जयदेव भाटवडेकर – response.lokprabha@expressindia.com
कोल्हापूर म्हटले की तालमीतले पहिलवान आणि आखाडय़ातील  कुस्ती किंवा खो-खो, कबड्डीसारख्या मातीशी जोडलेल्या खेळांची आठवण होते. कोल्हापूरला कुस्तीचा इतिहास लाभला आहे. त्यामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात कुस्ती हीच कोल्हापूरची खरी ओळख आहे. परंतु त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये फुटबॉल हा देखील तेवढाच लोकप्रिय खेळ आहे. कोल्हापूरमधील तरुण फुटबॉलपटूंच्या वाढत्या गुणवत्तेची दखल सर्वत्र घेतली जात आहे.

कोल्हापूरचे क्रीडा क्षेत्राशी अतिशय जवळचे नाते आहे. कोल्हापुरात जन्मलेल्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. अगदी ऑलिम्पिकमध्ये पदकेदेखील मिळवली आहेत. कोल्हापूरकरांचे देखील खेळावर विशेष प्रेम! आयपीएल किंवा आयएसएल इतक्या मोठय़ा स्पर्धा कोल्हापुरात होत नसल्या तरीही कोल्हापूरमध्ये कुठल्याही खेळाचा सामना म्हटले की मदान भरगच्च भरणार हे नक्की.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Rajasthan Minister
“अकबर बलात्कारी होता, सुंदर मुलींना उचलून…”, राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांचं वक्तव्य

फुटबॉल हा खेळ भारतात मागील काही वर्षांत वेगाने बहरत आहे, पण कोल्हापुरातील फुटबॉलची सुरुवात जवळपास ९० वर्षांपूर्वी झाली. १९३० साली पहिली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा उरुग्वेमध्ये पार पडली. या स्पध्रेच्या काहीच दिवस आधी ‘जामदार फुटबॉल क्लब’ हा कोल्हापुरातील पहिला-वहिला फुटबॉल क्लब उदयास आला. कोल्हापुरातील राजघराण्याचा फुटबॉलला चांगलाच पाठिंबा राहिला. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात १९४०च्या दरम्यान कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना झाली. या असोसिएशनसमवेत कोल्हापुरातील फुटबॉल हळूहळू विकासाच्या पायऱ्या चढत गेला.

आज कोल्हापुरात फुटबॉल रसिकांची संख्या भरभक्कम आहे. नवी-नवी फुटबॉल खेळणारी मंडळे आपली ओळख निर्माण करत आहेत. कडक उन्हाळा असो किंवा मुसळधार पावसाळा कोल्हापुरातील प्रत्येक मदानात बारा महिने फुटबॉलचा खेळ रंगलेला असतो. अगदी लहानग्यांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्व जण या खेळाचा आस्वाद घेताना दिसतात.

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये आज जवळपास सव्वाशे फुटबॉल संघांची नोंदणी आहे. यातील काही फुटबॉल क्लब्सना ५० पेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आहे. तसेच किमान दोन ते अडीच हजार फुटबॉल खेळाडूंची नावे केएसएमध्ये नोंदवलेली आहेत. कोल्हापूरमध्ये वाढता प्रतिसाद लक्षात घेत वेगवेगळ्या फुटबॉल स्पर्धा वर्षभरात आयोजित केल्या जातात. १९६० साली झालेले राजर्षी शाहू स्टेडियम हे कोल्हापुरातील सर्वात जुने फुटबॉल मदान आहे. १८ हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असणारे हे स्टेडियम कोल्हापुरातील काही मोठय़ा संघांचे सराव करायचे ठिकाण आहे. राजर्षी शाहू स्टेडियममध्ये कोल्हापुरातील मोठय़ा फुटबॉल स्पर्धा खेळल्या जातात. केएसएच्या माध्यमातून सुरू झालेल्या फुटबॉल महासंग्राम या कोल्हापुरातील फुटबॉल लीगचे सामने याच मदानात खेळले जातात. फुटबॉल महासंग्राम या वार्षकि फुटबॉल लीगमध्ये कोल्हापुरातील काही मोठे संघ खेळतात. या स्पध्रेची चुरस वेगळीच असते. दिलबहार तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, खंडोबा तालीम मंडळ, बालगोपाळ तालीम मंडळ या काही कोल्हापूर फुटबॉलमधील बलाढय़ संघांचे सामने बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते.

अनिकेत जाधव या कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या फुटबॉलपटूची १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमी आणि तरुण खेळाडूंचा जोष दुणावला आहे

यंदाच्या २०१८ फुटबॉल विश्वचषकासाठी कोल्हापुरात चांगलाच उत्साह दिसत आहे. भारत या स्पध्रेचा भाग नसला तरीही कोल्हापुरातील प्रत्येक फुटबॉलप्रेमी आपापल्या आवडत्या संघाला खेळताना पाहण्यासाठी आतुर आहे. ब्राझील आणि जर्मनी हे देश विजेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. कोल्हापुरात मेस्सी आणि रोनाल्डोचे अनेक चाहते असल्यामुळे या दोन दिग्गजांच्या संघांनादेखील पाठिंबा दिला जात आहे. काही ठिकाणी मंडळे मोठय़ा पडद्यावर विश्वचषक सामने दाखवायची सोय करत आहेत. दुकानांमध्ये वेगवेगळ्या देशांचे झेंडे, खेळाडूंच्या जर्सी यांची विक्री जोरात चालली आहे. कोल्हापूरचे फुटबॉलविश्व दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. तरुण खेळाडू नावलौकिक मिळवत आहेत आणि प्रेक्षकांचा जोर वाढत चालला आहे. फुटबॉलसाठी असे अनुकूल वारे वाहत असताना कोल्हापूरकरांसाठी फुटबॉल विश्वचषक म्हणजे एखाद्या मोठय़ा सणापेक्षा कमी नाही.