नितीन मुजुमदार – response.lokprabha@expressindia.com
क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात पश्चिम बंगाल, गोवा, केरळ तसंच पूर्वोत्तर राज्यांमध्ये मात्र फुटबॉल कमालीचे लोकप्रिय आहे.

‘फिफा’ने आपली वर्ल्ड रँकिंग्ज यादी १७ मे २०१८ रोजी अपडेट केली तेव्हा भारतीय फुटबॉल संघ या रँकिंग्ज लिस्ट मध्ये ९७व्या क्रमांकावर होता. जर्मनी, ब्राझील व बेल्जियम या यादीमधील पाहिले तीन संघ आहेत. ही यादी ७ जून रोजी पुन्हा अपडेट होईल. मात्र भारताच्या ९७ व्या क्रमांकामध्ये फरक पडण्याची शक्यता जवळपास नाहीच. भारतीय फुटबॉल संघाने फेब्रुवारी १९९६ मध्ये ९४ हे आपले आजवरचे सर्वोत्तम रँकिंग मिळविले होते. १९५० ते १९६४ दरम्यान भारतीय फुटबॉलने तुलनेत चांगले दिवस बघितले. या कालावधीत भारतीय संघाने १९५१ व १९६४ अशा दोन आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. १९५६च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथा क्रमांक मिळविला. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत भारत बल्गेरिया कडून ०-३ असा पराभूत झाला.

तसे पाहिले गेले तर भारतात फुटबॉल हा काही मर्यादित भागांमध्येच गांभीर्याने खेळला जातो. पश्चिम बंगाल व गोवा या दोन राज्यांमध्ये हा खेळ बराच रुजला आहे. केरळही त्यांच्या पाठोपाठ आहे. अगदी अलीकडे म्हणजे गेल्या दोन दशकांमध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये फुटबॉल अगदी वेगाने पसरतोय व या राज्यांनी अगदी अल्पावधीत फुटबॉलमध्ये आश्चर्यकारक प्रगती नोंदविली आहे.

भारतामध्ये फुटबॉल सर्वप्रथम रुजला तो पश्चिम बंगालमध्ये. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस कोलकाता शहर ब्रिटिशकालीन भारताचे राजधानीचे शहर होते. त्याच सुमारास म्हणजे १८८९ साली, मोहन बागान या पश्चिम बंगालमधील नामवंत फुटबॉल क्लबची स्थापना झाली. ब्रिटिशांनी भारतात आणलेल्या या खेळातील ग्लॅडस्टोन चषक १९०५ साली मोहन बागानने जिंकला. १९०६ ते १९०८ दरम्यान  मोहन बागानने ब्रिटिशांनीच सुरू केलेली ट्रेडर्स चषक स्पर्धाही जिंकली. या यशाची परिसीमा मोहन बागानने १९११ साली आयएफए शिल्ड जिंकताना यॉर्कशायर रेजिमेंट या पूर्णत: ब्रिटिश संघाला, अनवाणी खेळताना अंतिम फेरीत २-१ असे पराभूत करून गाठली! याच स्पध्रेत मोहन बागानने चार इतर ब्रिटिश क्लबनादेखील हरविले. या विजयामुळे प. बंगाल व फुटबॉल यांचे दृढ नाते जुळले ते अगदी आजपर्यंत! आजही मोहन बागान व ईस्ट बंगाल (स्थापना १९२०) यांच्यातील पारंपरिक सामना सर्वाधिक प्रेक्षक संख्येचे रेकॉर्ड कायम करीत असतो! अगदी ‘फिफा’नेही या लढतीची दखल घेतली आहे. मोहमेडन स्पोर्टिग हा संघही पश्चिम बंगालमधील बलवान संघांपकी एक. त्याची स्थापनाही एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस झाली. संतोष ट्रॉफी ही भारतातील महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धापकी एक. ही स्पर्धा पश्चिम बंगालने ३१ वेळा जिंकली आहे तर १२ वेळा ते उपविजेते ठरले आहेत.

