फिफा विश्वचषक स्पर्धा ही आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. आजपासून या स्पर्धेत उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. आज फ्रान्स विरुद्ध बेल्जीयम असा तुल्यबळाचा सामना असणार आहे. तर उद्या स्पर्धेत ‘अंडरडॉग्स’ समजला जाणारा इंग्लंडचा संघ अपराजित क्रोएशियाशी भिडणार आहे. ब्राझीलचा महान खेळाडू पेले याने एक भविष्यवाणी केली होती. २१व्या शतकापर्यंत आफ्रिकन संघ विश्वचषक स्पर्धा नक्की जिंकेल, असे त्याने म्हटले होते. पण १९८२ सालापासून प्रथमच एकही आफ्रिकन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरलेला नाही. पण तसे असले तरीही, या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये निर्वासितांचा भरणा अधिक आहे आणि विशेष म्हणजे यात आफ्रिकन खेळाडूही अधिक आहेत.

या स्पर्धेसाठी उपांत्य फेरीत चार संघ पोहोचले आहेत. त्यापैकी ३ संघांमध्ये निर्वासित खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. या स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी सर्वप्रथम पात्र ठरलेल्या फ्रान्सच्या संघात सर्वाधिक निर्वासित खेळाडू आहेत. या संघातील २३ खेळाडूंपैकी तब्बल ७८.३ टक्के खेळाडू म्हणजेच जवळपास दोन तृतीयांश खेळाडू हे निर्वासित आहेत. या संघाची तुलना १९९८ साली फ्रान्सच्या संघात असलेल्या गौरवर्णीय-कृष्णवर्णीय-अरब अशा संघाशी केली जात आहे. १९९८ साली फ्रान्सने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. अशाच पद्धतीची किमया फ्रान्स यंदाही करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कायलिन एमबापे हे त्याचे ताजे आणि चपखल बसणारे उदाहरण आहे.

याशिवाय, उपांत्य फेरीतील इतर दोन संघ म्हणजेच बेल्जीयम आणि इंग्लंड यांचीही मदार निर्वासितांवर आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या आकडेवारीनुसार, बेल्जीयम आणि इंग्लंड या दोनही संघांमध्ये प्रत्येकी ४७ टक्क्यांहून अधिक खेळाडू हे निर्वासित आहेत.