इंग्लंड आणि कोलंबियामधल्या बादफेरीच्या रंगतदार सामन्याचा निकाल अखेर पेनल्टी शूटआऊटने लागला. इंग्लंडने पेन्लटी शूटआऊटमध्ये कोलंबियावर ४-३ ने विजय मिळवून उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. निर्धारीत वेळेनंतर देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेळेतही १-१ गोल बरोबरी कायम राहिल्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने पहिल्या दोन संधीचे गोलमध्ये रुपांतर केले पण इंग्लंडच्या जॉर्डनची तिसरी पेनल्टी किक कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हीड ओसपिनाने रोखली. त्यानंतर कोलंबियाच्या उरीबीने चौथी पेनल्टी वाया घालवली. त्यानंतर इंग्लंडकडून ट्रीपरने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही.

कोलंबियाकडून कार्लोस बाक्काने पाचव्या पेनल्टीवर मारलेला चेंडू इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने अडवला. तिथेच इंग्लंडचे मनोबल उंचावले. त्यानंतर डायरने कोणतीही चूक न करता गोल केला आणि इंग्लंडने थरारक पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियावर ४-३ ने विजय मिळवला.

दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत ९३ व्या मिनिटाला कोलंबियाच्या येरी मिनाने हेडरद्वारे शानदार गोल करुन कोलंबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. पण अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले.

दुसऱ्या सत्रात पेनल्टी क्षेत्रात कोलंबियाच्या कार्लोस सांचेझने इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला पकडून ठेवले त्यामुळे इंग्लंडला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. हेरी केनने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही व इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हेरी केनचा वर्ल्डकपमधला हा सहावा गोल आहे. त्यानंतर कोलंबियाला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी गोल आवश्यक होता. अखेर सामना संपायाला काही मिनिटाचा अवधी शिल्लक असताना ९३ व्या मिनिटाला येरी मिनाने हेडरद्वारे गोल करुन बरोबरी साधून दिली होती.

पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. पहिल्या सत्रात इंग्लंडने जोरदार आक्रमक केले पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्राच्या खेळात कोलंबियाचे ४७ टक्के तर इंग्लंडचा ५३ टक्के चेंडूवर नियंत्रण होते. या सामन्यात कोलंबियाचा स्टार खेळाडू  जेम्स रॉड्रिगेज खेळत नाहीय. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता.

कोलंबियाचे आक्रमण हे प्रामुख्याने जेम्स रॉड्रिगेज यांच्यावर अवलंबून होते. रॉड्रिगेज हा २०१४ च्या विश्वचषकातील सर्वाधिक गोल नोंदवलेला खेळाडू होता.