28 May 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : मेक्सिको.. एक कोडं!

सर्वाधिक आकर्षक आणि रसिकप्रिय संघ म्हणून निर्विवादपणे मेक्सिकोचं नाव घ्यावं लागेल.

मेक्सिको संघ

सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक आकर्षक आणि रसिकप्रिय संघ म्हणून निर्विवादपणे मेक्सिकोचं नाव घ्यावं लागेल. जर्मनीचा बचाव, आत्मविश्वास आणि वलय भेदून त्यांनी मिळवलेला विजय या संघाच्या विश्वचषक इतिहासातला सर्वाधिक मोठा विजय ठरतो. हिर्विग लोझानो, कालरेस वेला आणि हावियर हर्नाडेझ किंवा चिचॅरिटो यांनी जर्मनीविरुद्ध विशेषत डाव्या बगलेवरून केलेले हल्ले थेट ब्राझील किंवा अर्जेटिनाच्या संघांची आठवण करून देणारे होते. या सामन्यात जर्मनी कमनशिबी होते असं एक मत आहे. प्रत्यक्षात मेक्सिकोही कमनशिबी ठरले. अन्यथा १-० पेक्षा अधिक मोठय़ा फरकानं त्यांनी विद्यमान जगज्जेत्यांना हरवलं असतं. विश्वचषक स्पर्धेत मातब्बर संघांपेक्षा अशा एखाद्या संघानं धमाल उडवून देण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९९०च्या विश्वचषकात कॅमेरूननं अर्जेटिनाला हरवून रंगत आणली होती. फरक इतकाच, की कॅमेरून किंवा २००२ मध्ये सेनेगल (त्यांनी त्यावेळच्या जगज्जेत्या फ्रान्सला हरवलं) हे आफ्रिकन देश होते आणि फुटबॉल जगतातही बऱ्यापैकी अपरिचित होते. याउलट मेक्सिको वर्षांनुवर्ष फुटबॉल विश्वचषक स्पर्धामध्ये हजेरी लावणारा संघ आहे.

गेल्या दशकात स्पेनविषयी आणि यंदा बेल्जियमविषयी असं म्हटलं जातं की हे संघ फुटबॉलमधले ‘अंडरअचीव्हर्स’ आहेत. म्हणजे फुटबॉल फळण्यासाठी आवश्यक गुणवत्ता, सुविधा, संस्कृती आणि आसक्ती असूनही त्या संघांना विश्वचषक स्पर्धेत या संचिताला साजेशी कामगिरी करून दाखवता आलेली नाही. स्पेननं अर्थातच गेल्या काही वर्षांमध्ये ही मरगळ पूर्णपणे झटकून टाकली आहे. बेल्जियम तसं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मेक्सिकोनंही हे मनावर घ्यायला हवं. या देशातही ब्राझील, अर्जेटिना, उरुग्वेप्रमाणेच फुटबॉल संस्कृती, गुणवत्ता आहे. या देशातील फुटबॉलविषयक पायाभूत सुविधा आहेत. विश्वचषक स्पर्धेतला या देशाचा इतिहास फार वाईट नाही. १९३० मध्ये उरुग्वेला झालेल्या पहिल्या स्पर्धेपासून मेक्सिको खेळतोय. १९३४, १९७४ आणि १९८२मध्ये ते पात्रच ठरू शकले नव्हते. १९३८च्या स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली, तर १९९०मध्ये त्यांच्यावर एका युवा स्पर्धेत काही खेळाडूंना वय चोरून उतरवल्यामुळे ‘फिफा’नं बंदी घातली होती. १९७० आणि १९८६ अशा दोन स्पर्धाचं यजमानपद त्यांनी भूषवलं. जर्मनी, ब्राझील, इटली, फ्रान्स या देशांप्रमाणे दोन वेळा या मोठय़ा स्पर्धेचा यजमान ठरलेला मेक्सिको हा देश. यजमान असतानाच्या दोन्ही स्पर्धामध्ये त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. तीच त्यांची आजवरची सर्वोत्तम कामगिरी. १९९४पासून प्रत्येक स्पर्धेत त्यांनी दुसरी फेरी गाठली आणि तिथंच त्यांचं आव्हान संपलं. जुन्या जमान्यातील कामगिरीचं एक वेळ बाजूला ठेवू. मात्र अलीकडे त्यांनी खरोखरच काही चांगले सामने दिले. उदा. १९९४ मध्ये इटलीविरुद्ध १-१ अशी बरोबरी, १९९८ मध्ये हॉलंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी, २०१० मध्ये फ्रान्सविरुद्ध २-१ असा विजय, २०१४ मध्ये ब्राझीलविरुद्ध ०-० अशी बरोबरी. मेक्सिको सिटीमधील अ‍ॅझटेका स्टेडियम हे फुटबॉलमधील अत्यंत मोठय़ा आणि दर्जेदार स्टेडियमपैकी एक मानलं जातं. दोन विश्वचषक अंतिम सामने आणि १९८६ मधील दिएगो मॅराडोनाचे कुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध गोलही इथलेच!

