इंग्लंडने मंगळवारी कोलंबियावर थरारक विजयाची नोंद करतानाच आपल्या संघावरील तो शापही संपवला. इंग्लंडला वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवता आला नव्हता. प्रत्येकवेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये कच खाल्ली होती. पण यावेळी हेरी केनच्या इंग्लिश संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाला ४-३ ने धूळ चारत नवा अध्याय लिहिला.

याआधी वर्ल्डकप स्पर्धेत तीनवेळा इंग्लंडच्या संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला आहे. युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेतही पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा तसाच इतिहास आहे. तिथे चार पैकी तीनवेळा पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव झाल्याची नोंद आहे.

मंगळवारच्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्डनची तिसरी पेनल्टी किक कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हीड ओसपिनाने रोखली. त्यावेळी इंग्लंड स्पर्धेतून गाशा गुंडाळणार असेच क्षणभरासाठी सर्वांना वाटले होते. कारण त्यांचा तसा इतिहासच आहे. पण कोलंबियाचे उरीबी आणि कार्लोस मोक्याच्या क्षणी पेनल्टी किकवर चुकले आणि त्यानंतर डायरने मिळालेल्या संधीचा अचूक लाभ उठवत चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवत इंग्लंडसाठी नवा अध्याय लिहिला.

निर्धारीत वेळेनंतर देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेळेतही १-१ गोल बरोबरी कायम राहिल्यामुळे इंग्लंड-कोलंबिया सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटने लागला. दुसऱ्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत ९३ व्या मिनिटाला कोलंबियाच्या येरी मिनाने हेडरद्वारे शानदार गोल करुन कोलंबियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. पण अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले.