05 March 2021

News Flash

वेध विश्वचषकाचा :  दुसऱ्या स्थानासाठी चुरस

संघांची बलस्थाने आणि कमकुवत दुवे यांचा लेखाजोखा ‘वेध विश्वचषकाचा’मध्ये १ जूनपासून मांडण्यात येणार आहे.

मोहम्मद सलाह

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फुटबॉलचा महासंग्राम अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धा अवघ्या दोन आठवडय़ांवर येऊन ठेपली आहे. रशियाच्या भूमीवर १४ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या फुटबॉलच्या या महायुद्धासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. ‘अ’ पासून ‘ह’पर्यंतच्या आठ गटांमध्ये प्रत्येकी चार देशांच्या संघांचा समावेश असून, या सर्व संघांची वैशिष्टय़े, त्यांचा पूर्वेतिहास, रशियातील मैदाने, उगवते खेळाडू , लक्षवेधी आक्रमक, संघांची बलस्थाने आणि कमकुवत दुवे यांचा लेखाजोखा ‘वेध विश्वचषकाचा’मध्ये १ जूनपासून मांडण्यात येणार आहे.

गट  अ

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यजमान म्हणून रशियाला ‘अ’ गटात स्थान मिळाले आहे, परंतु त्यांचे स्पर्धेतील भवितव्य अधांतरी आहे. हा स्पर्धेतील सर्वात सोपा गट असून उरुग्वे आणि इजिप्त हे उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र रशियाने कामगिरीचा आलेख उंचावल्यास इजिप्तची जागा ते बळकावू शकतात. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या मोहम्मद सलाहच्या खेळाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. इजिप्तला ऐतिहासिक कामगिरी करून देण्यात त्याचा वाटा महत्त्वाचा ठरणारा आहे. त्याला या गटात उरुग्वेचा लुईस सुआरेझ कडवे आव्हान देऊ शकतो.

इजिप्त

जवळपास २७ वर्षांनी विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवल्यानंतर इजिप्तला उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा नक्की असेल आणि त्या निर्धाराने ते खेळतील, यात शंका नाही. या निर्धाराला संघाच्या उंचावणाऱ्या कामगिरीची जोड आहेच. २०१७च्या आफ्रिकन चषक राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती आणि पात्रता फेरीतील गटात अव्वल स्थान पटकावत त्यांनी विश्वचषकासाठी पात्रता निश्चित केली. त्यामुळे आत्मविश्वासाने हा संघ रशियात दाखल होईल. त्यात प्रत्येकाच्या नजरा मोहम्मद सलाहवर खिळल्या आहेत. मात्र त्यांच्या बचावफळीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पात्रता स्पर्धेत त्यांनी आठ गोल केले, परंतु प्रतिस्पर्धी संघाला केवळ चार गोल करू दिले. या आठ गोलमध्ये सलाहचे पाच गोल आहेत. तसेच आफ्रिका चषक स्पर्धेत पाच गोल केले, तर तीन गोल त्यांच्याविरुद्ध नोंदले गेले. मध्यरक्षक ट्रेझेग्यूट आणि अब्दल्लाह सईद हेही गोल करू शकतात. मात्र सलाहला साहाय्य करणे ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. इजिप्तचा गोलरक्षक एस्साम एल-हादरी (वय ४५) हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा विक्रम कोलंबियाच्या फरीद मोंड्रॅगन्स (वय ४३) याच्या नावावर आहे. २०१४च्या स्पर्धेत ही नोंद झाली होती.

जागतिक क्रमवारीतील स्थान : ४६

पात्र : आफ्रिकन फुटबॉल महासंघाच्या पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावून इजिप्तने रशियात खेळण्याचा मान मिळवला.

२०१४ च्या विश्वचषकातील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी. १९९०नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार

’प्रशिक्षक : हेक्टर कुपर  ’संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

उरुग्वे

रशियाचा यजमान म्हणून समावेश नसता तर ‘अ’ गटात उरुग्वे हा प्रबळ दावेदार असता, तरीही त्यांचे पारडे जड आहे. २०१०च्या विश्वचषकात चौथ्या स्थानापर्यंत मजल मारल्यानंतर २०१४मध्ये त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, बाद फेरीत त्यांना कोलंबियाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र इटली आणि इंग्लंड हे बलाढय़ संघ गटात असूनही उरुग्वेने दुसरे स्थान पटकावले होते. ऑस्कर टॅबारेझ हे २००६पासून उरुग्वेच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळून आहेत आणि आक्रमण हेच त्यांचे प्रमुख अस्त्र आहे. अशा परिस्थितीत सुआरेझ, एडिन्सन कव्हानी, मॅक्सी गोमेझ यांच्यावर अधिक भार असणार आहे. उरुग्वेकडून सर्वाधिक गोलचा विक्रम सुआरेझच्या नावावर आहे आणि त्याने ९७ सामन्यांत ५० गोल केले आहेत. त्यापाठोपाठ कव्हानीच्या नावे ४२ गोल आहेत. आक्रमण हे उरुग्वेचे तंत्र असले तरी त्यांच्या बचावपटूंकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. मार्टिन कॅसेरेस आणि डिएगो गॉडीन या बचावपटूंनी पात्रता फेरीत प्रत्येकी तीन गोल केले आहेत.

