FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. आज स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना होणार असून रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यासाठी फ्रान्सच्या संघाने मंगळवारी बेल्जीयमला पराभूत करून आपले स्थान निश्चित केले आहे. तर इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. यातील विजेता संघ फ्रान्सशी भिडणार आहे.

फिफाच्या अध्यक्षांकडून विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेकांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र त्यापैकी गेले काही दिवस चर्चत असलेले १३ जण येऊ शकणार नाहीत. थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने २३ जूनपासून अडकले होते. हे १३ जण बेपत्ता झाले होते, मात्र बाहेर त्यांनी केलेल्या पार्क केलेल्या सायकलवरून ते लोक आत अडकल्याचे समजले होते. त्यानंतर हे १३ लोक जिवंत आहेत आणि अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकले आहेत, असे निष्पन्न झाले होते. या १३ जणांची काल सुटका करण्यात आली.

या १३ जणांना फिफाच्या अध्यक्षांनी अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र अनेक दिवस गुहेत राहिल्याने त्यांना एका प्रकारचा संसर्ग झाला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.दरम्यान, हे १३ लोक सध्या इतका प्रवास करण्यास सक्षम नाहीत. त्यांना तंदुरुस्त होण्यास आणखी काळ लागेल, अशी माहिती थायलंडच्या फुटबॉल संघटनेकडून देण्यात आले आहे.

हे १३ लोक ज्यावेळी त्या गुहेमध्ये अडकले होते, तेव्हा या लोकांच्या सुटकेसाठी सर्वत्र प्रार्थना करण्यात येत होती. त्याच वेळी फिफाचे अध्यक्ष यांनी या १३ जणांना विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. सर्वांना त्यांच्या सुटकेची चिंता असताना फिफाचे अध्यक्ष त्यांना सामना पाहण्यासाठी बोलवतात, या गोष्टीवरून त्याच्यावर टीकाही झाली होती.