कझान : पोर्तुगालसमवेतच्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने स्पेनचा संघ अद्याप विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच गुरुवारी इराणविरुद्ध होणारी लढत ही स्पेनची विश्वचषकातील वाटचाल ठरवणारी निर्णायक लढत ठरणार आहे.

यंदाच्या संभाव्य दावेदारांपैकी एक मानले जाणारे आणि २०१०चे माजी विश्वविजेते असलेल्या स्पेनचा विजय रोनाल्डोने केलेल्या हॅट्ट्रिकमुळे हुकला. स्पेनच्या संघाने पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात बराच काळ वर्चस्व कायम राखले होते. मात्र रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकमुळे त्यांना बरोबरी मान्य करावी लागली. परंतु आता इराणविरुद्धच्या लढतीत सर्व काही विसरून स्पेनला विजयासाठीच खेळ करावा लागणार आहे. कारण या लढतीत विजयाव्यतिरिक्त अन्य कोणताही निकाल हा त्यांना साखळी फेरीतच गारद करू शकतो.  दुसरीकडे इराण हा पहिल्या सामन्यातील मोरोक्कोवरील विजयासह सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरणार आहे. अगदी अखेरच्या टप्प्यात अझिझ बोहाडोऊझने केलेला एकमेव गोल इराणला विजय देऊन गेला. त्यामुळे तीन गुणांसह इराण गटात सध्या सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेने भारलेला इराणचा संघ अजून एका विजयासह बाद फेरीत जाण्यास उत्सुक आहे. अर्थात स्पेनविरुद्ध विजय म्हणजे स्वप्नवत कामगिरी आहे, याचीदेखील त्यांना जाण आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

गेल्या २० वर्षांतील विश्वचषकात तब्बल सात सामने विजयापासून वंचित राहिल्यानंतर इराणला मोराक्कोच्या रूपाने पहिला विजय मिळवण्यात यश आले. यापूर्वी १९९८ साली इराणने अमेरिकेवर मिळवलेला २-१ असा विजय, ही त्यांची विश्वचषकातील अखेरची विजयी कामगिरी होती.

सामना क्र. र०

गट    ब

स्पेन वि. इराण

स्थळ : कझान स्टेडियम

वेळ : रात्री ११.३० वा.