FIFA World Cup 2018 Loksatta Poll : फिफा विश्वचषक स्पर्धेत आजपासून बाद फेरीचे सामने सुरु होणार आहेत. या फेरीतील पहिला सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघांमध्ये होणार आहे. हे दोनही स्पर्धेच्या आधीपासूनच विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पण आजच्या सामन्यात मात्र कोणत्यातरी एकाला संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. आज कोणता संघ जिंकेल?, मेसीची जादू चालेल का?, मेसी नेमके किती गोल करेल? अशा विविध प्रश्नच एक पोळ लोकसत्ताने घेतला होता. आणि अवघ्या काही तासातच या पोलला भरपूर प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या सामन्यात मेसीची जादू चालेल आणि अर्जेंटिनाच्या हा सामना जिंकेल असा कल वाचकांमध्ये दिसून आला.

स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी कोण गाठेल? या प्रश्नाला तब्बल ७१.६ टक्के वाचकांनी मेसीच्या अर्जेन्टिनाला पसंती दर्शविली आहे. तर २८.४ टक्के वाचकांना फ्रान्स सामना जिंकेल, असा विश्वास आहे.

साखळी फेरीच्या सामन्यात मेसीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण बाद फेरीत मात्र तो नक्कीच चांगली कामगिरी करेल, असा विश्वास वाचकांनी व्यक्त केला असून सामन्यात मेसी पहिला गोल करू शकतो असे ४०.३ टक्के वाचकांनी म्हणले आहे. तर फ्रान्सचा ग्रिझमन पहिला गोल करेल, असे १२.९ टक्के लोकांचे मत आहे. विशेष म्हणजे या दोघांव्यतिरिक्त अन्य खेळाडू गोल करण्याची शक्यता वाचकांना सर्वाधिक म्हणजेच ४६.८ टक्के वाटत आहे.

आजचा सामना हा मेसीसाठी अखेरचा सामना ठरणार का? या प्रश्नावर वाचकांनी स्पष्टपणे नाही असे मत व्यक्त केले आहे. तब्बल ६७.४ टक्के वाचकांनी ही शक्यता धुडकावून लावली आहे. पण, २२.८ टक्के वाचक हा मेसीचा शेवटचा सामना ठरू शकतो, असे म्हणत आहेत. तर, ९.७ टक्के लोक हे तटस्थ आहेत.

मेसी हा बाद फेरीत अनेकदा अयशस्वी ठरला आहे. मेसीला दडपणाखाली चांगला खेळ करता येत नाही, असा मेसीचा इतिहास असल्याचा जाणकारांचा आरोप आहे. परंतु मेसी या सामन्यात त्याच्यावर असलेले हे दूषण पुसून सामन्यात किमान १ गोल नक्की झळकावेल, असे तब्बल ५४.३ टक्के वाचकांचे म्हणणे आहे. तर मेसी २ गोल करेल असा अंदाज २३.९ टक्के वाचकांनी व्यक्त केला आहे. मात्र मेसी एकही गोल करणार नाही, असे १६. ७ टक्के वाचक म्हणत आहेत.

दरम्यान, ५५६ वाचकांच्या प्रतिसादावर हा निष्कर्ष काढण्यात आला असून दोन्ही संघ तुल्यबळ असले तरीही अर्जेंटिनाच वरचढ ठरणार, असा कौल वाचकांनी दिला आहे.