हॅरी केनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला नमवण्याचे कोलंबियापुढे आव्हान

मॉस्को : इंग्लंडचा युवा संघ सध्या पूर्ण बहरात खेळत असून कर्णधार हॅरी केनदेखील दुखापतीतून सावरत पुन्हा सज्ज झाला आहे. अशा इंग्लंडच्या दर्जेदार संघाशी दोन हात करून त्यांच्यावर मात करण्याचे आव्हान कोलंबिया संघापुढे आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असून, बुधवारी सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम खेळणारा संघच पुढे जाऊ शकणार आहे.

बेल्जियमच्या संघाने १९९८ साली फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकात इंग्लंडला २-० असे पराभूत केले होते. त्यानंतरच्या गेल्या २० वर्षांत त्यांना एकदाही इंग्लंडला हरवता आलेले नाही. अखेरच्या साखळी सामन्यात सेनेगलवर मात करत कोलंबियाने गटातील अव्वल स्थान पटकावले होते. कोलंबियाचे आक्रमण हे प्रामुख्याने राडामेल फल्काओ आणि जेम्स रॉड्रिगेज यांच्यावर अवलंबून आहे. रॉड्रिगेज हा २०१४ च्या विश्वचषकातील सर्वाधिक गोल नोंदवलेला आक्रमक ही कोलंबियाची जमेची बाजू असली तरी, तो पुरेसा तंदुरुस्त नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यातही तो खेळणार की नाही? यावर कोलंबियाचे भवितव्य अवलंबून असेल. कोलंबियाला २०१४ प्रमाणे पुन्हा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांना इंग्लंड संघाच्या बचावफळीत त्रुटी शोधून त्यावर हल्ला करावा लागणार आहे. तसेच चेंडूवर अधिकाधिक काळ नियंत्रण राखतानाच इंग्लंडच्या प्रतिहल्ल्यांपासून बचावाची यंत्रणा सक्षम ठेवावी लागणार आहे.

इंग्लंडच्या संघाने साखळी लढतीमध्ये प्रारंभीचे दोन सामने जिंकत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांनी तिसऱ्या सामन्यात सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना संधी दिली होती. त्यामुळे इंग्लंडला बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या संघाला गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र विश्रांतीमुळे मुख्य खेळाडू पुन्हा ताजेतवाने होऊन बुधवारच्या सामन्यात कोलंबियाशी भिडणार असल्याने त्यांच्यात अधिक उत्साह दिसून येत आहे. तसेच त्यानिमित्ताने इंग्लंड संघाच्या पूर्ण ताकदीचा अंदाज या सामन्यातच येऊ शकणार आहे. प्रशिक्षक साऊथगेट यांनी खेळाडूंच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळवले असल्याने या युवा आणि वेगवान संघाकडून अनेकांना अपेक्षा वाटू लागल्या आहेत.

तुम्हाला हे माहीत आहे?

प्रारंभीच्या दोन सामन्यांमध्ये एका हॅट्ट्रिकसह पाच गोल करणारा इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन हा ‘गोल्डन बूट’चा दावेदार आहे. केन हा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये सध्या अग्रस्थानावर आहे.

उपउपांत्यपूर्व फेरी सामना क्र.  ५६

कोलंबिया वि. इंग्लंड

स्थळ : स्पार्टक स्टेडियम, मॉस्को

वेळ : रात्री. ११.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन २,

सोनी ईएसपीएन

 

संभाव्य संघ

कोलंबिया :  डेव्हिड ओसपिना, सॅनटीअ‍ॅगो अरिअस, डेव्हिन्सन सॅँचेज, येरी मिना, जोहान मोजिका, कार्लोस सॅँचेज, मॅटेउस युरीब, ज्युआन कुआड्रॅडो, ज्युआन क्विंटेरो, लुइस मुरिएल, फल्काओ.

इंग्लंड : जॉर्डन पिकफोर्ड, कायले वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्युइरे, किएरान ट्रिपीअर, डेले, जॉर्डन हेंडरसन, जेस लिनगार्ड, अ‍ॅश्ले यंग, रहीम स्टर्लिंग, हॅरी केन.