FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने रशियाला शूट आऊटमध्ये ४-३ने पराभूत केले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. त्यानंतर देण्यात आलेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामना बरोबरीतच राहिला. त्यामुळे अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये क्रोएशियाने रशियाचा निकाल लावला होता.

हा सामना सुरुवातीपासूनच जोरदार रंगला होता. या सामन्यात २०व्या मिनिटाला रशियाच्या बचाव फळीतील इल्या कुटेपोव्ह हा दुखापतग्रस्त झाला. प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून चेंडू घेण्याच्या युद्धात त्याच्या पायाला दुखापत झाली. पण त्यानंतरही त्याने पूर्ण सामना खेळणे पसंत केले. उर्वरित सामना खेळल्यामुळे त्याची दुखापत गंभीर असेल, असे वाटत नव्हते. मात्र सामना संपल्यानंतर संघातील खेळाडूंना त्याच्या दुखापतीची जाणीव झाली.

२०व्या मिनिटाला दुखापत झाल्यांनतरदेखील तो पूर्ण १२० मिनिटे सामना खेळला. प्रतिस्पर्धी संघाची आक्रमणे रोखून धरण्यात त्याला बरेचदा यश आले. मात्र त्याच्या पायाला प्रचंड दुखापत झाली असल्याचे रशिया फुटबॉल संघाकडून ट्विट करण्यात आले. रशिया फुटबॉल संघाने आपल्या ट्विटरवर यासंबंधी पोस्ट केले. ‘सामना जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंनी जीवापाड प्रयत्न केले. त्यात कुटेपोव्ह याच्या पायाला गंभीर दुखापत झाली’, अशी माहिती रशिया संघाने ट्विटरवरून दिली.

या सामन्यात शूटआऊट मध्ये रशियाचा पराभव झाला होता.