गटविजेतेपदासाठी दोन्ही संघांत चुरस; केन-लुकाकू यांच्यावर सर्वाच्या नजरा

कलिनिंग्राड : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कमी आव्हानात्मक गट म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘ग’ गटात अपेक्षेप्रमाणे त्याच स्वरूपाचे चित्र पाहण्यास मिळत आहे. बेल्जियम आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश आधीच निश्चित केल्यामुळे गुरुवारी या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांत गटात अव्वल स्थान कोण पटकावतो, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. पनामा आणि टय़ुनिशिया या संघांचे आव्हान सलग दोन पराभवांमुळे यापूर्वीच संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे बेल्जियम आणि इंग्लंड यांनी यंदाच्या स्पर्धेतील दोन लढतीत सर्वाधिक आठ गोल झळकावले आहेत. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा ‘गोलधडाका’ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

बेल्जियमच्या आक्रमणात रोमेलू लुकाकू, एडन हॅजार्ड अशी नामांकित खेळाडूंची फळी उपलब्ध आहे तर, मध्यभागात केव्हिन डी ब्रुन, मौसी डेम्बेले आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. दुसरीकडे कर्णधार हॅरी केनच्या वादळी खेळापुढे पनामा आणि टय़ुनिशिया संघांना नतमस्तक व्हावे लागले.

सामना क्र. ४८

गट ग

बेल्जियम वि. इंग्लंड

स्थळ : कलिनिंग्राड स्टेडियम

वेळ : रात्री ११ :३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३ हिंदी

तुम्हाला हे माहीत आहे?

बेल्जियमने त्यांचे गटातील दोन्ही सामने ३ गोलच्या फरकाने जिंकलेले असून त्यांना नवा विश्वविक्रम खुणावत आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत एकही संघ सलग तीन सामने तीन किंवा त्यापेक्षा अधिक गोलफरकाने जिंकलेला नाही.