सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com
फुटबॉल विश्वाचषकातील सर्वाधिक यशस्वी आणि सातत्यपूर्ण संघ म्हणून ब्राझील आणि जर्मनी यांच्याकडेच पाहिले जात असले तरीही तुलनेत जर्मनीचा  फुटबॉल संघच कमालीचा व्यावसायिक आहे.

‘फुटबॉल एक साधा खेळ आहे. २२ जण ९० मिनिटं चेंडूचा पाठलाग करतात.. आणि अखेरीस जर्मन नेहमीच जिंकतात!’.. प्रख्यात इंग्लिश फुटबॉलपटू गॅरी लिनेकरनं फुटबॉलची व्याख्या इतक्या सोप्या शब्दांत केलेली आहे.

जर्मनीकडून वारंवार पत्कराव्या लागणाऱ्या पराभवाची उद्विग्नता त्या शब्दांमध्ये होती खरी. फुटबॉल विश्वचषकातील सर्वाधिक यशस्वी आणि सातत्यपूर्ण संघ म्हणून ब्राझील आणि जर्मनी यांच्याकडेच पाहावे लागेल. खरं क्लब फुटबॉलचा उगम झाला इंग्लंडमध्ये. सांघिक फुटबॉलची संकल्पना रुजली आणि फळली फ्रान्समध्ये. हा खेळ जगभर नेला ब्रिटिश, स्पॅनिश, डच आणि फ्रेंचांनीही. फुटबॉल विश्वचषकाचा इतिहास पाहिल्यास ब्राझील आणि जर्मनी हे देश जरा उशिरानेच चमकू लागले. १९३० मध्ये पहिल्यावहिल्या विश्वचषकाचं अजिंक्यपद पटकावलं उरुग्वेनं. १९३४ आणि १९३८ अशा सलग दोन स्पर्धा हा मान पटकावला इटलीनं. १९५० मध्ये पुन्हा उरुग्वेच जगज्जेता ठरला. १९५४ मध्ये तत्कालीन पश्चिम जर्मनीनं आणि १९५८ मध्ये ब्राझीलनं पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर मात्र या दोन देशांनी नेहमीच या स्पध्रेत वर्चस्व गाजवलं. ब्राझीलच्या नावावर सर्वाधिक पाच अजिंक्यपदं (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२) आहेत. जर्मनीनं चार वेळा (१९५४, १९७४, १९९०, २०१४) ही स्पर्धा जिंकली. इटलीनंही चार वेळा, उरुग्वे आणि अर्जेटिनानं प्रत्येकी दोन वेळा आणि इंग्लंड, फ्रान्स, स्पेन यांनी प्रत्येकी एकेकदा ही स्पर्धा जिंकली. मात्र इटलीच्या द्वितीय विश्वयुद्धपूर्व दोन जगज्जेतेपदांची मातब्बरी तितकीशी मानली जात नाही. १९५० च्या स्पध्रेनंतर केवळ दोन स्पर्धाचा अपवाद वगळता प्रत्येक स्पध्रेत ब्राझील आणि जर्मनी यांच्यापकी किमान एकाने अंतिम फेरी गाठलेली आहे किंवा अजिंक्यपद पटकावलंय. १९७८ (अर्जेटिना वि. हॉलंड) आणि २०१० (हॉलंड वि. स्पेन) या त्या दोन अपवादात्मक स्पर्धा. जर्मनीनं सर्वाधिक आठ वेळा अंतिम फेरी गाठली, तर ब्राझीलनं सात वेळा. यात कन्व्हर्जन रेट अर्थातच ब्राझीलचा अधिक कारण त्यांनी पाच वेळा जेतेपद पटकावलं. मात्र, दोन वेळा त्यांच्या देशात झालेल्या विश्वचषक स्पर्धाचं विजेतेपद ब्राझीलला मिळवता आलं नाही. जर्मनीनं १९७४ मध्ये यजमान असताना अजिंक्यपद पटकावलं, पण २००६ मध्ये त्यांचा उपांत्य फेरीतच पराभव झाला होता.

