नामवंत खेळाडूंचा समावेश असलेल्या जर्मनीला विजय अनिवार्य; आज स्वीडनचे आव्हान

सोची : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळीतच आव्हान संपुष्टात येण्याची वेळ आजवर अनेक माजी विजेत्यांवर आली आहे. मात्र, जर्मनीसारख्या बलाढय़ संघावर अशा नामुष्कीच्या ढगांचे सावट फिरेल, असा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. गटातील पहिल्याच सामन्यात मेक्सिकोकडून स्वीकारावा लागलेला मानहानीकारक पराभव, मारिओ गोमेझ व थॉमस म्युलर यांना गोल करण्यात आलेले अपयश आणि बचावफळीच्या स्पष्ट झालेल्या मर्यादा यामुळे जर्मनीवर पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वाधिक दडपण आहे. त्यामुळेच शनिवारी होणाऱ्या स्वीडनविरुद्धच्या सामन्यात जर्मनीची सत्त्वपरीक्षा असणार आहे.

मागील सात विश्वचषकांमध्ये एकदाही सलामीचा सामना न हरणाऱ्या जर्मनीचा खेळ खराब झाल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक जोआकिम लो यांनी मेक्सिकोविरुद्धच्या पराभवानंतर दिली होती. त्यामुळे जर्मनीला आता ‘जिंकू किंवा मरू’ अशा परिस्थितीत सामना खेळावा लागणार आहे. गोमोझ व म्युलरशिवाय टिमो वेर्नर, मेसुट ओझिल आणि टॉनी क्रुस यांच्यावर जर्मनीची भिस्त आहे. गोलरक्षक मॅन्युएल नॉयरवरही सर्वाच्या नजरा जडल्या आहेत.

स्वीडनची मुख्य मदार इमिल फोर्सबर्ग या आक्रमकावर आहे. त्याच्याशिवाय पहिल्या सामन्यात विजयी गोल साकारणारा कर्णधार आंद्रेस ग्रॅनक्विस्टकडून स्वीडनला आशा आहेत.

जर्मनीचे भवितव्य अधांतरी

जर्मनीला गटातील इतर सामन्यांवरही अवलंबून राहावे लागणार आहे. शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाला पराभूत केल्यास मेक्सिको ६ गुणांसह बाद फेरीसाठी पात्र ठरेल. यामुळे जर्मनीवर आणखी दबाव येईल. त्यातच स्वीडनने जर्मनीला फक्त बरोबरीवर रोखल्यास गतविजेत्यांचे आव्हानही संपुष्टात येईल व सरस गोलफरकामुळे स्वीडन ‘फ’ गटातून बाद फेरी गाठणारा दुसरा संघ ठरेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातील चुरस कमी होऊन मेक्सिको व स्वीडनमध्ये जिंकणारा संघ गटात अव्वल स्थान मिळवील.

सामना क्र. २९

गट  फ

जर्मनी वि. स्वीडन

स्थळ : फिश्त स्टेडियम, सोची

वेळ : रात्री ११:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी ईएसपीएन