ब्राझीलने १९६२मध्ये विश्वविजेतेपदाला सलग दुसऱ्यांदा गवसणी घातली होती. आता जर्मनीचा संघ सलग दुसरे विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. जोआकिम लो यांच्या मार्गदर्शनाखाली २००६पासून जर्मनीचा संघ आंतरराष्ट्रीय क्षितिजावर यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पध्रेत जर्मनीचा संघ उपांत्य फेरी खात्रीने गाठत असल्याने फ-गटातून हा संघ सहजपणे बाद फेरीत जाईल, हे जरी स्पष्टपणे दिसत असले तरी सराव सामन्यांमधील त्यांची कामगिरी चिंता निर्माण करणारी आहे. त्यानंतर बाद फेरीतील दुसऱ्या स्थानासाठी मेक्सिकोला पसंती देता येईल. मात्र धक्कादायक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वीडन आणि कोरियाला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळेच मेक्सिकोला दुसऱ्या स्थानासाठी कडवे आव्हान असेल.

गट फ

जर्मनी

गतवर्षी प्रशिक्षक जोआकिम को यांनी दुसऱ्या फळीतील बऱ्याचशा खेळाडूंसह संघाबांधणी करून रशियामध्येच कॉन्फेडरेशन चषकाला गवसणी घातली होती. जगज्जेत्या जर्मनीकडे पुन्हा वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे, हे त्यांच्या सध्याच्या कामगिरीतून स्पष्ट होत आहे. मागील चारही विश्वचषकांमध्ये या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. २०१७मधील सर्व स्पर्धामध्ये हा संघ अपराजित राहिला होता. याशिवाय विश्वचषक पात्रता स्पध्रेतील १० पैकी १० सामने त्यांनी जिंकले आहेत. जर्मनीच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मारिओ गॉत्झे आणि आंद्रे शुर्ले यांच्याशिवाय हा संघ खेळणार आहे. लो यांची गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरवर प्रमुख भिस्त आहे. याशिवाय ज्युलियन ड्रॅक्सलर, टॉनी क्रूस, मेसूट ओझिल, सॅमी खेदिरा मध्यरक्षण करतील. लेरॉय सॅने आणि थॉमस म्यूलर आक्रमणाची धुरा सांभाळतील.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : १
  • पात्र : युरोपियन महासंघाच्या पात्रता स्पध्रेतील क-गटाचे विजेते.
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : विश्वविजेते.
  • प्रशिक्षक : जोआकिम लो
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

स्वीडन

स्वी डनने पात्रता स्पध्रेच्या बाद फेरीत इटलीवर धक्कादायक विजय मिळवून एका तपानंतर प्रथमच विश्वचषक स्पध्रेत खेळण्याची संधी मिळवली. २००६मध्ये त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी त्यांना यजमान जर्मनीने धूळ चारली होती. विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात एक यशस्वी संघ म्हणून स्वीडनकडे पाहिले जाते. त्यांनी चार वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. १९५८मध्ये स्वीडनने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते, परंतु विश्वविजेतेपदाचे त्यांचे स्वप्न कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझीलने धुळीस मिळवले. स्वीडनला यंदाच्या विश्वचषक अभियानात झ्ॉटन इब्राहिमोव्हिकची उणीव तीव्रपणे भासणार आहे. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली. मात्र कार्ल-जोहान जोहान्सन, व्हिक्टर लिंडेलॉफ, ईमिल फोर्सबर्ग आणि मार्कस बर्ग यांच्यासारख्या गुणी खेळाडूंमुळे संघ समतोल असल्याची ग्वाही प्रशिक्षक जॅनी अँडरसन यांनी दिली आहे.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : २३
  • पात्र : युरोपियन महासंघाच्या पात्रता स्पध्रेतील दुसऱ्या फेरीचे विजेते.
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी. २००६नंतर प्रथमच विश्वचषकासाठी पात्र.
  • प्रशिक्षक : जॅनी अँडरसन.
  • संभाव्य व्यूहरचना : ४-४-२

मेक्सिको

बाद फेरी गाठण्यासाठी जर्मनीनंतर आंद्रेस गार्डेडोच्या नेतृत्वाखालील मेक्सिकोला दुसरी पसंती देण्यात येत आहे. पात्रता स्पध्रेतील तीन सामने बाकी असतानाच मेक्सिकोने पनामावर १-० अशी मात करीत आपले विश्वचषकातील स्थान निश्चित केले. मागील सहा विश्वचषक स्पर्धामध्ये मेक्सिकोने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंतच वाटचाल केल्याचे स्पष्ट होते. विश्वचषक स्पध्रेत नियमित सहभागी होणाऱ्या मेक्सिकोला १९७० आणि १९८६मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठता आली होती. या दोन्ही वेळा ते यजमान होते. २९ वर्षीय जेव्हियर हर्नाडीझच्या कारकीर्दीतील हा तिसरा विश्वचषक. एके काळी मँचेस्टर युनायटेड आणि आता वेस्ट हॅम युनायटेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हर्नाडीझकडून मेक्सिकोवासीयांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. ‘चिचारिटो’ या टोपणनावाने ओळखला जाणारा मेक्सिकोचा हा भरवशाचा खेळाडू जीसस कोरोना आणि हिर्विग लोझ्ॉनो यांच्या साथीने आक्रमणाची जबाबदारी सांभाळेल.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : १५
  • पात्र : उत्तर-मध्य अमेरिका व कॅरेबियन बेटे यांच्या महासंघांच्या पात्रता स्पध्रेत पहिले स्थान.
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल.
  • प्रशिक्षक : ज्युआन कार्लोस ओसोरिओ
  • संभाव्य व्यूहरचना : ४-३-३

दक्षिण कोरिया

द क्षिण कोरियाचा संघ १९५४मध्ये पहिल्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. त्यानंतर तीन दशकांहून अधिक काळाने १९८६मध्ये या आशियाई संघाने पुन्हा विश्वचषकाच्या व्यासपीठावर पुनरागमन केले. तेव्हापासून प्रत्येक विश्वचषकात दक्षिण कोरियाचा हमखास सहभाग असतो. खराब कामगिरीमुळे काही महिन्यांपूर्वी उली स्टीलाइकची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिन तैई-याँग यांच्यावर कोरियाच्या अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशियाई पात्रता स्पध्रेत अखेरच्या दिवशी कोरियाला जेमतेम विश्वचषकाचे स्थान निश्चित करता आले आहे. २००२मध्ये कोरियाने स्पेन, इटली, पोर्तुगाल यांच्यासारख्या बडय़ा संघांना नामोहरम करून उपांत्य फेरी गाठली होती. त्याचे कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे ध्येय कोरियाने जोपासले आहे. प्रीमियर लीगचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सन हियुंग-मिन (टॉटनहॅम), कि संग युंग (स्वानसी) आणि ली च्युंग-यंग (क्रिस्टल पॅलेस) यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या बळावर कोरियाचा संघ आश्चर्यकारक कामगिरी करू शकेल.

  • जागतिक क्रमवारीतील स्थान : ६१
  • पात्र : आशियाई फुटबॉल महासंघाच्या पात्रता स्पध्रेत तिसऱ्या फेरीत अ-गटाचे उपविजेते.
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : साखळीत गारद. गटात चौथे स्थान.
  • प्रशिक्षक : शिन तैई-याँग
  • संभाव्य व्यूहरचना : ४-४-२