फिफा विश्वचषक स्पर्धेच्या महोत्सवासाठी मुंबईतील चार खेळाडूंची निवड

मुंबई : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा ज्वर चढू लागलाय.. कोटय़ावधी भारतीय फुटबॉलच्या या महोत्सवाचा आनंद घेताहेत.. क्रिकेटच्या या देशात या खेळाची लोकप्रियता वाढू लागली असली तरी या विश्वचषकात खेळण्याचे अनेक भारतीय फूटबॉलपटूंचे स्वप्न अधुरे राहिले आहे. अशा स्थितीत मुलभूत गरजा भागवणेही कठीण असलेल्या परिस्थितीतील सहा मुले विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाली आहेत. फिफाकडून २६ जून ते ३ जुलैदरम्यान रशियात खेळवण्यात येणाऱ्या ‘फुटबॉल फॉर होप’मध्ये मुंबईतील चार आणि झारखंडतील दोन असे सहा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने फुटबॉल खेळू इच्छिणाऱ्या परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे संधी मिळू न शकलेल्या खेळाडूंसाठी फुटबॉल फॉर होप महोत्सव आयोजित केला जातो. यात प्रत्येक देशातून एका सामाजिक संस्थेची निवड केली जाते आणि त्या माध्यमातून जगभरातील खेळाडूंना फुटबॉलचे व्यासपीठ उपलब्ध केले जाते. यंदा भारतामधून ऑस्कर फाऊंडेशनची निवड झाली असून मुंबईतील कफ परेड भागातील आंबेडकर नगर या वस्तीमधील पूनम गौतम, अक्षय चौहान, लालू राठोड यांच्यासह ठाण्यातील श्रद्धा अहेर या चौघांना रशियाला जाण्याची संधी मिळाली आहे. यात इतर ४३ देशांमधील खेळाडूही सहभागी होणार आहेत.

प्रतिकूल परिस्थितीशी झगडत फुटबॉल खेळणारी पूनम ही त्यांच्या समाजातून भारताबाहेर जाणारी पहिलीच मुलगी आहे. मी मुलगी असून खेळायला पाठवितात, म्हणून वस्तीतले लोक नेहमी माझ्या घरच्यांना बोलायचे. मात्र आता मी बाहेरच्या देशात जाणार असे कळल्यानंतर आमच्या मुलीलापण फुटबॉल शिकवा, असे वस्तीतले लोक सांगतात, तेव्हा खरंच भारी वाटतं, असे पूनमने सांगितले.

या घटनेमुळे वस्तीतल्या १५ मुली फुटबॉल शिकण्यासाठी तयार झाल्या आहेत. मला तर चांगला खेळाडू व्हायचं आहेच, पण त्याचबरोबर वस्तीतल्या इतर मुलींनाही सोबत न्यायच आहे, असेही पूनम म्हणाली.

मच्छिमारीचे काम करणारे वडील आणि साफसफाईचे काम करणारी आई यांच्यासोबत राहणारा अक्षय चौहान हा वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे.

लहानपणी पाठीच्या भागात छोटीशी शस्त्रक्रिया झाल्याने खेळापासून दूर राहिलेला अक्षय आज अत्यंत चागंला खेळ खेळतो आणि फुटबॉलचा प्रशिक्षक बनण्याची त्याची इच्छा आहे. बाहेरचा देश, तिथले लोक पाहण्याबरोबरच नेयमारला भेटण्याची त्याला फार उत्सुकता आहे. लालू राठोड याच्या दृष्टीने पहिल्यांदाच घडणारा विमान प्रवास आणि इतर देशातील लोकांचा खेळ या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.

‘शिकविणे हेच ध्येय’

माझ्यासारख्या मुलींना फुटबॉलच्या माध्यमातून स्वत:चं भविष्य घडवता यावं, यासाठी मी इतर मुलींनाही शिकविते. विश्वचषकात सहभागी होण्याचा टप्पा खूपच महत्त्वपूर्ण आहे, असे श्रद्धा अहेरला वाटते. हे चारही खेळाडू ऑस्कर फाऊंडेशनच्या युवा नेतृत्त्व कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या वस्तीमधल्या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतातच आणि त्याचसोबत आत्मविश्वास, आरोग्य, स्त्री-पुरुष समानता आदी जीवन कौशल्याचीही ओळख करून देतात. झारखंडमधील शीतल टोप्पो, सोनी कुमारी या रशियाला जाणार आहेत. या निमित्ताने दुसऱ्या देशातील मुलांसोबत वावरण्याची संधी या मुलांना मिळणार आहे.येत्या २३ जूनला आम्ही रशियासाठी निघणार आहोत, असे ऑस्कर फाऊंडेशनचे संस्थापक अशोक राठोड यांनी सांगितले.