FIFA World Cup 2018 : बाद फेरीच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने जपानवर ३-२ने मात केली. या विजयासह बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ९० मिनिटाच्या नियमित वेळेनंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेत अगदी अखेरच्या मिनिटाला चाडलीने केला. हा गोल बेल्जियमसाठी निर्णायक ठरला. चाडलीने गोल केल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि जपानचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न संपुष्टात आले.

अतिशय हृदयद्रावक प्रकारे जपानचा पराभव झाला. पण, तशा परिस्थितीही जपानच्या संघाने शिस्त सोडली नाही. जपान हे शिस्तप्रिय राष्ट्र आहे. ही ओळख कायम ठेवत त्यांनी स्टेडियममधून बाहेर जाण्याआधी ड्रेसिंग रूम पूर्णपणे स्वच्छ केली आणि आवरून ठेवली. स्पर्धेच्या काळात प्रत्येक संघाला आपले सामान ठेवण्यासाठी लॉकर आणि ड्रेसिंग रूम देण्यात आली होती. ती पूर्ण खोली जपानच्या संघातील खेळाडूंनी आवरून ठेवली. याशिवाय, रशियाचे धन्यवाद मानणारी एक छोटीशी चिट्ठीदेखील (नोट) ठेवली.

याआधीही कोलंबियाला साखळी सामन्यात २-१ने पराभूत केल्यानंतर जापनीज चाहत्यांनी तेथील प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये केलेला कचरा, इकडे तिकडे फेकलेले कागद आणि इतर गोष्टींची साफसफाई केली होती. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

दरम्यान, जपानच्या चाहत्यांनी घालून दिलेला हा आदर्श पुढे कायम राखत त्या सामन्यानंतर झालेल्या पोलंड विरुद्ध सेनेगल सामन्यातही सामना संपल्यानंतर सेनेगलच्या चाहत्यांनी स्टेडियमधील साफसफाई केली होती.