मात्र जर्मनीचं सातत्य ब्राझील किंवा इतर कोणत्याही संघांपेक्षा अधिक वाखाणण्याजोगं आहे. १९८२ पासून या संघानं प्रत्येक विश्वचषक स्पध्रेत किमान उपांत्यपूर्व फेरी गाठलेली आहे. १९८२ ते १९९० या काळात हा संघ सलग तीन वष्रे अंतिम फेरीत पोहोचला. १९९४ आणि १९९८ मध्ये त्यांचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. मग २००२ (अंतिम फेरी), २००६ (उपांत्य फेरी), २०१० (उपांत्य फेरी) आणि २०१४ (अजिंक्यपद) ही त्यांची वाटचाल तर थक्क करणारी आहे.

ब्राझीलमध्ये झालेल्या सन २०१४ च्या स्पध्रेपर्यंत विश्वचषक इतिहासात सर्वाधिक विजय आणि सर्वाधिक गोल ब्राझीलच्या नावावर होते. पण त्या स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात ब्राझील आणि जर्मनी परस्परांशी भिडले. जर्मनीने ब्राझीलचा ७-१ असा खुर्दा उडवला हे सर्वज्ञात आहेच. पण त्या सामन्यात दोन समीकरणं बदलली याची नोंद फारशी घेतली गेली नाही. त्या सामन्यातला दुसरा गोल नोंदवून जर्मनीचा मिरोस्लाव्ह क्लोसा विश्वचषकातला सर्वाधिक यशस्वी गोलवंत बनला. त्यानं ब्राझीलच्या रोनाल्डोचा विक्रम मोडला. त्या विजयाबरोबर विश्वचषक स्पर्धामधील सर्वाधिक विजयांची नोंद जर्मनीच्या नावावर झाली. त्यांनी ब्राझीलचा विक्रम मोडला! अंतिम फेरीत जर्मनीनं अर्जेटिनाला हरवून आणखी एक नवा पायंडा रचला. दक्षिण अमेरिकेच्या भूमीवर जगज्जेतेपद मिळवणारा तो पहिला युरोपियन संघ ठरला. तोपर्यंत युरोपियन देशांसाठी दक्षिण, मध्य किंवा उत्तर अमेरिकी भूमीवर फुटबॉल जगज्जेतेपद हे मृगजळच ठरलं होतं.

रंग बदलत्या जर्मनीचे

१९९० मध्ये जर्मनीनं जगज्जेतेपद पटकावलं. मात्र १९९४ आणि १९९८ मध्ये त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. १९८२ ते १९९० अशा सलग तीन स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठलेल्या संघाच्या दृष्टीने ही मोठी नामुष्की होती. जर्मन फुटबॉल संघटना कामाला लागली. युवा खेळाडूंकडे लक्ष देण्यात आलं. जर्मन फुटबॉल संघ त्या काळात काहीसा धसमुसळा आणि कंटाळवाणा खेळ करू लागला होता. फुटबॉल आकर्षक बनवण्याची निकड भासू लागली होती. या सगळ्या प्रक्रियेत २००२ चा विश्वचषक येऊन ठेपलाही. गटसाखळी टप्प्यानंतर पॅराग्वे, अमेरिका आणि सहयजमान दक्षिण कोरिया यांना प्रत्येकी १-० अशा माफक फरकानं हरवत जर्मनी अंतिम फेरीत धडकले. तिथं गाठ पडली ब्राझीलशी. या दोन मातब्बर संघांत एखाद्या विश्वचषकातली ती पहिलीच लढत होती. तिला फँटम फायनल असे संबोधले गेले. पण वर्चस्व ब्राझीलचेच राहिले. आक्रमक आणि कल्पक खेळाच्या जोरावर त्यांनी   २-० अशी बाजी मारली. युवा फुटबॉलपटूंना घडविण्याची प्रक्रिया २००६च्या स्पध्रेपर्यंत बऱ्यापकी पूर्णत्वाकडे आली होती. जर्मनी त्या स्पध्रेचे यजमान होते. एक नवा अत्याधुनिक पण सहिष्णू आणि सर्वसमावेशक जर्मनी जगासमोर सादर करण्याचा तेथील सरकारचा प्रामाणिक प्रयत्न होता. विशेष म्हणजे जर्मनीचा फुटबॉल संघही बहुवांशिक रंग दाखवू लागला होता. मिकाएल बलाक एके काळच्या पूर्व जर्मनीतला होता. मिरोस्लाव्ह क्लोसा पोलिश होता. सॅमी खेदिरा टय़ुनिशियातला, मेसूत ओयझिल तुर्की वंशातला, जेरोम बोआतेंग घानातला.

