सिद्धार्थ खांडेकर

स्वीडनविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीसाठी जर्मनीचे प्रशिक्षक जोकीम ल्योव यांनी संघात चार बदल केले होते. गेल्या कित्येक सामन्यांमध्ये जे घडलं नाही, ते या सामन्यात घडलं. एरवी जर्मनीच्या प्रशिक्षकांना आपल्या संघात इतके घाऊक बदल करण्याची वेळच येत नसे. सॅमी खेदिरा आणि मेसुत ओयझिल या दोन एरवी त्यांच्या लाडक्या असणाऱ्या फुटबॉलपटूंना बाहेर बसवलं गेलं. बचावपटू मॅट्स हुमेल्स जायबंदी असल्यामुळे बाहेर होता. मर्विन प्लाटेनहाटच्या ऐवजी योनास हेक्टर लेफ्टबॅक म्हणून खेळला. खेदिराच्या ऐवजी सॅबेस्टियन रुडी आणि ओयझिलच्या ऐवजी मार्को रॉइस यांना खेळवलं गेलं. यातून काही बाबी स्पष्ट होतात. वर्षांनुवर्ष जर्मनीकडून खेळत असलेल्या काहींच्या बाबतीत आता ल्योव यांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. या संघात म्युलर आणि बोआतेंग हे आणखी दोन फुटबॉलपटू आहेत जे उत्साह, ईर्षां, ऊर्जा या आघाडीवर फिके पडू लागले आहेत. कदाचित एकदम मोठय़ा प्रमाणावर बदल केल्यास चुकीचा संदेश जाईल, अशी भीती ल्योव यांना वाटली असावी. पण खेदिरा आणि ओयझिलला बेंचवर बसवताना ल्योव यांनी इतर काहींनाही इशारा दिलेला आहे.

जेरोम बोआतेंग हा एरवी भरवशाचा बचावपटू. पण अनेक महिने दुखापतीमध्ये घालवल्यानंतर त्याची पूर्वीसारखी जरब राहिलेली नाही, हे मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात दिसून आलं. त्याच्या हालचाली साहजिक मंदावल्या आहेत. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, जर्मनीच्या व्यूहरचनेत तो आणि हुमेल्स या बचावपटूंकडून अक्षरश १०० टक्के निर्दोष खेळाची अपेक्षा असते. कारण प्रतिस्पध्र्याच्या भागामध्ये गोलच्या शोधात असलेल्या जर्मनीवर अचानक प्रतिहल्ला झाल्यास तो थोपवण्याची जबाबदारी या दोघांची असते. मेक्सिकोविरुद्ध या दोघांपैकी विशेषत बोआतेंगला प्रतिस्पर्धी आक्रमकांनी लक्ष्य केलं. अशा परिस्थितीत बचावपटूंना मदतीचा हात देण्याची जबाबदारी मधल्या फळीतील बचाव सहाय्यकाची (डिफेन्सिव्ह मिडफिल्डर) असते. त्या स्थानावर पहिल्या सामन्यात सॅमी खेदिरा सपशेल अपयशी ठरला. त्यामुळेच स्वीडनविरुद्ध या स्थानावर प्रथम सॅबेस्टियन रुडी आणि तो जायबंदी झाल्यावर इल्के गुंडोगानला उतरवण्यात आलं. दोघंही चांगले खेळले. मेसुत ओयझिल प्लेमेकर म्हणून अपयशी ठरल्यावर त्याच्या जागी मार्को रॉइसला खेळवलं गेलं. त्यानंच जर्मनीचा पहिला गोल करून त्यांच्या आव्हानातील धुगधुगी कायम ठेवली. सामना संपण्यास काही मिनिटं शिल्लक असताना बचावपटू हेक्टरला माघारी बोलावून ज्युलियन ब्रँट या आक्रमकाला धाडलं. ही चालही यशस्वी ठरली, कारण त्याच्या चपळ हल्ल्यांमुळे १० जणांनिशी खेळत असूनही जर्मनी स्वीडनवर दबाव राखू शकली. खरं तर त्यावेळी स्वीडननं प्रतिहल्ला केला असता, तर जर्मनीला पळताभुई थोडी झाली असती. केवळ अँटोनियो रुडीगर आणि जोशुआ किमिच हेच बचावपटू म्हणून मैदानावर होते. बोआतेंगला लाल कार्ड दाखवलं गेल्यामुळे त्यानं मैदान सोडलं होतं. जर्मनीचा एकमेव स्ट्रायकर टिमो वेर्नर अपयशी ठरल्यावर ल्योव यांनी मारियो गोमेझला खेळवलं. त्यानं काही संधी दवडल्या, तरी या उंचपुऱ्या स्ट्रायकरच्या उपस्थितीमुळे स्वीडनविरुद्ध गोल होण्याचा धोका कायम होता. स्वीडनचा संघ कणखर आहे. त्यांनी पात्रता फेऱ्यांमध्ये हॉलंड आणि इटली या मातब्बर संघांना मात दिलेली आहे. तरीही जर्मनी आणि विशेषतल्योव यांनी स्वीडनविरुद्ध केवळ विजयासाठी प्रयत्न शेवटपर्यंत केले याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.

