FIFA World Cup 2018. यंदाचा फुटबॉल विश्वचषक अनेक नव्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरताना सिद्ध होत आहे. तर दिग्गद खेळाडूही या विश्वचषकात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून हा फुटबॉल खेळत आहेत. अशाच दिग्ग खेळाडूंमधील एक नाव म्हणजे लिओनेल मेसी.

अर्जेंटिना संघातील स्टार खेळाडू मेसीविषयी आणि फुटबॉलच्या मैदानात असणाऱ्या त्याच्या वर्चस्वाविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, यंदाच्या फिफा विश्वचषकामध्ये सुरुवातीपासूनच मेसीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला अडचणींचा सामना करावा लागला. ज्यात मेसीकडून क्रीडारसिकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या नाहीत. या साऱ्यांमध्ये मेसीवर बऱ्याच टीका करण्यात आल्या, किंबहुना आता त्याने निवृत्तीचा विचार करावा अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. अर्जेंटिना संघाचं फिफा २०१८ मधील अस्तित्व धोक्यात असतानात या संघाने नायजेरियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात असा खेळ केला की अनेकांनी पुन्हा एकदा ‘मेसी इज बॅक’ असं म्हणत या स्टार खेळाडूची पाठ थोपटली.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही असंख्य चाहत्यांनी लिओच्या खेळाचं कौतुक करत त्याला पाठिंबा दिला. फक्त त्याच्या यशातच नव्हे, तर अपयशातही त्याची साथ न सोडलेल्या याच चाहत्यांसाठी मेसीने एक पोस्ट लिहित त्यांचे आभार मानले. ‘मी इथे असलेल्या प्रत्येक चाहत्याचे आभार मानतो, ज्यांनी काही ना काही परीने तडजोड करत आमची साथ दिली आहे. अर्जेंटिनावासियांचेही मी मनापासून आभार मानतो’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं.

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

दरम्यान लिओ आणि मार्कोस रोजोच्या गोलमुळे अर्जेंटिनाने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात नायजेरियाचा २-१ ने पराभव करत बादफेरीत अखेर प्रवेश मिळवला. या विजयाबरोबर ‘ड’ गटात अर्जेंटिना संघ ४ गुणांसह दुसऱ्यास्थानी राहिला. तर प्रथमस्थानी असणाऱ्या क्रोएशियाच्या वाट्याला ७ गुण आले आहेत. बादफेरीत प्रवेश मिळवण्यासाठी अर्जेंटिनासाठी हा विजय खूप महत्वाचा होता. बादफेरीत त्यांची आता बलाढ्य फ्रान्सशी लढत रंगणार आहे. तेव्हा आता विश्वचषकाच्या जवळ पोहोचण्यासाठीती ही लढत कोण जिंकणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.