प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी क्रोएशियापुढे इंग्लंडचा अडथळा

मॉस्को : अर्जेटिना, जर्मनी, ब्राझील यांसारख्या फुटबॉलच्या रणांगणातील बलाढय़ देशांचा विश्वचषकात समावेश असताना नवखा, पण इतर संघांप्रमाणेच कौशल्यवान खेळाडूंचा भरणा असलेला क्रोएशियाचा संघ थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारेल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र फुटबॉलच्या प्रेमापोटी संघाला एकत्रित करून स्वप्नवत वाटचाल करणाऱ्या कर्णधार लुका मॉड्रिचचा क्रोएशिया संघ यंदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सरसावला आहे. तब्बल २० वर्षांनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरलेल्या क्रोएशियापुढे १९६६ चे विजेते व २८ वर्षांनी उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या इंग्लंडच्या संघाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे अवघ्या एका पावलाच्या अंतरावर असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहोचण्यासाठी क्रोएशियाला बुधवारी इंग्लंडचा अडथळा पार करावा लागणार आहे.

क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लॅटको डॅलिच यांनी इंग्लंडच्या हॅरी केनला रोखणे अवघड नाही, असे म्हटल्याने, सामन्यापूर्वीच दोन्ही संघांमधील शेरेबाजी सुरू झाली आहे. गेल्या सामन्यात गोल केल्यानंतर टी-शर्ट काढून जल्लोष केल्यामुळे त्यांच्या डोमागोज विडाला पिवळे कार्ड दाखवण्यात आले होते. तसेच गोलरक्षक डॅनिजेल सुबासिचला रशियाविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या निवडीबाबतही अद्याप साशंकता आहे, तरीही मॉड्रिच आणि सहकारी यांना तो सामन्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल याची खात्री आहे. इव्हान रॅकिटिच, इव्हान पेरिसिक यांच्यावर आक्रमणाची जबाबदारी असून मध्यभागात मॉड्रिच त्यांना पुरेसे पासेस देण्यासाठी सक्षम आहे.

कर्णधाराला साजेशी कामगिरी करणारा केन साहजिकच इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय जेसी लिंगार्ड, डेले अली यांच्यावर इंग्लंडची मदार आहे. इंग्लंडने यंदाच्या विश्वचषकाच अनेक प्रयोगही करून पाहिले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत ते कोणती चाल आखतात, हे पाहणे रंजक ठरेल. प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्या प्रशिक्षणाखाली आतापर्यंत धडाकेबाज खेळ करणारा इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, यात शंका नसल्याने बुधवारचा दिवस संपूर्ण फुटबॉलविश्वासाठी एक पर्वणी ठरणार आहे.

लक्षवेधी खेळाडू

क्रोएशिया

लुका मॉड्रिच : क्रोएशियासाठी यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक दोन गोल करणारा व तीन सामनावीराचे पुरस्कार पटकावणाऱ्या कर्णधार लुका मॉड्रिचवर इंग्लंडच्या बचावपटूंना लक्ष ठेवावे लागणार आहे. मध्यरक्षकाची भूमिका पार पाडणारा मॉड्रिच गरज पडल्यास आक्रमकाशिवाय बचावपटूचीही भूमिका बजावू शकतो. धैर्यवान आणि सुरेख नेतृत्वाच्या जोरावर या खेळाडूने क्रोएशियाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

इंग्लंड

हॅरी केन : सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला देण्यात येणाऱ्या ‘गोल्डन बूट’ पुरस्काराचा प्रमुख दावेदार असलेल्या हॅरी केनसाठी हा विश्वचषक म्हणजे एका अभूतपूर्व स्वप्नासारखा आहे. पाच सामन्यांतून सहा गोलसह इंग्लंडला एकटय़ाच्या जिवावर त्याने सहज उपांत्य फेरी गाठून दिली आहे. त्यामुळे त्याच्या वादळी खेळीला रोखण्याचे आव्हान क्रोएशियाच्या बचावपटूंना पेलावे लागणार आहे.

संभाव्य संघ

इंग्लंड

जॉर्डन पिकफोर्ड, कायले वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्वायर, जॉर्डन हेंडरसन, डेले अली, एरिक डायर, जेसी लिंगार्ड, अ‍ॅश्ले यंग, हॅरी केन, रहिम स्टर्लिग.

