FIFA World Cup 2018 FINAL : विश्वचषक स्पर्धेत रविवारी फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. त्यांनी क्रोएशियाचा ४-२ असा पराभव केला. फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल करण्यात आले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. या सामन्यात फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांनी मैदानाबाहेर बसून एक विक्रम केला.

आजचा सामना फ्रान्सने जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले. याच विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले. १९९८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत देशॉ हे फ्रान्सच्या संघात होते. तर आज झालेल्या सामन्यात ते फ्रान्सचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. यापूर्वी ब्राझिलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे.

दरम्यान, या सामन्यात १८व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आत्मघातकी झाला. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात पोगबाने ५९व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल करत फ्रान्सला ४-२ ने आघाडीवर नेले. सामन्यात मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला त्यापुढे जाऊ दिले नाही. अखेर रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्सने सामना ४-२ने जिंकला.