16 January 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : मच्चाsss… देवभूमी केरळात अशी पसरतीये फुटबॉलची जादू

इथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांच्या तुलनेत ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन संघांना जास्त लोकप्रियता मिळाली आहे.

केरळ, fifa 2018 kerala

FIFA World Cup 2018. फुटबॉल विश्वचषकासाठी आता अवघे काही तास उरले असल्यामुळे सध्या क्रीडाप्रेमींमध्ये याच खेळाविषयीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘अँड इट्स अ फॅन्टास्टिक पास अँड इट्स अ गोsssssल’ असे शब्द कानांवर पडल्यावर गोल पोस्टमध्ये करण्यात आलेला तो गोल पाहूनच अनेकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे असतात. सध्या फक्त रशियातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात फिफाविषयीचं वेड पाहायला मिळत आहे. भारतातही काही अशी राज्य आहेत, ज्या ठिकणी असणारी फुटबॉल प्रेमींची संख्या अनेकांनाच थक्क करुन जाते. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे केरळ. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निसर्गरम्य ठिकणी सध्या रंग चढले आहेत ते म्हणजे फिफा २०१८ चे.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीलगत असणाऱ्या या राज्यात मेस्सी, रोनाल्डो आणि नेमारची चक्क पूजाच केली जात आहे, असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असणाऱ्या भारतात फुटबॉल या खेळाप्रती असणारी इतकी आत्मियता आणि प्रेम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पण, हे फुटबॉल प्रेम काही नवं नाही हेसुद्धा तितकच खरं.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून घर, रस्ते, रस्त्यांवरचे दगड इतकच नव्हे तर झाडांवरच्या फणसांवरही फुटबॉलचे रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे. पाण्याचा नळ म्हणू नका, बंगल्याचा गेट म्हणू नका किंवा मग दुचाकी म्हणू नका प्रत्येक गोष्टीला या फुटबॉलप्रेमींनी एका वेगळ्याच रंगामध्ये रंगवलं आहे. केरळमध्ये असणाऱ्या फुटबॉल प्रेमींविषयी सांगावं तर, इथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांच्या तुलनेत ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन संघांना जास्त लोकप्रियता मिळाली आहे. त्यामंगचं कारण असणारी दोन नावं म्हणजे लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तीयानो रोनाल्डो.

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

केरळमध्ये या खेळाविषयी इतकं प्रेम रुजण्यासाठी पोर्तुगीजांचा या भागावर असणारा प्रभावही काही अंशी जबाबदार असल्याचं स्थानिकांचं मत आहे. ज्याप्रमाणे ब्रिटीश भारतात क्रिकेट हा खेळ घेऊन आले, त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनी फुटबॉल हा खेळ भारतात आणला. अगदी सुरुवातीपासूनच इथे या खेळाला राजाश्रय मिळाला. ६०- ७० च्या दशकात इथे दिएगो मॅराडोना आणि पेले या दोन खेळाडूंना जितकी लोकप्रियता प्राप्त होती तितकीच लोकप्रियता त्यांना आजही मिळते आहे. किंबहुना असंही म्हणतात की या ठिकाणी या दोन महान खेळाडूंचा वसा चालवणाऱ्या मेस्सी आणि नेमारलाही इथे भरभरुन प्रेम मिळतं.

फिफा विश्वचषक, लीग सामने किंवा फुटबॉल क्लबमध्ये होणारे सामने असो. मुळातच केरळमध्ये या खेळाशी अनेकांचच एक भावनिक नातं जोडलं गेलं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शेजारी राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाविषयी इथल्या कोणा एका नागरिकाला माहिती नसली तरीही काका, रोनाल्डो, रोनाल्डिनो हे कोण आहेत याविषयी माहिती देण्यात ते अजिबात चुकणार नाहीत हेसुद्धा अगदी खरं. तेव्हा आता दाक्षिणात्य अंदाजातच म्हणायचं झालं तर ‘मच्चा… नान्नल तय्यारन’ असंच केरळातील फुटबॉलप्रेमी म्हणत आहेत.

First Published on June 13, 2018 1:29 am

Web Title: fifa world cup 2018 fever indian football crazy fans in kerala