बर्लिन : साखळी सामन्यातच गतविजेत्या जर्मनीला पराभूत व्हावे लागल्यानंतर त्याचे खापर प्रशिक्षक जोकिम ल्योव यांच्यावर फोडले जाण्याची चर्चा होती. मात्र तसे होणार नसून ल्योव हे त्यांच्या पदावर कायम राहणार असल्याचे संकेत जर्मनीच्या फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

जर्मनीमधील प्रमुख वर्तमानपत्र असलेल्या ‘बिल्ड’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून ल्योव हे पदावर कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तब्बल १२ वर्षांपासून ल्योव यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावी कामगिरी करणाऱ्या जर्मनीच्या संघाला गटातदेखील अखेरचे स्थान मिळाल्याने जर्मनीसाठी हे अपयश जिव्हारी लागणारे ठरले.

मात्र ल्योव यांच्या गत कामगिरीचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांना पुढील विश्वचषकापर्यंत कायम ठेवले जाण्याची चिन्हे आहेत. अर्थात त्याबाबत संघटनेच्या वतीने अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. परंतु त्यांचा करारदेखील २०२२पर्यंत असल्याने तो कायम राखला जाण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.

खूप मोठा बदल आणि ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे ल्योव यांनी जर्मनीला परतल्यानंतर सांगितले होते. टोनी क्रुस, सॅमी खेदिरा आणि थॉमस म्यूलर यांनी ल्योव यांना समर्थन जाहीर केले असले तरी संघाच्या वाईट कामगिरीचा फटका त्यांनादेखील बसू शकतो.

जर्मनीतील ‘फाझ’ नावाच्या दैनिकाने एका जर्मन खेळाडूचे नाव न सांगण्याच्या अटीवर संघातील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली असल्याचे म्हटले आहे. संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक मॅन्युएल नॉयरला मिळालेली विशेष वागणूकदेखील अनेकांना खटकल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.