पश्चिम बंगालनंतर भारतात फुटबॉल सखोल रुजलेले दुसरे राज्य म्हणजे गोवा. जेमतेम साडेचौदा लाख लोकसंख्या व ३७०२ स्क्वेअर किमी भूभाग असलेल्या गोव्यात फुटबॉलने पाळेमुळे घट्ट रुजविली ती ४५० वष्रे गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगीजांच्या काळात. १९९६ साली नॅशनल फुटबॉल लीगला सुरुवात झाली तेव्हा गोवा व प. बंगाल या दोनच राज्यांना प्रत्येकी दोन संघ स्पध्रेत पाठविण्याची परवानगी देण्यात आली होती. नॅशनल फुटबॉल लीग व आय लीग या स्पध्रेच्या २० वर्षांच्या इतिहासात गोव्यातील तीन संघांनी एकूण नऊ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे तर पश्चिम बंगालमधील दोन संघांनी एकूण सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यावरून भारतीय फुटबॉलमधील या राज्यांचे महत्त्व लक्षात येईल. फुटबॉलला राज्य स्तरीय खेळ म्हणून गोव्याने २०१२ साली मान्यता दिली. तसे करणारे गोवा हे पहिलेच राज्य. समीर नाईक, क्लीफर्ड मिरांडा, ब्रुन्हो कुटिन्हो हे गोव्याचे राष्ट्रीय स्तरावर चमकलेले फुटबॉलपटू. ब्रह्मानंद सांखवळकर हा गोव्याचा राष्ट्रीय स्तरावर चमकलेला गोलकीपर. अर्जुन पुरस्कार मिळालेला तो पहिला गोव्याचा फुटबॉलपटू. हाच पुरस्कार ब्रुन्हो कुटिन्हो यांनाही मिळाला. गोव्यामध्ये १४ तसेच २० वर्षांखालील फुटबॉलपटूंसाठी नियमित लीग स्पर्धा होतात. एवढय़ा छोटय़ा राज्यात २०० हून अधिक नोंदणीकृत फुटबॉल क्लब्ज आहेत व त्याहून अधिक संख्येने निगा राखलेली मदानेही गोव्यात आढळतात. वास्को, साळगावकर, डेम्पो हे गोव्यातील राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले काही क्लब्ज.

केरळमध्येही फुटबॉल लोकप्रिय असला तरी गोवा व पश्चिम बंगालएवढी घट्ट पाळेमुळे रुजलेली नाहीत. आय. एम. विजयन, जो पॉल अंचेरी हे प्रसिद्ध फुटबॉलपटू केरळमधील.

भारतीय फुटबॉलमध्ये २१व्या शतकाच्या अखेपर्यंत गोवा व पश्चिम बंगालचे वर्चस्व होते. आजही ते काही प्रमाणात कायमच आहे. मात्र चालू शतकाच्या सुरुवातीस पूर्वोत्तर राज्यांनी फुटबॉलमध्ये प्रगती करण्यास सुरुवात केली आणि आज भारतात सर्वाधिक आणि आश्चर्यकारक वेगाने फुटबॉल कोठल्या भागात वाढत असेल तर तो पूर्वोत्तर राज्यांमध्ये! गतवर्षी भारतात १७ वर्षांखालील फुटबॉलपटूंची विश्वचषक कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या स्पध्रेत खेळण्यासाठी यजमान या नात्याने भारतही पात्र ठरला होता. या भारतीय संघात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ११ खेळाडू पूर्वोत्तर राज्यांचे होते आणि पकी आठ खेळाडू एकटय़ा मणिपूरचे होते. याच संघात एकेकाळी पॉवर हाऊस समजल्या गेलेल्या पश्चिम बंगालचे तीन तर केरळचा एक खेळाडू होता. गोव्याचा तर एकही खेळाडू या भारतीय संघात नव्हता!! आजही वरिष्ठ स्तरावर गोवा व पश्चिम बंगालचे खेळाडू चांगल्या संख्येने दिसतात. मात्र उदयोन्मुख, प्रतिभाशाली व तरुण खेळाडू देशाला पूर्वोत्तर राज्यांमधूनच मिळत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

पूर्वोत्तर राज्यांमध्ये फुटबॉलची ही वाढ क्रिकेटला तोंड देऊन कशी झाली असेल? याचे एक प्रमुख कारण म्हणजे भारतभर पसरलेल्या क्रिकेटचे अस्तित्व या भागात नगण्य आहे. पूर्वोत्तर भारतात एकूण सात राज्ये आहेत व यापकी केवळ आसाम व त्रिपुराचेच संघ रणजी स्पध्रेत दिसतात आणि तेही नावापुरतेच! पूर्वोत्तर राज्यांमध्ये डोंगराळ प्रदेश भरपूर आहे. निसर्गत: येथील जनतेला काटक असण्याचे वरदान आहे, कष्ट करण्याची सवय आहे. मेरी कोम, दीपा कर्माकर ही इतर खेळातील मोठी नावेही याच प्रदेशातील!

फुटबॉलची येथे प्रगती होण्यासाठी येथील राज्य असोसिएशनने बरेच प्रयत्न केले आहेत. मणिपूरने नुकतेच स्टेडियमचे छान नूतनीकरण केले आहे तर मिझोराममध्ये फुटबॉलसाठी कृत्रिम टर्फची मदाने आहेत. देशातील सर्वात अलीकडचा फुटबॉल पोस्टरबॉय बायचुंग भूतिया हा सिक्कीमचाच. युरोपियन लीग खेळणारा तो केवळ दुसरा भारतीय फुटबॉलपटू.

