07 March 2021

News Flash

FIFA World Cup 2018 : मॅजिक आणि लॉजिक

दैवतपूजनाच्या सध्याच्या युगात या दोघांपैकी कोणी किंवा दोघेही पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळणारच नाहीत,

ख्रिस्तियानो रोनाल्डो

सिद्धार्थ खांडेकर

फुटबॉल जगतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोघांचेही संघ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतून एकाच दिवशी गारद व्हावेत, हा एकाच वेळी अजब योगायोग आणि काव्यात्मक न्याय ठरतो. आता विश्वचषक संपेपर्यंत तरी या दोघांपैकी कोण श्रेष्ठ (गोट?) किंवा कोण आपल्या संघाला चषक जिंकून देणार या चर्चेला तात्पुरता पूर्णविराम मिळालेला असेल. मेसी ३१ वर्षांचा आणि रोनाल्डो ३३ वर्षांचा आहे. दैवतपूजनाच्या सध्याच्या युगात या दोघांपैकी कोणी किंवा दोघेही पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळणारच नाहीत, याविषयी आताच ठाम भाकीत करणे अवघड आहे. मेसीने यापूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली होती, ती त्याला मागे घ्यावी लागली. त्याच्या तंदुरुस्तीविषयी अजून तरी फार समस्या नाहीत. बार्सिलोनाकडून क्लब फुटबॉल खेळताना अलीकडे त्याच्या कामगिरीत काही चढउतार होत असले, तरी त्या क्लबचे गोलमशीन अजूनही नि:संशय मेसी आहे. रोनाल्डो मेसीपेक्षा वयाने मोठा असला तरी अधिक तंदुरुस्त आहे. रेआल माद्रिदकडून तो पुढील एक किंवा अनेक हंगाम खेळेल की नाही याविषयी संदेह असला, तरी युरोपातील अनेक क्लब त्याला करारबद्ध करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या दोन्ही निष्णात फुटबॉलपटूंच्या लीला यापुढेही क्लब फुटबॉलमध्ये दिसत राहणार आहेत.

मेसीला अर्जेटिनासाठी एकही चषक जिंकता आला नाही, हे कटू वास्तव आहे. गेल्या स्पर्धेत त्याने सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीचा गोल्डन बॉल पटकावला असला, तरी त्या स्पर्धेत किंवा खरे तर कोणत्याही विश्वचषक स्पर्धेत त्याला अर्जेटिनासाठी बाद फेरीत गोल करता आलेला नाही. त्या देशात अजूनही दैवतासमान असलेल्या दिएगो मॅराडोनाने नेहमीच मेसीला स्वत:चा वारसदार ठरवला. मॅराडोना म्हणतो तेव्हा कधी ना कधी मेसी त्याच्यासारखी म्हणजे मॅराडोनासारखी कामगिरी एखाद्या स्पर्धेत करून दाखवेल आणि अर्जेटिनाला विश्वचषक जिंकून देईल, या वेडय़ा आशेवर अर्जेटिनाचे रसिक आणि फुटबॉल प्रशासक अजूनही जगत आहेत. मेसीशिवाय अर्जेटिना म्हणजे एक सामान्य संघ ठरतो, असे विधान मॅराडोनाने नुकतेच केलेय. खरे तर मेसी असूनही अर्जेटिनाचा संघ असामान्य तर सोडाच, पण धोकादायक संघही ठरत नाही हे फ्रान्स-अर्जेटिना सामन्यात दिसून आले. त्याच्या दोन चांगल्या पासेसवर गोल झाले. मात्र सामना संपण्यास काही मिनिटे उरलेली असताना गोलक्षेत्रात राहून गोल झळकवण्याची सोपी संधी त्याने दडवली. विश्वचषक २०१४चा अंतिम सामना असो, वा कोपा अमेरिका २०१५ आणि २०१६मधील अंतिम सामने असोत, अर्जेटिनाचे सारे लक्ष मेसीवरच केंद्रित होते. असल्या दडपणाखाली विश्वचषकात खेळणे, गोल करणे, नेतृत्व करणे आणि सामने व स्पर्धा जिंकून देणे हे आता एकटय़ा-दुकटय़ा फुटबॉलपटूचे काम राहिलेले नाही. अर्जेटिना म्हणजे बार्सिलोना नव्हे किंवा पोर्तुगाल म्हणजे रेआल माद्रिद नव्हे! मेसीच्या बाबतीत त्याचे चाहते आणि टीकाकारांचा प्रमुख आक्षेप म्हणजे, आकाशी-पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना मेसी पुरेसा ‘भुकेला’ दिसत नाही. चिंता, प्रश्नचिन्ह, निराशा, हतबलपणा याच भावना त्याच्या चेहऱ्यावरून सरकत असतात. याचे कारण मेसीचे अर्जेटिनासाठी खेळणे केवळ लोकप्रिय रेटय़ापायी होते. तो लहानपणापासून स्पेन आणि विशेषत: बार्सिलोनाच्या अकादमी संस्कृतीत रमलेला आहे. खरे तर स्पॅनिश नागरिकही झाला असता. तो केवळ कोपा अमेरिका किंवा विश्वचषक स्पर्धापुरता अर्जेटिनाच्या संघाबरोबर वावरतो. अशा स्थितीत त्याची इतर सहकाऱ्यांबरोबर भावनिक आणि वैचारिक जवळीक कशी निर्माण होणार? त्याचे सारे अफलातून कौशल्य बार्सिलोनाकडून खेळताना दिसले, जिथे शावी हर्नाडेझ आणि आंद्रेस इनियेस्टा यांच्यासारखे असामान्य मध्यरक्षक त्याच्यासाठी पासेस पुरवायचे किंवा पुरवतात. अर्जेटिनाकडून त्याला त्या दर्जाचे ‘सप्लायर’ कधीही लाभले नाहीत. परिणामी विश्वचषक आणि त्यातही बाद फेऱ्यांमध्ये जरा अव्वल दर्जाच्या संघाशी सामना झाल्यावर मेसीला आजवर एकही गोल करता आलेला नाही. त्याच्या जोरावर अर्जेटिना विश्वचषक जिंकू शकेल, अशी आशा करणे केव्हाही खुळचटपणाचेच होते. मेसीचा एक मोठा तोटा म्हणजे, तो असल्यामुळे अर्जेटिना दुसरा मेसी निर्माण करण्याच्या फंदात पडले नाहीत! हिग्युएन, अग्युरो यांच्यापलीकडे पाहावेसे त्यांना वाटले नाही. तरीही हा संघ गेल्या काही स्पर्धामध्ये बऱ्यापैकी कामगिरी त्या देशातील उपजत गुणवत्तेच्या जोरावर करत राहिला, मेसीच्या जोरावर नव्हे!