गेल्या काही वर्षांमध्ये मेक्सिकोच्या १७ वर्षांखालील संघानं दोन जगज्जेतेपदं पटकावली. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलं. जर्मनीविरुद्ध त्यांचा खेळ पाहिल्यास मेक्सिकोच्या सुवर्णपिढीनं आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे, असं मानता येईल. मात्र त्यांना इतर ‘लॅटिन भावंडां’प्रमाणे कामगिरी अद्याप करता आलेली नाही याची काही कारणं आहेत. ब्राझील, अर्जेटिना, उरुग्वे, कोलंबिया, चिली या देशांच्या राष्ट्रीय संघांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी ९० टक्के युरोपातील क्लबांमधून खेळतात. लॅटिन अमेरिकी क्लबांकडे युरोपीय क्लबांइतकी संपत्ती नाही हे याचं प्रमुख कारण. याउलट मेक्सिकोतील क्लब आजही आपल्या फुटबॉलपटूंना बऱ्यापैकी पगार देत असल्यामुळे त्या देशातून फुटबॉलपटूंची तितकीशी गळती होत नाही. याचे फायदे आणि तोटेही आहेत. चिचॅरिटोसारख्यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंचा युरोपातील फुटबॉलचे बारकावे, व्यूहनीती, फिटनेस संस्कृती, व्यावसायिकता आणि आर्थिक स्थैर्य यांच्याशी संबंध येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये लॅटिन अमेरिकी देशांतूनही युरोपात व्यावसायिक  फुटबॉलपटू हे त्या-त्या राष्ट्रीय संघांचा आधारस्तंभ बनले आहेत. त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. युरोपीय व्यावसायिकता आणि लॅटिन अमेरिकेतील फुटबॉल आसक्ती (प्रोसेस अधिक पॅशन) यांच्या मिलाफातून ब्राझीलियन रोनाल्डो, रोनाल्डिन्यो, मेसी, काका, माशेरानो, नेयमार, जेम्स रॉड्रिगेझ, अलेक्सिस सांचेझ असे परिपक्व फुटबॉलपटू तयार होतात. मेक्सिको त्या आघाडीवर फार समृद्ध नाही. त्यांच्याकडे प्रशिक्षण सुविधा उत्तम आहेत. बहुतेक क्लबही आर्थिकदृष्टय़ा सुस्थितीत आहेत. पण तेथील फुटबॉलला वैश्विक आयाम नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणं किंवा गटसाखळीतून पुढे सरकणं इतपत ते सहज साध्य करतात. पुढील खडतर आव्हान पेलणं त्यांना जड जातं. जर्मनीविरुद्धचा विजय अशा परिस्थितीत ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. मेक्सिकोला अशा ठिणगीची नितांत गरज होती. हा आत्मविश्वास आणि दर्जा कायम राखल्यास हा संघ या स्पर्धेत आणखीही धक्के देऊ शकतो. ब्राझील, अर्जेटिना आणि उरुग्वे या लॅटिन अमेरिकी प्रतिभावानांमध्ये मध्य अमेरिकी असूनही मेक्सिकोची भर पडल्यास कोणत्याही सच्च्या फुटबॉल रसिकाचा आक्षेप असण्याचं कारणच नाही.

siddharth.khandekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 12:50 am

Web Title: fifa world cup 2018 mexico unbelievable performance in fifa world cup 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : रोनाल्डोसमोर मोरोक्कोची अग्निपरीक्षा
2 FIFA World Cup 2018 POL vs SEN : वर्ल्डकपमध्ये ‘धक्कातंत्र’ सुरूच; कोलंबियापाठोपाठ पोलंडवर पराभवाची नामुष्की
3 Video : जर्मनीला पराभूत केल्यावर मेक्सिकन चाहत्यानं केलं प्रेयसीला प्रपोज; प्रेयसीनेही दिलं ‘रोमँटिक’ उत्तर
Just Now!
X