धनंजय रिसोडकर

२२ जून, १९९४.. दोन तपांचा काळ उलटून गेल्याने बहुतांश फुटबॉलशौकिनांच्या विस्मृतीत गेलेला. मात्र कोलंबियातील फुटबॉलप्रेमींच्या मनात आजही घर करून बसलेला हा दिवस. त्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमान अमेरिका होते. साखळी सामन्यांमध्ये कोलंबियाचा सामना अमेरिकेशीच होता, तोच हा दिवस. सामन्याच्या पूर्वार्धातच अमेरिकेच्या एका खेळाडूने मारलेला फटका अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोलंबियाच्या आंद्रेस एस्कोबारच्या पायाला लागून चेंडू चुकून त्यांच्याच गोलजाळीत गेला. हा सामना कोलंबिया नेमका १-२ अशा एका गोलच्या फरकाने हरला आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे ‘जंटलमन’ या टोपणनावाने प्रख्यात एस्कोबारमुळेच देश पराभूत झाल्याची भावना तेथील कट्टर फुटबॉलशौकिनांच्या मनात घर करून बसली. त्या पराभवानंतर चारच दिवसांत संघ माघारी परतला आणि त्यानंतरच्या आठवडाभरात आंद्रेस त्याच्या मित्रांसमवेत हॉटेलमध्ये जेवून त्याच्या कारजवळ परतला. त्यावेळी तेथील एका दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्याच्याशी वाद घातला. तसेच लगेच बंदूक बाहेर काढून सहा गोळ्या मारून त्याला जागीच ठार मारले. प्रत्येक गोळी मारताना ‘गोल’ असे ते ओरडत होते, अशी  साक्ष घटना पाहणाऱ्यांनी त्यावेळी पोलिसांना दिली. चुकून झालेल्या एका गोलमुळे एका राष्ट्रीय फुटबॉलपटूची माथेफिरूंनी हत्या केली.

आपल्याच हाताने केलेला आपला अंत म्हणजे आत्महत्या. फुटबॉलमध्ये केवळ हाताऐवजी पाय किंवा डोके (हेडर) इतकाच काय तो फरक. आत्महत्येत माणूस केवळ स्वत:चे आयुष्य संपवतो, तर फुटबॉलमध्ये आणि विशेषत्वे तो जर विश्वचषक असेल तर तो पूर्ण देशाच्या आशाआकांक्षांचा आत्मघात ठरतो. त्यामुळेच ज्या खेळाडूकडून विश्वचषकात चुकून असा स्वयंगोल होतो, तो खेळाडू त्या देशवासीयांना ‘घरभेदी’ वाटू लागतो. घडलेला गोल ही मानवीय चूक आहे किंवा वेगवान खेळात घाईगडबडीत कुणाकडूनही घडू शकणारी सामान्य बाब आहे, असे समजून घेणारे चाहते फारच विरळा असतात. त्यातही तो स्वयंगोल जर एखाद्या निर्णायक सामन्यात झालेला असेल तर तो खेळाडू आयुष्यभरासाठी खलनायक ठरतो. खेळाडूलादेखील त्या चुकीचे ओझे पुढील कारकीर्दीत आणि त्यानंतरही वागवावे लागते. असे स्वयंगोल देशवासीयांच्या इतके जिव्हारी लागतात की अतिरेकी फुटबॉलप्रेमींकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यापासून ते त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यापर्यंतचे प्रकारदेखील अनेकदा घडले आहेत. आतापर्यंतच्या २१ विश्वचषकात एकंदर ४६ इतके स्वयंगोल झाले आहेत. त्यातला एस्कोबारचा एकमेव स्वयंगोल सर्वाधिक घातकी ठरला. मात्र अन्य स्वयंगोलचे किस्सेदेखील संबंधित देशांमध्ये त्यानंतर वर्षांनुवर्ष चर्चिले गेले आहेत. यंदाच्या विश्वचषकातील साखळी सामन्यातच आतापर्यंत ५ स्वयंगोल झाले आहेत. त्यामुळे १९९८ सालच्या सर्वाधिक ६ स्वयंगोलचा विक्रम यंदा मोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्पेन, मेक्सिको, बल्गेरियाचे सर्वाधिक स्वयंगोल 

विश्वचषकांमध्ये सर्वाधिक स्वयंगोल स्पेन, मेक्सिको आणि बल्गेरिया या तीन देशांच्या नावे आहेत. या तिन्ही देशांच्या खेळाडूंनी आतापर्यंतच्या विश्वचषकांमध्ये प्रत्येकी ३ गोल केले आहेत.

१९९८ मध्ये सर्वाधिक

फ्रान्समध्ये १९९८ साली झालेल्या विश्वचषकात सर्वाधिक ६ स्वयंगोल झालेले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या विश्वचषकातील एकूण ४६ स्वयंगोलपैकी सर्वाधिक ५ स्वयंगोलचा लाभ फ्रान्सला मिळालेला आहे. ज्या मोजक्या देशांनी आतापर्यंतच्या विश्वचषकात अद्यापपर्यंत एकही स्वयंगोल केलेला नाही, त्यात फ्रान्स हा एक महत्त्वपूर्ण देश आहे.

दोन्ही देशांकडून स्वयंगोलची नोंद

एकाच सामन्यात खेळणाऱ्या दोन्ही देशांच्या खेळाडूंनी आपापल्याच संघाविरुद्ध स्वयंगोल केल्याची एकमेव घटना २००२ साली घडली होती. अमेरिका विरुद्ध पोर्तुगाल या सामन्यात अमेरिकेकडून जेफ अगूसने तर पोर्तुगालकडून जॉर्ज कोस्टाने प्रत्येकी एक गोल केल्याची एकमेवाद्वितीय घटना घडली आहे.

सर्वात पहिला आणि अखेरचा

मेक्सिकोच्या मॅन्युएल रोझेसकडून १९३० साली झालेल्या पहिल्या विश्वचषकात पहिला स्वयंगोल झाला होता. बोस्नियाच्या सीद कोलसिनॅक याच्याकडून २०१४ च्या विश्वचषकात अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला झालेला स्वयंगोल हा सर्वात कमी वेळेत नोंदवला गेलेला आहे, तर १९५४ साली इंग्लंडच्या जिम्मी डिक्कीनसनने ९४व्या मिनिटाला केलेला स्वयंगोल हा अखेरच्या क्षणातला एकमेव होता. मात्र यंदा म्हणजेच २०१८च्या विश्वचषकातील मोरोक्को वि. इराण या सामन्यात मोरोक्कोच्या अझिझ बोहाड्डोझकडून ९५व्या मिनिटाला स्वयंगोल झाल्याने या नवीन अंतिम क्षणातील स्वयंगोलची नोंद झाली.

दोन्ही देशांसाठी गोल

एकाच सामन्यात चुकून स्वयंगोल झाल्यानंतर पुन्हा प्रतिस्पर्धी संघावर एक गोल करून त्याची भरपाई करण्याचे कौशल्य केवळ एकाच फुटबॉलपटूला दाखवणे शक्य झाले आहे. हॉलंडच्या एर्नी ब्रॅँडेट्सने १९७८ साली इटलीविरुद्ध खेळताना  स्वयंगोल केला. मात्र अखेरीस पुन्हा हॉलंडसाठी गोल करून तो सामना २-१ असा जिंकवूनही दिला.

dhananjay.risodkar@expressindia.com