सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक १९९४ आणि १९९८ या स्पर्धामध्ये जर्मनीला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर जर्मन फुटबॉल संघटनेनं त्या देशातील फुटबॉल व्यवस्थेचा आणि गुणवत्तेचा आढावा घेतला. नवीन सहस्रकाच्या तोंडावर जगभर जर्मन अर्थव्यवस्थेला ‘युरोपचा आजारी माणूस’ असं संबोधलं जायचं. कारण त्या काळात जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत एक प्रकारचं साचलेपण आलेलं होतं. वाढ खुंटली होती आणि विकासाचं क्षितिज काळवंडलं होतं. जर्मन फुटबॉलची स्थिती यापेक्षा वेगळी नाही, याविषयी फुटबॉल प्रशासक आणि विश्लेषकांमध्ये मतैक्य होतं. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. युवा फुटबॉलपटूंच्या विकासावर सर्वाधिक भर दिला गेला. दीर्घकालीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली. परिणाम कालांतरानं दिसून येऊ लागले. जर्मन फुटबॉल संस्कृतीची दिशा बदलण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतले गेले. विश्वचषक २००६चं यजमानपद जर्मनीकडे आलं. त्या वेळी जर्मनीच्या संघाचे प्रशिक्षक होते युर्गन क्लिन्समान. क्लिन्समान हे जर्मनीच्या १९९०मधील जगज्जेत्या जर्मन संघाचे आक्रमक होते. नवीन सहस्रकातील जर्मन संघाची बांधणी करताना ही आक्रमकता त्यांनी जर्मन संघात भिनवली. गेल्या शतकात ८० आणि ९०च्या दशकातील जर्मन संघाची दहशत त्यांच्या शारीरिक दणकटपणामुळे आणि मानसिक कणखरपणामुळे होती. अनेक विश्लेषक त्यांचा ‘पँझर’ असा उल्लेख तुच्छता आणि भीती अशा दोन्ही भावनेतून करायचे! ती ओळखच क्लिन्समान यांनी पुसून टाकली. अर्जेटिना, ब्राझील, हॉलंडसारखा जर्मन संघही आक्रमक खेळावर भर देऊ लागला. बचावफळीतले दोघं मध्यरेषेवर उभे राहून बाकीचे प्रतिस्पर्धी भागामध्ये तळ ठोकू लागले. परिणामी जर्मनीच्या नावावर प्रत्येक स्पर्धेत मिळून डझनावरी गोल होऊ लागले. हे करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, कौशल्य, मानसिक कणखरपणा, ऊर्जा जर्मनीसाठी खेळणाऱ्या संघात खच्चून भरलेली होती हा सुरुवातीस उल्लेख केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा परिपाक होता.

२००६मध्ये जर्मनीचा संघ उपांत्य फेरीत इटलीकडून पराभूत झाला. त्यानंतर क्लिन्समान यांनी प्रशिक्षकपद सोडलं आणि ती जबाबदारी आली त्यांचे सहाय्यक जोकीम ल्योव यांच्याकडे. त्या वेळी जरा खळबळ उडाली होती. कारण तोपर्यंत जर्मनीचे प्रशिक्षक हे बहुधा त्या देशासाठी खेळलेले प्रतिभावान फुटबॉलपटू होते. फ्रान्झ बेकेनबाऊर, बर्टी वोग्ट्स, रुडी वॉलर, जुर्गन क्लिन्समान हे त्यांचे जगज्जेते खेळाडू त्यांना प्रशिक्षक म्हणून लाभले होते. त्यांच्या तुलनेत ल्योव यांचा बायोडेटा फारसा आकर्षक नव्हता. जर्मनीच्या दुय्यम लीगमध्ये ते खेळले होते आणि प्रशिक्षणाचाही त्यांच्याकडे फार अनुभव नव्हता. पण क्लिन्समान यांनी त्यांची तारीफ केली आणि जर्मन संघटनेनं ल्योव यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं. ल्योव यांची पहिली कसोटी होती युरो २००८. त्या स्पर्धेत जर्मनीनं अंतिम फेरीत धडक मारली आणि स्पेनकडून हा संघ ०-१ असा हरला. युरो अजिंक्यपद पटकावता आलं नसलं, एक प्रशिक्षक म्हणून ल्योव यांनी खेळाडू, जर्मन फुटबॉल संघटना, दर्दी आणि विश्लेषकांचा विश्वास संपादला. बदललेल्या जर्मन फुटबॉल संस्कृतीला ल्योव यांनी नवा आयाम दिला. विश्वचषक २०१० आणि युरो २०१२ या स्पर्धामध्ये जर्मनीला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरीही ल्योव यांच्यावरील विश्वास किंवा ल्योव यांचा आपल्या व्यूहरचनेवरील आणि खेळाडूंवरील विश्वास कमी झाला नाही, उलट वृद्धिंगत झाला. हाच विश्वास त्यांना २०१४मध्ये जगज्जेते बनवण्यास कारणीभूत ठरला.

