FIFA World Cup 2018 : सध्या फिफा विश्वचषक स्पर्धा सुरु असून सर्वत्र फुटबॉल फिव्हर पाहायला मिळत आहे. भारतातही तरुणाईची या खेळाला पसंती लाभत असून ठिकठिकाणी हा खेळ सर्वत्र खेळला जात आहे. भारतातील फुटबॉलप्रेमींमध्ये मेसी, रोनाल्डो, नेमार, सुआरेझ या खेळाडूंचे चाहते सर्वाधिक आहेत. त्यामुळे प्रत्येक तरुण स्थानिक खेळाडू त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे अनुकरण करत असतो. मात्र, अशा पद्धतीचे अनुकरण करणे हे कोलकातामधील एका तरुणाला महागात पडले.
पश्चिम बंगालमध्ये एका स्थानिक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २० वर्षीय तरुण सागर दास याचा मैदानावर मृत्यू झाला. सागर हा अर्जेटिनाचा लायनेल मेसी याचा प्रचंड मोठा चाहता होता. सागर या स्थानिक फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाला होता. एका सामन्यादरम्यान सागरने मेसीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मेसीसारखी हवेत पाय ठेवून किक मारण्याचा त्याचा मानस होता. पण त्याला मेसीचे अनुकरण करणे जमले नाही.
समोरून आलेला फुटबॉल हा सागरच्या छातीवर जोरात आदळला आणि सागर मैदानातच बेशुद्ध पडला. मंगळवारी ही घटना घडली. त्यानंतर सागरला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
सागर हा मेसीचा चाहता होता. त्याचे सामना पाहताना सागर अभ्यासही विसरून जायचा. मेसीचा प्रत्येक सामना तो पाहायचा. मंगळवारी झालेल्या सामन्यात तो मेसीच्या विविध प्रकारच्या किक मारून दाखवणार होता. पण दुर्दैवाने त्याच्या मृत्यू झाला, अशी माहिती सागरचा भाऊ समर कोयाल याने दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 3:51 pm