामने झाले आहेत. या दोनही सामन्यात इंग्लंडने फ्रान्सवर विजय मिळवला होता. सर्वप्रथम २० जुलै १९६६ साली या दोघांच्यात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने फ्रान्सला २-० असे पराभूत केले होते. तर दुसऱ्या वेळी १६ जून १९८२ साली हे दोघे आमनेसामने आले होते. या सामन्यातही इंग्लंडने फ्रान्सवर ३-१ असा विजय मिळवला होता. याशिवाय, स्पर्धात्मक सामन्यात आजपर्यंत दोघांनी १-१ सामना जिंकला असून उर्वरित २ सामने बरोबरीत सुटले होते.

त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत जर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात जगज्जेतेपदासाठी लढत झाली, तर त्यात इंग्लंडच्या विजयाची शक्यता अधिक असल्याची चर्चा फुटबॉलविश्वात रंगली आहे.