FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी डेन्मार्क आणि पेरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात पेरूला डेन्मार्कने १-० असे पराभूत केले. या सामन्यात पूर्वार्धाच्या ४५ मिनिटात एकही गोल झाला नाही. मात्र त्यासोबत देण्यात आलेल्या अतिरिक्त एका मिनिटात डेन्मार्ककडून क्यूएव्हाने गोल केला आणि सामन्यात डेन्मार्कला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या उत्तरार्धात एकही गोल झाला नाही. त्यामुळे डेन्मार्कने तो सामना जिंकला.

या सामन्यात डेन्मार्कने विजय मिळवल्यामुळे स्पर्धेत त्यांची विजयी सुरुवात झाली. त्याबरोबरच डेन्मार्कचा मिडफिल्डर असलेला जोनास कुडसन याच्यासाठी देखील हा दिवस खास ठरला. जोनासची पत्नी ट्राईन हिने बाळाला जन्म दिला. मंगळवारी या दोघांना कन्यारत्न झाले. मुख्य म्हणजे जोनासची पत्नी प्रसूतीसाठी दिलेल्या तारखेच्या काही आठवडे आधी प्रसूत झाली. पण रशियात सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी डेन्मार्कचा संघ रशियात दाखल झाला होता. जोनासदेखील संघाबरोबर रशियात होता.

त्यामुळे शनिवारी पेरूविरुद्ध विजय मिळवल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंनी मिळून जोनासला एक आगळीवेगळी भेट दिली. जोनासला आपल्या घरी जाऊन नवजात कन्येला भेटता यावे आणि तिला पाहता यावे, यासाठी डेन्मार्कच्या खेळाडूंनी चक्क एका खासगी जेट विमानाचे बुकिंग केले.

याबाबत बोलताना गोलकिपर कॅस्पर स्कॅमचेल म्हणाला की मी देखील एक बाप आहे. आपली पत्नी प्रसूतिवेदना सहन करता असताना आपण तिच्याजवळ नाही, हे खूप वेदना देणारे आहे. आम्ही फुटबॉलपटू असलो तरी आम्हीही माणूसच आहोत. म्हणूनच आम्ही त्याच्या भावना जाणल्या आणि त्याला लवकरात लवकर जाऊन आपल्या पत्नी आणि मुलींना भेटता यावे, म्हणून आम्ही जेटचे बुकिंग करून दिले, असे तो म्हणाला.