ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com
यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खेळाडूंकडेही सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. त्यांची कामगिरी व त्यांच्यापुढील आव्हानांवर एक नजर.

मोहम्मद सलाह

संघ : इजिप्त

वय : २५ वर्ष

उल्लेखनीय कामगिरी : २०१७ मधील सर्वोत्कृष्ट आफ्रिकन खेळाडू.

इजिप्त संघाला तब्बल २८ वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पध्रेत पात्रता मिळवून देण्यात मोहम्मद सलाह घाली या गुणी फुटबॉलपटूचे नाव प्रथम क्रमांकावर येते. यंदाच्या हंगामात लिव्हरपूल या क्लबसाठी खेळताना त्याने सर्वाधिक ४४ गोल करताना नावाजलेले फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनासुद्धा मागे टाकले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रियल माद्रिद क्लबचा कर्णधार सर्गीओ रामोस याच्याशी धक्काबुक्की झाल्यामुळे सलाह डाव्या खांद्यावर कोसळला. त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२०१० मध्ये एल मोकलवून या स्थानिक क्लबकडून खेळताना त्याने सुरेख कामगिरी केली. पुढे बॅसेल या स्वीर्झलॅण्डमधील क्लबमध्ये गेल्यावरसुद्धा सलाहने वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्याच्या याच कामगिरीची दक्षता घेऊन इंग्लिश प्रीमियर लीगमधील चेल्सी या संघाने त्याला आपल्याकडे घेतले. पुढे खेळात राखलेल्या अप्रतिम सातत्यामुळे २०१७ मध्ये लिव्हरपूलने सलाहला तीन कोटी ६९ लाख अशा विक्रमी किमतीत संघात सहभागी केले.

आंतरराष्ट्रीय संघासाठी खेळतानादेखील सलाहने गोलधडाका सुरूच ठेवला. आफ्रिकेच्या २० वर्षांखालील फुटबॉल स्पध्रेत संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात सलाहने खारीचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला वर्षांतील सर्वाधिक आश्वासक आफ्रिकन प्रतिभा या पुरस्काराने गौरविण्यात आले. २०११ मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या सलाहला सुरुवातीच्या काळात संघाच्या बाहेरच जास्त राहावे लागले. मात्र २०१७ हे प्रामुख्याने त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारे वर्ष ठरले. या वर्षांतील आफ्रिकन चषक राष्ट्रीय स्पध्रेत इजिप्तने उपविजेतेपद मिळवले. त्याशिवाय पात्रता फेरीतील गटात अव्वल स्थान पटकावून त्यांनी फिफा विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित केले. सलाहला त्या वर्षी सर्वोत्तम आफ्रिकन खेळाडू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जोशुआ किमीच

संघ : जर्मनी

वय : २३ वर्ष

उल्लेखनीय कामगिरी : २०१७ मधील जर्मनीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार.

२०१७ मधील फिफा कॉन्फेडरेशन चषकात जर्मनीला पहिले जेतेपद मिळवून देण्यात जोशुआ किमीच या २३ वर्षीय अवलियाचे मोलाचे योगदान होते. सुरुवातीपासूनच मध्यभागात खेळणाऱ्या किमीचने २०१३ मध्ये व्हिएफबी स्टटगार्ट या जर्मनीतील क्लबकडून आपल्या युवा कारकीर्दीला सुरुवात केली. आक्रमण आणि बचाव दोन्ही गोष्टी तितक्याच प्रभावीपणे किमीच पार पडू शकतो. त्यामुळंच बुंदेसलिगा या फुटबॉल स्पध्रेच्या अधिकृत संकेत स्थळावर त्याला जर्मनीची ‘दुहेरी तलवार’ अशा नावाने संबोधण्यात आले.

२०१५ मध्ये किमीचला बायर्न मुनीच या क्लबने पाच वर्षांसाठी सहभागी करून घेतले. २०१७-१८ मधील जर्मन सुपर चषकात म्युनिचसाठी त्याने सहा गोल केले शिवाय ४७ गोलसाठी सहाय्यसुद्धा केले. त्यामुळेच यंदा विश्वचषकातसुद्धा किमीचकडून अशाच अष्टपलू कामगिरीची अपेक्षा जर्मनीचे प्रशिक्षक जोकीम लो यांना असेल.

मॅक्सी गोमेझ

संघ : उरुग्वे

वय : २१ वर्ष

सर्वोत्कृष्ट कामगिरी : २०१६ मध्ये डिफेन्सर स्पोर्टीग क्लबसाठी (उरुग्वे) सर्वाधिक १४ गोल.

२०१७ मध्ये ला लिगामधील सेल्टा वीगो या क्लबसाठी पदार्पण करताना गोमेझने आपल्या पहिल्याच सामन्यात रेयाल सोशियाड विरुद्ध दोन गोल करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याच वर्षी पोलंड विरुद्ध त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. आक्रमकाची भूमिका सांभाळणाऱ्या गोमेझकडून उरुग्वेला फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आपल्या पहिल्या विश्वचषकात लुईस सुआरेजच्या साथीने तो संघाला विजेतेपद मिळवून देणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मार्को असेन्सिओ

संघ : स्पेन

वय : २२ वर्ष

सर्वोत्कृष्ट कामगिरी : २०१५ च्या १९ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू.

२२ वर्षीय मार्को असेन्सिओ

मार्कोची क्लब कारकीर्द मालोर्का या स्पॅनिश क्लबमधून २०१३ मध्ये झाली. सध्या रेयाल माद्रिद या क्लबकडून खेळणाऱ्या मार्कोने २०१५ मधील युरोपियन देशांच्या १९ वर्षांखालील अजिंक्यपद स्पध्रेत स्पेनला विजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. त्याच वर्षी त्याने स्पेनच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केले. त्याशिवाय २०१७ मध्ये त्याने २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेत ‘सिल्वर बूट’ हा पुरस्कारदेखील जिंकला.

मार्को मध्य भागात आपली जबाबदारी चोखपणे पार पडत असून त्याने २०१७ मधील अजिंक्यपद स्पध्रेत सात गोलशिवाय १८ गोल सहाय्यसुद्धा केले होते. यंदा विश्वचषकात स्पेनसाठी आपला पहिला गोल करण्याचे त्याचे उद्दिष्ट असून संघालाही या युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

जीओवानी लो सेल्को

संघ : अर्जेटिना

वय : २२ वर्ष

सर्वोत्कृष्ट कामगिरी : २० व्या वर्षीच बलाढय़ अर्जेटिनाच्या राष्ट्रीय संघात स्थान.

२०१५ मध्ये क्लब कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या सेल्कोने रोझारिओ सेंट्रल या संघासाठी सुरेख कामगिरी केली. त्यामुळेच २०१६ मध्ये पॅरिस सेंट जर्मन क्लबने त्याला पाच वर्षांसाठी संघात सहभागी करून घेतले. २०१६ च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पध्रेसाठी त्याला अर्जेटिनाच्या २३ वर्षांखालील संघात निवडण्यात आले. २०१७ मध्ये त्याने अर्जेटिनासाठी पदार्पण केले. पहिला गोल करण्याकरता उत्सुक सेल्कोची फिफा विश्वचषकासाठी संभाव्य २३ खेळाडूंच्या चमूत वर्णी लागली आहे. मध्य भागात तसेच गरज पडल्यास आक्रमणाची जबाबदारीसुद्धा हा २२ वर्षीय युवा पार पाडू शकतो.