FIFA World Cup 2018 GER vs KOR : फिफा विश्वचषक स्पर्धेत एफ गटात आज गतविजेत्या जर्मनीवर पराभवाची नामुष्की ओढवली. कोरिया संघाकडून जर्मनीला २-० ने पराभूत केले. बलाढ्य जर्मनीला कोरियाने २-० असे पराभूत करत स्पर्धेचा शेवट गोड केला. संपूर्ण सामन्याच्या नियमित वेळेत दोनही संघाला एकही गोल करता आला नाही. मात्र त्यानंतर देण्यात आलेल्या ६ मिनिटाच्या वेळेत कोरियाने २ गोल करत सामना जिंकला आणि जर्मनीला स्पर्धेबाहेर फेकले.

कोरियाविरुद्ध झालेल्या पराभवामुळे जर्मनीला तब्बल ८० वर्षांनंतर पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर जावे लागले. १९३८ साली जर्मनीवर अशी वेळ आली होती. त्या विश्वाचसहक स्पर्धेत जर्मनी पहिल्या फेरीत स्पर्धेतून बाहेर फेकली गेली होती. पण तसे असले तरीही साखळी सामन्यात स्पर्धेबाहेर होण्याची ही जर्मनीची पहिलीच वेळ ठरली. १९३८ साली जर्मनी पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर गेली असली, तरीही त्यावेळी स्पर्धा ही गटनिहाय पद्धतीने खेळली जात नसे. त्यामुळे साखळी फेरीत स्पर्धेबाहेर जाण्यची ही दुर्दैवी वेळ जर्मनीवर प्रथमच आली आहे.

आजचा सामना जिंकणे हा जर्मनीसाठी अत्यावश्यक गोष्ट होती. त्या हेतूने जर्मनीचा संघ मैदानावर उतरला होता. पण कोरियाच्या संघाच्या बचाव फळीने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. त्यामुळे पूर्वार्धात कोरियाने जर्मनीला गोलशून्य बरोबरीत रोखले. उत्तरार्धात जर्मनीने पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. पण सामन्याच्या ९० मिनिटांच्या नियमित वेळेत जर्मनीला गोल करता आला नाही. त्यानंतर सामन्यात ६ मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला. या वेळेत जर्मनी आक्रमण करणार, हे निश्चित होते. पण या आक्रमणाचा जर्मनीवर उलटा परिणाम झाला.

६ मिनिटाच्या अतिरिक्त वेळेत कीम यंग-ग्वानने दुसऱ्या मिनिटाला गोल केला आणि कोरियाला १-० ने आघाडी दिली. जर्मनीने या गोल विरुद्ध VAR मार्फत दाद मागितली, पण जर्मनीचे हे अपील फेटाळून लावण्यात आले. त्यानंतर जर्मनीने सामना जिंकण्याच्या आशा सोडून दिल्या. या दरम्यान कोरियाकडून ह्यूंग मीन याने शेवटच्या मिनिटाला गोल करत जर्मनीच्या जखमेवर मीठ चोळले आणि सामना २-०ने जिंकला.