News Flash

FIFA World Cup 2018 : शेवटच्या मिनिटाला गोल, बेल्जियमचा जपानवर ३-२ ने विजय

पहिले सत्र गोल शुन्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होताच सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला जेनकी हारागुचीने शानदार मैदानी गोल झळकवत जपानला १-० अशी

जपान आणि बेल्जियममध्ये खेळल्या गेलेल्या बादफेरीच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने जपानवर ३-२ गोलने मात करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळेतील अखेरच्या मिनिटाला चाडलीने केलेला गोल बेल्जियमसाठी निर्णायक ठरला. चाडलीने गोल केल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि जपानचे उपांत्यपूर्वफेरी गाठण्याचे स्वप्न भंगले.

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत दोन गोलच्या पिछाडीनंतर कमबॅक करुन विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या ४८ वर्षांतला पहिलाच संघ ठरला आहे. १९७० साली जर्मनीने दोन गोलच्या पिछाडीनंतर इंग्लंडवर विजय मिळवला होता. जपान-बेल्जियम सामन्यात दोन्ही संघांकडून फुटबॉल रसिकांना दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल झळकवणाऱ्या बेल्जियमच्या संघाला जपानच्या संघाने कडवी टक्कर दिली.

बलाढय बेल्जियम हा सामना सहज जिंकेल असे अनेकांना वाटले होते. पण जपानने २-० अशी आघाडी घेत बेल्जियमच्या तोंडचे पाणी पळवले होते. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात जपानने तीन मिनिटात दोन गोल करत २-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होताच सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला जेनकी हारागुचीने शानदार मैदानी गोल झळकवत जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५१ व्या मिनिटाला ताकाशी इनुईने जपानसाठी दुसरा गोल केला.

जपानच्या या आक्रमक खेळामुळे बेल्जियमचा संघ काहीसा दबावाखाली आला होता. पण त्यानंतर ६९ व्या मिनिटाला जॅन व्हेरटोनघेनने बेल्जियमसाठी पहिला गोल केला आणि आघाडी कमी केली. त्यानंतर लगेचच पाच मिनिटांनी फेलायनीने दुसरा गोल करुन २-२ अशी बरोबरी साधून दिली. सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणार असे वाटत असतानाच चाडलीने जपानच्या गोल क्षेत्रात धडक देत सुरेख मैदानी गोल झळकवत संघाचे उपांत्यपूर्व फेरीचे तिकिट निश्चित केले. बेल्जियमची उपांत्यपूर्वफेरीत ब्राझीलशी गाठ पडणार आहे.

बेल्जियमने साखळी फेरीत पनामा, टय़ुनिशिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना पराभूत करताना तब्बल ९ गोल लगावले आहेत. बेल्जियमचा संघ १९८६ साली म्हणजे तब्बल ३२ वर्षांपूर्वी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. यापूर्वी जपानचा संघ केवळ २००२ आणि २०१० सालीच उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 11:58 pm

Web Title: fifa world cup 2018 japan vs belgium
टॅग : Fifa World Cup
Next Stories
1 FIFA World Cup 2018: ब्राझीलचा मेक्सिकोला ‘दे मार’, २-०ने विजयी
2 FIFA World Cup 2018: BLOG : जया अंगी मेसीपणं
3 FIFA World Cup 2018: पेनल्टी शूटआऊटवर अकिनफिव्हचा बचाव आणि रशियाकडून इतिहासाची नोंद
Just Now!
X