FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत आता ‘राऊंड ऑफ १६’चे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगालने बी गटात इराणशी झालेला सामना बरोबरीत सोडवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. मात्र या सामन्यामुळे इराणचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेत संघाकडून आणि काही विशेष खेळाडूंकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतात. पण इराणच्या संघातील खेळाडू अपेक्षांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे इराणच्या अनेक खेळाडूंना टीकेचे लागले.

सामन्यात किंवा स्पर्धेत अपेक्षित कामगिरी न करता आल्याने अनेक सामन्यांमध्ये दिग्गज खेळाडूंना नेहमी टीकेचे धनी व्हावे लागते. अनेकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. चाहत्यांकडून काही क्रीडापटूंच्या घरांवरही दगदफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण इराणच्या आक्रमण फळीतील फुटबॉलपटू सरदार अझमौन याने चक्क या टीकांना कंटाळून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्विकारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

इराणला या स्पर्धेत बी गटात टाकण्यात आले होते. या गटात पोर्तुगाल आणि स्पेन हे बलाढ्य संघ असल्यामुळे इराणची बाद फेरीत पोहोचण्याची शक्यता फार कमी होती. या गटातील साखळी सामन्यात इराणने पहिला सामना मोरोक्कोविरुद्ध जिंकला. पण त्यांनतर स्पेनविरोधात इराणला १-०ने पराभूत व्हावे लागले, तर पोर्तुगालशी झालेली लढत इराणने बरोबरीत सोडवली.

संपूर्ण स्पर्धेत इराणला केवळ २ गोल करता आले. संघाच्या या सुमार कामगिरीमुळे चाहत्यांनी संघावर आणि खेळाडूंवर सडकून टीका केली. ही टीका न रुचल्यामुळे सरदार अझमौन याने निवृत्तीचा निर्णय घेतला. ‘राष्ट्रीय संघाकडून खेळायला मिळाले हे माझे भाग्य आहे. २३ वर्षाच्या तरुणासाठी निवृत्ती जाहीर करणे हे खूप अवघड असते. पण पण दुर्दैवाने मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे.’ असे तो म्हणाला.