FIFA World Cup 2018 : समुराई ब्लू म्हणजेच जपान. रशियातल्या फिफा विश्वचषकात आशियातल्या या समुराईंनी आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं. एखाद्या समुराईच्या तलवारीप्रमाणे त्यांच्या आक्रमणाच्या धारेसमोर प्रतिस्पर्धी अक्षरश: घायाळ झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला सुरुवात झाली त्यावेळी जपान हा केवळ एकच संघ आशिया खंडाचं म्हणजेच जगातल्या ७५ टक्के जनतेचं प्रतिनिधित्व करत होता. पण जपानला बेल्जियमविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळं फिफा विश्वचषकाची लढाई ही आता युरोप आणि दक्षिण अमेरिका यांच्यातच होणार हे स्पष्ट झालं.

जपाननं फिफा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात कोलंबियाला २-१ असं नमवलं. तर सेनेगलला २-२ असं बरोबरीत रोखलं. पोलंडविरुद्ध सामन्यात १-० असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. पण राउंड ऑफ १६ मधली जपानची कामगिरी ही खरोखरंच वाखणण्याजोगी होती. फिफा रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या आणि यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार बेल्जियमला जपाननं चांगलंच तंगवलं. फिफा रँकिंगमध्ये जपान 61व्या स्थानावर आहे. पण तरीही बेल्जियमविरुद्ध निर्णायक सामन्यात जपाननं २-० अशी आघाडी मिळवली होती. भले जपानला ३-२ असा पराभव स्वीकारावा लागला असेल. पण वर्ल्ड क्लास खेळाडूंचा भरणा असलेल्या बेल्जियमविरुद्ध दोन गोल डागणं ही काही सोपी गोष्ट नाही.

यंदाच्या विश्वचषकात जपाननं सह प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यामुळेच की काय जपानला एकाच विश्चषकात पहिल्यांदाच सहा गोल झळकावता आले. शिन्जी कागावा, केईसुके होंडा, ओसाको, ताकाशी इनुई आणि हारागुचीसारखे खेळाडू जपानच्या ताफ्यात होते. जपानच्या संघात सात खेळाडू असे होते ज्यांना ५०हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव होता. शिन्जी ओकोझाकीला ११६, मकोतो हासेबेला ११४ आणि युटो नागामाटोला १०९ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. जपानचे बहुतेक खेळाडू हे युरोपातल्या बलाढ्य संघांकडून व्यावसाय़िक फुटबॉल खेळतात. आशियातल्या इतर देशांपेक्षा जपानचे खेळाडू जागतिक पातळीवर जास्त प्रसिद्धही आहेत. त्यामुळेच की काय जपानच्या पराभवामुळे अवघ्या आशिया खंडातील लोकांना हुरहुर लागली होती.

यंदाच्या विश्वचषकात जपानची ताकद म्हणून उभा राहिला होता तो म्हणजे ३५ वर्षीय गोलकीपर इजी कावाशिमा. कावाशिमानं आधी पोलंड आणि मग बेल्जियमविरुद्ध वर्ल्ड क्लास सेव्ह केले. त्यामुळं जपानचा संघ काही काळ तग धरु शकला. कावाशिमा हा सलग तिसऱ्यांदा जपानचं विश्वचषकात प्रतिनिधित्व करत होता.

विश्वचषक सुरु होण्याच्या दोन महिने आधी जपानचे प्रशिक्षक वाहिद हालिलहोदिच यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अकिरा निशिनो यांच्या हाती जपानच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं सोपवण्यात आली. जापनीज प्रशिक्षक निवडल्यानं खेळाडूंना त्यांच्याशी संभाषण करणं अगदी सोपं झालं. निशिनो यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेताच संघाचं चित्रंच पालटलं. अकिरा निशिनो हे जपानचे माजी फुटबॉलर असून व्यावसायिक फुटबॉलमध्ये प्रशिक्षकपदाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. निशिनो यांनी पारंपारिक जापनीज स्टाईलनं फुटबॉल खेळण्यास खेळाडूंना भाग पाडलं. आणि त्याचं फळही त्यांना मिळालंच. एखाद्या बलाढ्य संघाला टक्कर देण्याची मानसिकता जापनीज खेळाडूंमध्ये आहे असं निशिनो यांनी म्हटलं होतं. त्यांच्यात आक्रमकपणे प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण करण्याची क्षमता आहे. सेनेगलविरुद्ध सामन्यात जपाननं दोनवेळा पिछाडी भरुन काढली होती. युरोपियनं प्रशिक्षक आणि युरोपियन शैलीविना आपण कोणलाही टक्कर देऊ शकतो हे जपाननं रशियातल्या विश्वचषकात दाखवून दिलं. त्यामुळे भारत, चीन आणि इंडोनेशियासारख्या देशांनीही जपानकडून धडा घ्यायला काही हरकत नाही. कारण येणाऱ्या काळात फिफा विश्वचषकात ३२ ऐवजी ४८ संघ खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशियातील अनेक देशांना विश्वचषकाची दारं उघडी होतील. सध्या आशियातून पाच संघ विश्वचषकात सहभागी होतात.

आपल्या प्रतिक्रिया vijay.majha@gmail.com या ए मेलवर कळवा.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup japan story in fifa wc
First published on: 05-07-2018 at 15:19 IST