FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने बेल्जियमवर १-०ने मात केली. या सामन्यात फ्रान्सचा बचावपटू उमटिटी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर फ्रान्सने सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. १९९८ पासून तिसऱ्यांदा फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. सामन्याचा पूर्वार्ध हा गोलशून्य बरोबरीत सुटला.

उत्तरार्धात मात्र फ्रान्सकडून तीव्र आणि आक्रमक खेळ पाहायला मिळाला. ५१व्या मिनिटाला फ्रान्सकडून बचावपटू सॅम्युअल उमटिटीने हेडरच्या माध्यमातून गोल केला. ग्रीझमनने या गोलमध्ये सहाय्यक खेळाडूची भूमिका पार पाडली. सामन्याच्या निर्धारित वेळेनंतर ६ मिनिटांच्या अतिरिक्त कालावधीतही बेल्जियमला बरोबरी साधता आली नाही.

या सामन्यात फ्रान्सचा आक्रमणपटू पॉल पोगबा याच्या अनुभवाचा फ्रान्सला पुरेपूर फायदा मिळाला. सामन्यात चेंडूवर नियंत्रण मिळवणे, वेळेवर चेंडू पास करत चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात घेऊन जाणे आणि बेमालूमपणे प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या नाकाखालून चेंडू काढून घेणे अशा विविध करामती पोगबाने कालच्या सामन्यात लीलया केल्या. परिणामी, या सामन्यात बेल्जीयमला एकही गोल करता आला नाही. आणि फ्रान्स २० वर्षात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला.

महत्वाचे म्हणजे या सामन्यातील विजय आणि अंतिम सामन्यातील प्रवेश हा पोगबाने गुहेतून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या थायलंडच्या संघाला समर्पित केला आहे. थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने २३ जूनपासून अडकले होते. हे १३ जण बेपत्ता झाले होते, परंतु बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले. नंतर ते सगळे जिवंत असल्याचे व अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकल्याचे निष्पन्न झाले.त्यांची काल सुखरूप सुटका करण्यात आली.