16 December 2019

News Flash

FIFA World Cup 2018 FINAL : एमबापेने पुन्हा एकदा केली पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी

उत्तरार्धात एमबापेने केलेला गोल हा ऐतिहासिक ठरला. याआधीही याच स्पर्धेत कायलिन एमबापे याने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

कायलिन एमबापे

FIFA World Cup 2018 FINAL : विश्वचषकच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ने दणदणीत विजय मिळवून २० वर्षानंतर पुन्हा एकदा जगज्जेतेपद पटकावले. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला.

त्यापैकी उत्तरार्धात एमबापेने केलेला गोल हा ऐतिहासिक ठरला. क्रोएशियाने उत्तरार्धात आक्रमणाला सुरुवात केली. मात्र त्यांचे आक्रमण बोथट ठरले. दरम्यान पॉल पोगबाने ५९व्या मिनिटाला दुसऱ्या प्रयत्नात गोल केला आणि फ्रान्सला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला या सामन्यातील एक ऐतिहासिक गोल पाहायला मिळाला. युवा खेळाडू कायलिन एमबापे याने हा गोल केला. या गोलमुळे तब्बल ६० वर्षानंतर अंतिम सामन्यात एका युवा खेळाडूने गोल करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. १९५८ साली ब्राझीलचे दिग्गज माजी फुटबॉलपटू पेले यांनी अंतिम सामन्यात गोल केला होता. त्यानंतर अशी कामगिरी करणारा एमबापे हा पहिला युवा खेळाडू ठरला.

याआधीही याच स्पर्धेत कायलिन एमबापे याने पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. तो फिफा विश्वचषकाच्या एकाच सामन्यात दोन गोल करणारा पेले यांच्यानंतरचा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. एमबापेने अर्जेन्टिनाविरुद्ध बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात दोन गोल डागले होते. दरम्यान, आजच्या सामन्यात त्याच्या गोलमुळे फ्रान्सला २ गोलच्या फरकाने विजय मिळवता आला.

तत्पूर्वी, सामन्याच्या पूर्वार्धात दोनही संघांकडून जोरदार अॅक्शन पाहायला मिळाली. सामन्याच्या १८व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र हि आघाडी जास्त काळ टिकली नाही. २८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. याचा फ्रान्सने लाभ घेतला. अनुभवी ग्रीझमनने थेट गोल करत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी राखण्यात फ्रान्सला यश आले होते.

First Published on July 16, 2018 12:28 am

Web Title: fifa world cup 2018 final fra vs cro france croatia world champion kylian mbappe
Just Now!
X