रोनाल्डोने या स्पर्धेत सुरुवात धडाक्यात केली, पण त्याचा जोर शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ओसरला, तरीही रोनाल्डो किमान गोलसाठी किंवा विजयासाठी प्रयत्न करतोय असे वाटत तरी होते. तरी रोनाल्डोला थोपवले की पोर्तुगालचे गोल होणार नाहीत हे बहुतेक संघांनी हेरलेले आहे. इराणविरुद्ध त्याने पेनल्टी घालवली. उरुग्वेच्या मातब्बर बचावफळीने तर त्याला गोलक्षेत्राच्या आसपास फार फिरकूही दिले नाही. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पोर्तुगालने युरो २०१६ स्पर्धा जिंकून दिली. त्या वेळी अंतिम सामन्यात मातब्बर आणि यजमान फ्रान्सविरुद्ध तो पहिली २५ मिनिटेच मैदानावर होता, तरीही त्या स्पर्धेत काही सामन्यांमध्ये त्याने गोल करत पोर्तुगालचे आव्हान जिवंत ठेवले होते. या दोन मातब्बर खेळाडूंच्या तुलनेपायी आणि त्यांच्यावरील अवास्तव अपेक्षांपायी सर्वाधिक नुकसान, गुणवत्ता असूनही त्यांच्या राष्ट्रीय संघांचे झालेले आहे. इतर कोणाला याची पर्वा वाटो न वाटो, पण किमान अर्जेटिना आणि पोर्तुगाल यांनी अनुक्रमे मेसी आणि रोनाल्डो यांच्याशिवाय आणि यांच्यापलीकडे पाहायला, खेळायला लवकरात लवकर शिकावे. हे लॉजिक वापरल्यास त्यांना वैयक्तिक कौशल्याच्या मॅजिकमधला फोलपणा समजून येईल!

siddharth.khandekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 4:07 am

Web Title: fifa world cup 2018 magic and logic in 2018 fifa world cup
Next Stories
1 FIFA World Cup 2018  : पंचनामा – अंतिम टप्प्याची थरारकता!
2 FIFA World Cup 2018 : अर्जेटिनाच्या पराभवानंतर मेसीच्या निवृत्तीचीच चर्चा
3 FIFA World Cup 2018 : आता नेयमारची अग्निपरीक्षा!
Just Now!
X