प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू होऊन एक सप्ताह झाला. पहिल्या फेरीत पार पडलेल्या १४ सामन्यांतून ३१ गोल झाले, त्यापैकी २० गोल मदानी, ६ पेनल्टी स्ट्रोकवर, २ गोल फाऊलच्या साहाय्याने, तर ऑस्ट्रेलिया, मोरोक्को व नायजेरिया यांच्याकडून प्रत्येकी एक स्वयंगोल झालेला आहे. पहिल्या फेरीतील फक्त कोलंबिया, पोलंड, सेनेगल व जपान यांचे सामने होणे बाकी आहे. सर्वच संघांचा पहिल्या फेरीअखेरचा खेळ पाहिला तर असे वाटते की, ख्रिस्तियानो रोनाल्डो वगळता पेले, मॅराडोना, रोमारिओ, रोनाल्डो यांच्या तोडीचा खेळ अद्याप एकाही संघातील खेळाडूने दाखवलेला नाही.

मंगळवारपासून दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली.  ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेटिना, जर्मनी या संघांचा दुसऱ्या फेरीतील सामन्यांचा निकाल जर विरुद्ध गेला तर मात्र त्यांना पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. दुसऱ्या फेरीत पोर्तुगालला मोरोक्कोविरुद्ध व स्पेनला इराणविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल. पहिला सामना जिंकल्यामुळे मनोधर्य वाढलेल्या क्रोएशियाला अर्जेटिना कमी लेखणार नाही अशी अपेक्षा आहे. ती चूक जर अर्जेटिनाने केली तर मेसीप्रेमींना तो एक धक्का असेल. ब्राझीलचा संघ पहिल्या फेरीत प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व प्राप्त करताना दिसला, पण त्यांनी घेतलेली आघाडी त्यांना अखेपर्यंत राखता आले नाही.  नेयमारसारखा कसलेला आक्रमक खेळाडू मधल्याफळीत खेळताना पाहून त्याच्या चाहत्यांसह सर्वानाच आश्चर्य वाटले तर नवलच. नेयमार आक्रमक फळीत खेळणे, हेच ब्राझीलच्या हिताचे आहे. पण हे त्याच्या दुखापतीवर अवलंबून असेल. याउलट पहिला सामना जिंकूनही फ्रान्स व उरुग्वे संघांचा खेळ नजरेत भरण्यासारखा दर्जेदार झालेला नाही. इजिप्तला हरवून यजमान रशियाचा संघ बाद फेरीत पोहोचल्यास ती रशियन प्रेक्षकांना पर्वणीच असणार आहे. पण त्याकरिता त्यांना मोहम्मद सलाहचे तगडे आव्हान असणार आहे. जर्मनी पहिल्या सामन्यात अनपेक्षित पराभूत झाल्यामुळे स्वीडनविरुद्धच्या सामन्यात त्यांच्यावर दडपण असणार आहे, पण त्यांना मागील पराभव विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल. स्वीडनने द. कोरियाला जिंकल्यामुळे ते जर्मनीविरुद्ध विजयाच्या इराद्यानेच उतरतील. तरीही जर्मनीचा संघ या सामन्यात बलाढय़ असणार आहे.

पहिल्या फेरीतील खेळाच्या आधारे विजेतेपदाचे नवे दावेदार म्हणून बेल्जियम, मेक्सिको, इंग्लंड हे संघ उदयास येत आहेत. या संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केलेले आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंची धावगती, जमिनीवरून पास देणे व जागा घेणे या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. मागील कित्येक वर्षांतील हा एक चांगला संघ आहे. या संघातील आक्रमक हॅरी केन, स्टर्लिंग, मध्यफळीतील लिनगार्ड, हँडरसन, अ‍ॅश्ले यंग यांचा सुरेख समन्वय जमून आलेला आहे.  मात्र अचूक सामना पूर्ण करण्याची समस्या इंग्लंड संघालाही सोमवारच्या सामन्यात भेडसावत होती. इंग्लंडने उर्वरित सामन्यात जर अचूक गोलजाळ्याचा वेध घेतला, तर निश्चितपणे इंग्लंड संघ विजेतेपदावर आपले नाव कोरू शकतो.

मेक्सिको संघ १६व्या वेळी विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरला आहे. या वेळीचा मेक्सिकोचा संघ भलताच फॉर्ममध्ये असून एका बलाढय़ संघात त्याची गणना होत आहे. त्यांनी जर्मनीविरुद्ध केलेला खेळ लाजवाब म्हणता येईल. वन टच पासिंग, शूटिंग, धावगती, वॉल पासिंग, परस्परांची जागा घेणे या त्यांच्या बाबी कौतुकास्पद आहेत. त्याहीपेक्षा या संघाचा चांगला गुण म्हणजे या संघामध्ये असणारी संघ भावना. ४-२-३-१ या व्यूहरचनेनुसार खेळणाऱ्या या संघात आक्रमक लोझ्ॉनो, वेला, मधल्या फळीतील अल्वारेझ तर बचावफळीतील कॅस्ट्रो, ग्वॉर्डाडो या खेळाडूंनी चांगली चमक दाखवली. गोलरक्षक गुलेर्मो ओछोआ ही मेक्सिकोची जमेची बाजू म्हणता येईल. जर्मनीविरुद्धच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलरक्षण केले. यामुळेच मेक्सिको संघ विजेतेपदाचा अधिक दावेदार आहे.

बेल्जियम संघ सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून १३व्या वेळी हा संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला आहे. पहिल्या फेरीत तुलनेने दुबळ्या असणाऱ्या पनामा संघाला त्यांनी एकतर्फी पराभूत केले. या संघाचे मध्यरक्षण अतिशय मजबूत असून पनामाबरोबरच्या सामन्यात ३-४-२-१ या व्यूहरचनेने त्यांनी खेळ केला. या संघातील आक्रमक रोमेलू लुकाकू, मर्टनेिझ, हॅजार्ड, मधल्या फळीतील अ‍ॅक्सेल, मेयन्यूअर हे दर्जेदार खेळाडू आहेत. सर्वच स्तरावर हा संघ मजबूत असून गेल्या काही दिवसांत या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे.   या संघाचा खरा कस इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लागणार आहे. हा संघही विजेतेपदावर दावा करू शकतो.

abhijitvanire@yahoo.com