जागतिक क्रमवारीतील स्थान : १७

पात्र : दक्षिण अमेरिका फुटबॉल उपखंडाच्या पात्रता स्पर्धेत ब्राझीलपाठोपाठ दुसरे स्थान पटकावत विश्वचषकात स्थान मिळवले. या स्पर्धेत उरुग्वेने अर्जेटिना, कोलंबिया, पेरू आणि चिली यांच्यासह इतरांना मागे टाकले.

२०१४ च्या विश्वचषकातील  कामगिरी : उपउपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाकडून पराभूत

’प्रशिक्षक : ऑस्कर टॅबारेझ

’संभाव्य व्यूहरचना : ४-४-२

सौदी अरेबिया

पा त्रता फेरीत सौदी अरेबियाने नाटय़मयरीत्या जपानपाठोपाठ दुसरे स्थान घेत रशिया विश्वचषक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. त्यांनी गोलफरकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर टाकले. सौदी अरेबिया चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार असून, १९९४च्या स्पर्धेतील त्यांचा खेळ कौतुकास्पद झाला होता. आक्रमणपटू मोहम्मद अल-सहलावी आणि मध्यरक्षक नावाफ अल अबेद यांच्यावर सौदी अरेबियाची भिस्त आहे. पात्रता फेरीत अल-सहलावीने १६ गोलचा पाऊस पाडला होता. त्याने २०१८च्या विश्वचषक पात्रता स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या पोलंडच्या रोबर्ट लेवांदोवस्की आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद खलील यांच्यासह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे.

जागतिक क्रमवारीतील स्थान :  ६७

२०१४व्या विश्वचषकातील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी. २००६नंतर प्रथमच विश्वचषकासाठी पात्र

’प्रशिक्षक : ज्युआन अँटोनियो पिझ्झी ’संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

पात्र : आशियाई फुटबॉल महासंघाच्या पात्रता स्पर्धेत दुसरे स्थान.

रशिया

य जमान म्हणून रशियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. मात्र ते त्या अपेक्षांवर कितपत पूर्तता करतात, याबाबत साशंकता आहे. २००६ आणि २०१० च्या स्पर्धेत पात्रता गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर ब्राझीलमध्ये झालेल्या २०१४ च्या स्पर्धेत त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र गटातच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. यंदाही तसाच अंदाच जाणकारांकडून बांधला जात आहे. प्रशिक्षक स्टॅनिस्लॉव्ह चेर्सेसोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७मध्ये रशियाने मैत्रीपूर्ण आणि कॉन्फडेरशन चषक स्पर्धा मिळून पाच विजय मिळवले, तर पाच अनिर्णीत निकाल व आठ पराभव पत्करले आहेत. त्यामुळे समोरील आव्हानांची त्यांना कल्पना असेल. बचावपटू अ‍ॅलेक्झांडर सॅमेडोव्ह, आक्रमणपटू फेडर स्मोलोव्ह हे त्यांचे प्रमुख शिलेदार आहेत.

जागतिक क्रमवारीतील स्थान :  ६६

पात्र : यजमान म्हणून थेट पात्र.

२०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : गटातच आव्हान संपुष्टात. बेल्जिमय आणि अल्जेरिया यांच्यापाठोपाठ तिसरे स्थान.

’प्रशिक्षक : स्टॅनिस्लॉव्ह चेर्सेसोव्ह

’संभाव्य व्यूहरचना:  ३-५-२

विश्वचषकाची रणमैदाने : लुझनिकी स्टेडियम, मॉस्को

विश्वचषक स्पर्धेचे मुख्य स्टेडियम. १९५६मध्ये या स्टेडियमचे उद्घाटन झाले. फुटबॉल चाहत्यांचे सर्वात आवडते स्टेडियम. या ठिकाणी २००८मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा मँचेस्टर युनायटेड व चेल्सी यांच्यात विजेतेपदाचा येथे सामना आयोजित करण्यात आला होता. विश्वचषक स्पर्धेसाठी २०१३मध्ये विलोभनीय बाह्य़रचनेत बदल न करता त्याचे नूतनीकरण झाले. स्पर्धेसाठी तेथील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक काढून टाकण्यात आला व आसन क्षमता वाढवण्यात आली. मॉस्को शहरातच हे स्टेडियम असल्यामुळे सर्वानाच सोयीचे ठिकाण.

प्रेक्षक क्षमता : ८१ हजार.

सामने : साखळी गट- रशिया वि. सौदी अरेबिया, जर्मनी वि. मेक्सिको, पोर्तुगाल वि. मोराक्को, डेन्मार्क वि. फ्रान्स.

उपांत्य फेरीचा एक सामना व अंतिम सामना.

संकलन : स्वदेश घाणेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 4:06 am

Web Title: fifa world cup 2018 group a team information
Next Stories
1 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालचा झंझावाती विजय
2 तिशी ओलांडलेल्या खेळाडूंनी गाजवली यंदाची आयपीएल
3 सुवर्णपदक विजेती वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी
Just Now!
X