FIFA World Cup 2018 FRA vs PER : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या क गटाच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सने पेरूचा १-० असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत अनुक्रमे ७व्या आणि ११व्या स्थानी असलेल्या तुल्यबळ संघांच्या लढतीत फ्रान्स पेरूवर भारी पडला. फ्रान्सतर्फे १९ वर्षीय कायलिन एमबापे याने ३४ व्या मिनिटाला गोल केला. फ्रान्सने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे फ्रान्सने सामना जिंकला.

सामना सुरु झाल्यापासून फ्रान्सची आक्रमण फळी अत्यंत तीव्रपणे गोलपोस्टवर आक्रमण करत होती. एमबापे, ग्रीझमान आणि मातुडी या आक्रमण फळीने पेरूच्या गोलपोस्टवर सतत हल्ला चढवला. अखेर कॉर्नरवरून आलेल्या फुटबॉलला १९ वर्षीय कायलिन एमबापे याने अत्यंत शिताफीने दिशा दिली. पास केलेल्या फुटबॉलला गोलकिपरची नजर चुकवत त्याने गोल केला. फ्रान्सकडून एखाद्या मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषक किंवा युरो कपमध्ये गोल करणारा एमबापे हा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

याशिवाय, फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा कायिलन एमबापे ठरला १९९८नंतर जन्मलेला पहिला खेळाडू ठरला. १२ जुलै १९९८ रोजी फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला होता.

दरम्यान, क गटात फ्रान्सचा हा दुसरा विजय ठरला. या विजयामुळे फ्रान्सला ६ गुणांसह बाद फेरीत स्थान मिळाले आहे. तसेच दक्षिण अमेरिकन संघाविरुद्ध सलग ७ सामन्यांत फ्रान्सने क्लिनस्वीप दिली.