क्रोएशिया

डॅनिजेल सुबासिच, वेदरान कोर्लुका, देजान लव्हरेन, डोमागोज विडा, इव्हान स्ट्रिनिच, इव्हान रॅकिटिच, मार्सेलो ब्रोझोव्हिच, अँटे रेबिच, लुका मॉड्रिच, इव्हान पेरिसिच, मारियो मँजुकिच.

जागतिक क्रमवारीतील स्थान

क्रोएशिया २०

इंग्लंड १२

वाटचाल

क्रोएशिया

गटसाखळी

विजयी वि. नायजेरिया २-०

विजयी वि. अर्जेटिना ३-०

विजयी वि. आइसलँड २-१

उपउपांत्यपूर्व फेरी

विजयी वि. डेन्मार्क १-१(३-२)

 उपांत्यपूर्व फेरी  

विजयी वि. रशिया २-२(४-३)

इंग्लंड

गटसाखळी

विजयी वि. टय़ुनिशिया २-१

विजयी वि. पनामा ६-१

पराभूत वि. बेल्जियम ०-१

उपउपांत्यपूर्व फेरी

विजयी वि. कोलंबिया १-१(४-३)

उपांत्यपूर्व फेरी

विजयी वि. स्वीडन २-०

’  सामना क्र. ६२ ’  स्थळ : लुझ्निकी स्टेडियम, मॉस्को  ’  वेळ : रात्री ११:३० वा.

’  थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी ईएसपीएन

तुम्हाला हे माहीत आहे?

९ इंग्लंडने क्रोएशियाविरुद्धच्या आतापर्यंत झालेल्या दोन लढतींमध्ये तब्बल नऊ गोल नोंदवले आहेत.

३० मध्यरक्षक जॉर्डन हेंडरसन इंग्लंडसाठी फार नशीबवान ठरला आहे. हेंडरसन खेळलेल्या मागील ३० लढतींपैकी एकही लढत इंग्लंडने गमावली नाही. इंग्लंड फुटबॉलच्या इतिहासातील आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाचे तोंड न पाहणारा तो एकमेव खेळाडू आहे.

९ क्रोएशियाने गेल्या नऊ सामन्यांत किमान एक गोल नोंदवला असून आतापर्यंत त्यांची ही विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

३ इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचल्यास एकाच विश्वचषकात सलग तीन सामन्यांत पेनल्टी शूटआऊट खेळणारा क्रोएशिया हा एकमेव संघ ठरेल.

५ यंदाचा विश्वचषक युरोपियन देशांसाठी लाभदायक ठरला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पाचव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करणारे चारही संघ युरोपियन खंडातील आहेत. यापूर्वी १९३४, १९६६, १९८२ आणि २००६ मध्ये युरोपमधील चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते.

तणाव झुगारून इंग्लंडच्या खेळाडूंची मस्ती

विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हटला की कोणताही संघ फक्त सरावावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो. मात्र इंग्लंडचे खेळाडू आणि खुद्द प्रशिक्षक याला अपवाद आहेत. मंगळवारी सकाळी सराव करण्याऐवजी त्यांनी थेट मॉस्कोपासून तब्बल ४५ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या रेपिनो रिसॉर्ट गाठले. तेथे त्यांनी दडपण झुगारून पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांची ही अनोखी चाल आता इंग्लंडला कशाप्रकारे उपयोगी येते, हे उपांत्य फेरीच्या सामन्यातच कळेल.

लुझ्निकी स्टेडियम माजी विजेत्यांसाठी अपयशी?

गतविश्वविजेत्या जर्मनीला गटसाखळीतील पहिल्याच सामन्यात मेक्सिकोने १-० अशी धूळ मॉस्कोच्याच लुझ्निकी मैदानावर चारली होती. तसेच यजमान रशियाने माजी विजेत्या स्पेनला येथेच पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असे पराभूत करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे कझान एरिनानंतर लुझ्निकी स्टेडियम माजी विजेत्यांसाठी अपयशी ठरत आहे. तेव्हा आता इंग्लंडवरसुद्धा अशी वेळ ओढावणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.