रशिया व इंग्लंड यांच्यातील फुटबॉल सामन्याच्या वेळी इंग्लंडच्या चाहत्यांना भीती असते ती त्यांच्यावर हल्ले होण्याचीच. यंदाही रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धा त्यास अपवाद नाही. इंग्लंडचे काही चाहते येथे त्यांच्या मित्रांकडे राहत आहेत. त्यांना आपल्या जिवाचीच काळजी वाटू लागली आहे.
‘‘दोन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये मर्सिली येथे झालेल्या युरोपियन लीग सामन्याच्या वेळी इंग्लंडच्या चाहत्यांवर रशियन चाहत्यांकडून हल्ले करण्यात आले होते. अर्थात मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. आम्ही साधारणपणे दीडशे चाहते केवळ फुटबॉलच्या प्रेमापोटी येथे आलो आहोत,’’ असे इंग्लिश चाहते बॉब ग्रीन यांनी सांगितले. इंग्लंडच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही आपल्या चाहत्यांची काळजी वाटत असते. त्यामुळेच तेथे येथील स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास तयार असतात.
‘‘रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक परदेशी चाहत्यांची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्हालाही येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत खात्री वाटत आह़े,’’ असे विदेश सचिव बोरिस जॉन्सन म्हणाले.
‘‘आमच्या चाहत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र रशियन पोलिसांबरोबर आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यांच्यावरही विश्वास ठेवला पाहिजे व त्यांच्याशी सौहार्दपूर्वक संबंध ठेवणे आवश्यक आहे,’’ असे ब्रिटिश फुटबॉल पोलीस पथकाचे उपप्रमुख मार्क रॉबर्ट्स यांनी सांगितले.
अर्जेटिना फुटबॉल संघाला मार्गदर्शनासाठी केम्पेस उत्सुक
रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर अर्जेटिनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या अनेक माजी खेळाडूंनी तयारी दर्शवली आहे. दिएगो मॅराडोना यांच्याबरोबरच मारिओ केम्पेस यांनीही प्रशिक्षकपदावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
केम्पेस यांनी १९७८ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत दोन गोल करीत संघास विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. केम्पेस हे सध्या समालोचक म्हणून काम करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 7, 2018 2:31 am