कझान : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘ह’ गटात ज्या दोन संघांना ताकदवान मानले जात होते त्याच्यावरच आता स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवू शकते. पोलंड आणि कोलंबिया हे दोन संघ रविवारी एकमेकांविरुद्धात लढणार असून या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर फेकला जाईल. त्यामुळेच दोन्ही संघांना या सामन्यात सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

फिफाच्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असणाऱ्या पोलंडकडे रॉबर्ट लेवांडोव्हस्कीसारखा गुणवान आक्रमक आहे. मात्र तरीही त्याला पहिल्या सामन्यात गोल करणे जमले नाही व सेनेगलने पोलंडला सहज धूळ चारली. त्यामुळे १२ वर्षांनंतर विश्वचषकाला पात्र ठरलेल्या पोलंडवर अधिक दडपण आहे.

दुसरीकडे मागील विश्वचषकात गोल्डन बूटचा पुरस्कार पटकावणारा कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेज दुखापतीमुळे पहिल्या लढतीत अध्र्यापेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर राहिला. त्याच्यावर कोलंबियाची मुख्य भिस्त आहे.

सामना क्र. ३२

गट ह

पोलंड वि. कोलंबिया

स्थळ : कझान एरिना

वेळ : रात्री ११:३० वा.

तुम्हाला हे माहीत आहे?

पोलंडचे प्रशिक्षक अ‍ॅडम नवाल्का यांनी आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना १९८० मध्ये कोलंबियाविरुद्धच खेळला होता. तो या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेला एकमेव सामना होता. पोलंडने त्या लढतीत कोलंबियाला ४-१ असे नमवले.