त्या स्पर्धेनंतर जर्मनीचा कर्णधार फिलिप लाम निवृत्त झाला. कालांतरानं मिरोस्लाव्ह क्लोसा आणि बॅस्टियन श्वाइनस्टायगरही निवृत्त झाले. हे तिघंही वर्षांनुवर्ष जर्मनीकडून खेळत होते. क्लोसा हा स्ट्रायकर, लाम बचावपटू आणि विंगबॅक, श्वाइनस्टायगर मधल्या फळीतला. लाम आणि श्वाइनस्टायगर हे संपूर्ण जर्मन हालचालींचं नियंत्रण करायचे. क्लोसा हा गोलक्षेत्रात राहून गोल झळकवायचा. बाकीचे सारे या तिघांच्या अवतीभवती राहात. ल्योव यांची व्यूहरचनाही या तिघांना केंद्रस्थानी ठेवून आखली जायची. या तिघांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या तोडीचे खेळाडूच जर्मनीला मिळू शकले नाहीत, हे जर्मन यंत्रणेचं ठळक अपयश होतं. त्यांच्या युवा कार्यक्रमाचं एक चक्र पूर्ण झालं. दुसरं सुरू करावं याविषयी त्यांना फार काही वाटलं नसावं, कारण या काळात जर्मनीचा आलेखही चढताच राहिला. २०१८मध्ये उतरलेल्या जर्मन संघात नव्हते – एक प्रमुख आणि भरवशाचा स्ट्रायकर जो गोलधडाका सुरू ठेवेल, एक चलाख मध्यरक्षक जो आक्रमण आणि बचाव अशा दोन्हींमध्ये समन्वय ठेवेल, एक भरवशाचा कर्णधार-बचावपटू जो संपूर्ण संघाला भरवसा देत राहील. या तिघांच्या अनुपस्थितीत म्युलर, ओयझिल, खेदिरा, बोआतेंग हे चांगले खेळाडू सामान्य ठरतात. त्यांच्या उपस्थितीमुळे हेच खेळाडू असामान्य वाटत होते. मॅन्युएल नॉयर हा गोलरक्षक चार वर्षांपूर्वी वेगळा होता, आज वेगळा आहे. हा आणखी एक फटका विद्यमान जर्मन संघाला बसला. सध्याच्या संघात टोनी क्रूस आणि काही प्रमाणात मॅट्स हुमेल्स हेच खऱ्या अर्थानं जगज्जेत्यांच्या दर्जाचे फुटबॉलपटू आहेत. प्रशिक्षक ल्योव हे ओळखून होते. पण त्यांना याबाबतीत काही करता आलं नाही की करू दिलं गेलं नाही, हे अस्पष्ट आहे.

पात्रता फेऱ्यांमध्ये जर्मन सर्वच्या सर्व सामने जिंकल्यामुळे या संघातील उणिवा पुरेशा समोर आल्याच नाहीत. विश्वचषक स्पर्धेत यदृच्छेनं काही घडत नाही. घडवावं लागतं हा धडा ब्राझीलला गेल्या विश्वचषक स्पर्धेत फार कडवटपणे पचवावा लागला होता. ती वेळ आज जर्मनीवर आलेली आहे. मेक्सिकोविरुद्ध पराभव झाल्यानंतर पुढच्याच सामन्यात ल्योव यांनी संघात चार बदल केले. कोरियाविरुद्धच्या सामन्यात पाच बदल केले. मनानं स्थिर आणि निश्चिंत प्रशिक्षकाचं हे लक्षण नाही. जगज्जेत्या संघाच्या प्रशिक्षकाचं हे लक्षण नाही. संपूर्ण संघच जवळपास प्रत्येक सामन्यात विस्कळीतपणे खेळत होता. त्यातून त्यांचे गोलही झाले नाहीत. ७० टक्क्यांच्या आसपास चेंडूचा ताबा आणि एकही गोल होत नाही हे गंभीर आहे. मेक्सिको किंवा कोरिया हे भक्कम बचावासाठी कधीही ओळखले जात नाहीत. पुढचे गोल करत नाहीत, मधले गोंधळलेले आहेत नि शेवटच्या फळीतले चुका करतात.. ही लक्षणं जर्मन व्यवस्थेनं ओळखली नाहीत हे अद्भुतच आहे. हे अपयश हेच जर्मनीच्या अभूतपूर्व पराभवाचं कारण ठरलं. यातून बाहेर पडण्यासाठी किमान काही वर्ष जावी लागतील अशी परिस्थिती आहे.

siddharth.khandekar@expressindia.com