FIFA World Cup 2018 : रशियात १४ जूनपासून २१वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. मात्र FIFA World Cup 2018 मध्ये भारताचा संघ पात्र ठरलेला नाही. २०१७मध्ये १७ वर्षाखालील फुटबॉल संघाला या स्पर्धेत स्थान मिळाले होते. मात्र वरिष्ठ संघाला अजूनही या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण असे असले तरीही भारतीयांसाठी या विश्वचषकात एक सुखद गोष्ट घडणार आहे.

भारतीय फुटबॉल संघाला यंदाच्या विश्वचषकासाठी रशियावारीची संधी मिळणार नसली, तरी दोन भारतीय मुलांना या स्पर्धेसाठी मैदानावर येण्याची संधी मिळणार आहे. कर्नाटकचा दहा वर्षीय ऋषी तेज आणि तामिळनाडूचा ११ वर्षीय नथानीया जोन्स या दोन मुलांना यंदाच्या फिफा विश्वचषकात अधिकृत मॅच बॉल कॅरियर म्हणून निवडण्यात आले आहे. बेल्जीयम वि. पनामा आणि ब्राझील वि. कोस्टा रिका अशा दोन सामन्यांमध्ये या दोन मुलांना अधिकृत मॅच बॉल कॅरियर म्हणून संधी देण्यात आली आहे. दोन मुलांपैकी एक जण बेल्जीयम आणि पनामा यांच्यादरम्यान होणाऱ्या सामन्यात ज्या फुटबॉलने सामना खेळला जाणार आहे, त्या सामन्यासाठी अधिकृत मॅच बॉल मैदानावर घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. तर दुसऱ्या मुलाला ब्राझील आणि कोस्टा रिका यांच्या सामन्यात फुटबॉल घेऊन मैदानावर जाण्याची संधी दिली जाणार आहे.

१० ते १४ वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी फिफाच्या प्रयोजकांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण १६०० मुलांमधून ही २ मुले निवडण्यात आली आहेत.