FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत काल बलाढ्य कोलंबियावर जपानने २-१ने धक्कादायक मात केली. तर सेनेगलने पोलंडला २-१ असे पराभूत केले. या सामन्यांनंतर दोनही देशांच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. तुलनेने बलाढ्य असलेल्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केल्यानंतर जपान आणि सेनेगल या दोंन्ही देशांतही दणक्यात सेलिब्रेशन झाले. मात्र त्यापेक्षा लक्षवेधक ठरले ते हा सामना संपल्यानंतर या दोंन्ही संघाच्या चाहत्यांनी केलेल्या कौतुकास्पद उपक्रमाची…

संपूर्ण सामन्यात कोलंबियाने केवळ १ गोल केला, तर याउलट ६१ व्या स्थानी असलेल्या जपानने २ गोल करत सामना आपल्या नावे केला. या सामन्याच्या नंतर सामना पाहायला आलेल्या चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. पण त्याबरोबरच या चाहत्यांनी तेथील प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये केलेला कचरा, इकडे तिकडे फेकलेले कागद आणि इतर गोष्टींची साफसफाई केली. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक झाले.

जपानच्या चाहत्यांनी घालून दिलेला हा आदर्श राखत त्या सामन्यांनंतर झालेल्या पोलंड विरुद्ध सेनेगल सामन्यातही सामना संपल्यानंतर याची पुनरावृत्ती दिसून आली. अनुभवी आणि तुलनेने बलाढ्य अशा पोलंडला पराभूत केल्यांनतर सेनेगलच्या चाहत्यांनी जोरदार विजय साजरा केला. पण त्यांनतर सामाजिक जाणिवेतून त्यांनीही स्टेडियमधील साफसफाई केली.

या दोनही देशाच्या चाहत्यांनी केलेल्या या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.