Fifa world cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरु झाली असून या स्पर्धेतील चार सामने आतापर्यंत झाले आहेत. या सामन्यात यजमान रशिया, उरुग्वे, इराण यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. तर पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे साखळी फेरीतील अजून बरेचसे सामने शिल्लक असल्याने Fifa world cup 2018 कोण जिंकेल, हे आता सांगणे जवळपास अशक्य आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक गटातून कोणते दोन संघ स्पर्धेत पुढे जातील, हे देखील सांगणे कठीण आहे. पण एका भविष्य जाणणाऱ्या डुकराने आताच Fifa world cup 2018 मधील उपांत्य फेरीतील चार संघ सांगून टाकले आहेत. विशेष म्हणजे या डुकराने २०१४ साली झालेल्या Fifa world cup स्पर्धेचा विजेता जर्मनी होईल, हे भविष्यदेखील आधीच सांगितले होते.

मिस्टिक मार्कस असे या डुकराचे नाव असून ते डुक्कर आठ वर्षांचे आहे. या डुकराने Fifa world cup 2018 मध्ये कोणते ४ संघ उपांत्य फेरीचा पल्ला गाठतील याचे भविष्य वर्तवले आहे.

असे निवडले भविष्य सांगणाऱ्या डुकराने चार ‘सेमी फायनलिस्ट’

मार्कसच्या पुढ्यात ३२ फळे ठेवण्यात आली होती. त्या फळांवर Fifa world cup 2018 मध्ये सहभागी झालेल्या ३२ देशांचे झेंडे लावण्यात आले होते. त्यापैकी मार्कसने ४ फळे निवडून Fifa world cup 2018 च्या उपांत्य फेरीत जाणारे संघ सांगितले. मार्कसने अर्जेंटिना, उरुग्वे, बेल्जीयम आणि नायजेरिया हे चार झेंडे असलेली फळे निवडली. त्यामुळे हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, असा मार्कसने अंदाज व्यक्त केला आहे.

 

 

सौदी अरेबिया आणि इराणची संधी हुकणार?

दरम्यान, ही प्रक्रिया सुरु असताना मार्कसने अर्जेटिनाचे फळ निवडल्यानंतर तो सौदी अरेबियाकडे वळला होता. त्याने त्या फळाचा वास घेतला. मात्र ते फळ निवडले नाही. त्यानंतर मार्कस इराणच्या फळाकडेही गेला. पण अखेरीस त्याने नायजेरियाचा झेंडा असलेले फळ निवडले.

भविष्यातील अंदाज वर्तवण्याचे रेकॉर्ड १००%

मार्कसचे आतापर्यंतचे सर्व अंदाज हे तंतोतंत खरे ठरले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी मार्कसने डोनाल्ड ट्रम्प जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर ‘ब्रेक्झिट’च्या मतदानाच्या वेळीदेखील ब्रिटन वेगळे होण्याच्या बाजूने मार्कसने कौल दिला होता. इतकेच नव्हे तर २०१४ साली झालेल्या Fifa world cup मध्ये जर्मनी विजेता संघ ठरेल, हे देखील त्याने वर्तवले होते.