२००२ साली मणिपूरने संतोष करंडक स्पर्धा जिंकली आणि पूर्वोत्तर राज्यांच्या भारतीय फुटबॉलमधील प्रभावशाली कारकीर्दीस सुरुवात झाली. भारतीय फुटबॉल फेडरेशनचा तत्कालीन संचालक रॉब बानने असोसिएशनने आपला पायलट प्रोजेक्ट मिझोराममधून लॉन्च करावा असे सुचविले ते मिझोराममधील टॅलेंट पूल बघूनच.

मात्र मेघालय, मिझोराम व मणिपूर वगळता इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये फुटबॉलच्या प्रगतीने अजून वेग पकडलेला नाही. नागालँड, त्रिपुरा, आसाम व अरुणाचल प्रदेशमध्ये परिस्थिती फुटबॉलसाठी उत्साहवर्धक नाही.

वरिष्ठ गटात आजही पारंपरिक दादा संघानेच वर्चस्व आहे मात्र उदयोन्मुख गुणवत्तेसाठी आज पूर्वोत्तर राज्यांना पर्याय नाही अशी परिस्थिती आहे.

गत वर्षी मिझोरामची राजधानी आयझोल येथे दिल्लीहून सेकंड डिव्हिजन आय लीग क्लब सुदेवा एफसीतर्फे काही मंडळी गुणवत्ता हेरण्यासाठी गेली होती. १४ वर्षांखालील गुणवान फुटबॉलपटू ते शोधत होते. आयझोल येथील राजीव गांधी स्टेडियम येथे ही निवड चाचणी घेण्यात आली. भारतभर फिरून आलेल्या सुदेवा क्लबच्या पदाधिकाऱ्यांना असे वाटत होते की, येथे फुटबॉल खूप लोकप्रिय आहे, तेव्हा १००-१५० मुले निवड चाचणीसाठी येतील. त्यांना येथे आश्चर्याचा मोठा धक्का बसला. वेगवेगळ्या सहा पर्वतांमध्ये वसलेल्या आयझोलमधून तब्बल ८००हून अधिक मुले निवड चाचणीसाठी येऊन शिस्तबद्धरीत्या शांतपणे बसली होती!

या छोटय़ा मुलांची वर्गवारी अशी होती. १४ वर्षांखालील २१३ मुले, १३ वर्षांखालील १५० मुले आणि १२ वर्षांखालील ४४८ मुले!

एकूण मुले ८११!

या प्रदेशाची एकूण लोकसंख्या भारताच्या तीन टक्के आहे मात्र भारतातील एकूण व्यावसायिक फुटबॉलपटूंपकी २० टक्के या प्रदेशातून येतात! टॉप डिव्हिजनमध्ये खेळणाऱ्या ३०० खेळाडूंपकी १०० हे पूर्वोत्तर राज्यांमधून येतात! मिझोरामचा रॉयल वािहगडोह क्लब २०१५ साली आय लीगमध्ये तिसरा आला. मिझोरामला उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल २१ पर्वतरांगांनी वेढले आहे त्यामुळे सपाट मदाने दुर्मीळच आणि नसíगक हिरवळींची मदानेही संख्येने कमी! त्यामुळे कृत्रिम हिरवळींची मदाने ते अनेक वेळा वापरतात. मिझोरामचा पहिला व्यावसायिक फुटबॉलपटू शायलो माल सावामलुवांगा ऊर्फ मामा याच्याबाबत घडलेल्या एका गमतीदार घटनेचा येथे उल्लेख करावासा वाटतो. सुब्रतो कप या भारताच्या राष्ट्रीय आंतरशालेय फुटबॉल स्पध्रेतील चमकदार कामगिरीनंतर आयझोलपासून २०० किमी अंतरावर राहणाऱ्या मामाला टाटा फुटबॉल अकादमी, जमशेदपूरने करारबद्ध केले. त्यानंतर मिझोरामचा पाहिला व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून ईस्ट बंगालने त्याला करारबद्ध केले, कराराची पहिली रक्कम म्हणून दीड लाख रुपयांचा चेक त्याला देण्यात आला. मात्र त्याने अनेक दिवस त्या चेकचे काय करायचे हे माहिती नसल्याने त्याने तो चेक आपल्या घरात नुसताच ठेवून दिला! एका मित्राने हा कागद खूप महत्त्वाचा आहे एवढेच त्याला सांगितले होते! आज लाऊमल स्टेडियममधील एका स्टॅण्डला मामाचे नाव देण्यात आले आहे.

वेगवेगळ्या परिस्थितीतून पुढे येण्यासाठी झगडत असणारे असे अनेक मामा आजही पूर्वोत्तर राज्यांमध्ये आहेत. भारताच्या मुख्य प्रवाहात अधिक वेगाने येण्यासाठी या राज्यांना हा फुटबॉलचा पूल उपयोगी पडू शकेल. मागील दोन दशकांपासून याबाबत परिस्थिती अधिक आशादायी होत आहे!