अर्थात काही ठळक त्रुटी अजूनही कायम दिसतात. मिरोस्लाव्ह क्लोसा निवृत्त झाल्यानंतर जर्मनीनं टिमो वेर्नरला त्याच्या जागी आणलं. पण क्लोसाची उंची किंवा गोलांसाठीची ‘नजर’ वेर्नरकडे नाही. त्याच्या जागी एरवी आणल्या जाणाऱ्या गोमेझमध्ये चापल्य आणि सातत्य नाही. क्लोसा म्हणजे गेल्या चार विश्वचषक स्पर्धामध्ये जर्मनीचं गोलमशीन होतं. त्याच्या अनुपस्थितीत जर्मनीचा गोलधडाका लक्षणीय आटलेला आहे. जर्मनीच्या दृष्टीनं त्याहीपेक्षा मोठी डोकेदुखी म्हणजे बचावफळी. हुमेल्स सध्या जायबंदी आहे. बोआतेंगविषयी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, त्याच्यावर पूर्ण विसंबून राहावं अशी परिस्थिती नाही. गोलरक्षक आणि आता कर्णधार मॅन्युएल नॉयरही अनाकलनीय चुका गोलक्षेत्रात करू लागलाय. या दोघांना आधार देऊ शकेल असा बचावात्मक मध्यरक्षक म्हणून रुडी किंवा गुंडोगान हे एरवीच्या अनुभवी खेदिरापेक्षा चांगले वाटतात. पण दोघांकडेही अनुभवाची उणीव आहे आणि विश्वचषक स्पर्धेत विशेषत बाद फेऱ्यांमध्ये हा घटक निर्णायक ठरू शकतो. थॉमस म्युलरकडून हल्ली गोल होत नाहीत ही आणखी एक चिंतेची बाब. अशा परिस्थितीत या संघात एकमेव असामान्य खेळाडू म्हणजे टोनी क्रूस. स्वीडनविरुद्ध त्याच्याच अफलातून गोलमुळे जर्मनी स्पर्धेतून अकाली बाहेर पडतापडता राहिला. जर्मनीची विश्वचषकातील कामगिरी कितीही दिमाखदार असला, तरी सध्याच्या संघातील गुणवान फुटबॉलपटूंची संख्या पाहता, या संघाला दावेदार ठरवणं हेच धाडसाचं आहे. स्वीडनचा संघ मेक्सिकोइतका चपळ नव्हता. कदाचित दक्षिण कोरिया त्यापेक्षा वेगळा दिसेल. पण जर्मनीच्या गेली काही वर्ष अभेद्य वाटणाऱ्या तटबंदीला पडलेली खिंडारं आणि रोडावलेला गोलधडाका बाकीच्या संघांनी नक्कीच हेरला असेल!

siddharth.khandekar@expressindia.com