जर्मनीचा रंग बदलू लागला आणि नवी शैलीही. युर्गन क्लिन्समान हे नवे प्रशिक्षक. १९९० च्या जगज्जेत्या जर्मन संघाचे ते प्रमुख स्ट्रायकर होते. आक्रमकता त्यांनी जर्मन व्यूहरचनेतच नव्हे तर मानसिकतेतही भिनवली. परिणामी विश्वचषक सामन्यांतही जर्मनीकडून सामन्यागणिक चार-पाच गोल होऊ लागले. २००६, २०१० आणि २०१४ या तिन्ही स्पर्धामध्ये सर्वाधिक गोल जर्मनीच्या नावावर लागले. २०१० आणि २०१४ या स्पर्धामध्ये इंग्लंड, अर्जेटिना, पोर्तुगाल, ब्राझील अशा मातब्बर संघांविरुद्ध जर्मनीने खंडीभर गोल केले.

क्लिन्समान यांचे सहायक जोकीम ल्योव २००६ पासून जर्मन संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी क्लिन्समान यांची संकल्पना अधिक परिणामकारकरीत्या राबवली. त्यांच्या अमदानीत जर्मनी विश्व किंवा युरो चषक स्पध्रेत किमान उपांत्य फेरीत पोहोचलेला आहे. २०१४ मधील जगज्जेतेपद जर्मनीच्या बदललेल्या दृष्टिकोनाचा कळसाध्याय होता. जर्मनीचा संघ चेंडूच्या ताब्यावर भर देतो. एकमेकांकडे पासेस देतानाची त्यांची सहजता आणि कौशल्य एखाद्या कोचिंग व्हिडीओप्रमाणेच भासते. बहुतांश वेळा त्यांनी प्रतिस्पर्धी हाफमध्ये तळ ठोकलेला असतो. त्यांचे बचावपटू जवळपास हाफलाइनवरच उभे असतात. स्ट्रायकरची उणीव जर्मन मधली फळी सहज भरून काढते. हे होत असताना त्यांचे दोन्ही िवगबॅक्स बऱ्यापकी पुढे सरकलेले असतात. इतक्या मोठय़ा संख्येने उपस्थित जर्मन आक्रमकांचा सामना करताना प्रतिस्पर्धी संघाची दमछाक होते. त्यातून चुका होतात. ही कोंडी फोडण्याचा एक मार्ग म्हणजे प्रतिहल्ला. पण तो रोखण्यासाठी समर्थ असे बचावपटू आणि गोलरक्षक जर्मनीकडे मौजूद असतात.

प्रोसेस विरुद्ध पॅशन

ब्राझीलला २००२ नंतर कोणत्याही विश्वचषकात उपांत्य फेरीपलीकडे जाता आलेले नाही. त्यांच्या बाबतीत एक घोळ शैलीविषयी आहे. आक्रमण, मधली फळी आणि बचावफळी या तिन्ही आघाडय़ांवर दर्जेदार खेळाडू त्यांना सातत्यानं मिळू शकत नाहीत. नेयमारसारख्या एकटय़ा खेळाडूच्या जिवावर जिंकण्याचे दिवस इतिहासजमा झाले. पुन्हा नेयमार जायबंदी झाला म्हणजे जणू राष्ट्रीय शोकच! गेल्या स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात नेयमार खेळला नाही तेव्हा त्याचे सहकारी त्याची जर्सी राष्ट्रगीताच्या वेळी घेऊन आले. जणू तो दिवंगतच झाला असावा! याउलट अंतिम सामन्याच्या एक तास आधी सॅमी खेदिरा हा जर्मनीचा मधल्या फळीचा आधारस्तंभ दुखापतग्रस्त झाला. त्याच्या ऐवजी घेतलेला क्रेमर सामना सुरू झाल्यावर काही मिनिटांत जायबंदी झाला. तरीही जर्मनीला सक्षम बदली खेळाडू मिळत राहिले. प्रोसेसला पॅशनची जोड दिल्यामुळेच हे घडून आलं. उलट खंडीभर पॅशन असूनही प्रोसेसच्या अभावामुळे ब्राझीलचं मातेरं झालं.